कलबुर्गी यांचा बळी काँग्रेसमुळेच!

By admin | Published: September 2, 2015 10:35 PM2015-09-02T22:35:10+5:302015-09-02T22:35:10+5:30

काँग्रेस आणि भाजपा यांच्यात खरोखरच काही फरक उरला आहे काय, हा प्रश्न विचारणं आता भाग आहे, ते धारवाडमध्ये डॉ. कलबुर्गी यांची हत्त्या केली गेल्यामुळं

Kaluburgi is the cause of the Congress! | कलबुर्गी यांचा बळी काँग्रेसमुळेच!

कलबुर्गी यांचा बळी काँग्रेसमुळेच!

Next

काँग्रेस आणि भाजपा यांच्यात खरोखरच काही फरक उरला आहे काय, हा प्रश्न विचारणं आता भाग आहे, ते धारवाडमध्ये डॉ. कलबुर्गी यांची हत्त्या केली गेल्यामुळं. म्हणजे आर्थिक धोरणाबाबत काँगे्रस व भाजपा यांच्यात काहीही फरक नाही, हे गेल्या पाव शतकात स्पष्टपणं दिसून आलं आहे. स्वच्छ व पारदर्शी असा जनहिताचा राज्यकारभार या निकषावर दोन्ही पक्षात ‘नागडा व उघडा’ एवढाच काय तो फरक आहे, हेही सिद्ध झालं आहे. उरला मुद्दा ‘जातीयवादा’चा किंवा ‘हिंदुत्वा’चा. म्हणजेच सामाजिक व सांस्कृतिक भूमिकांचा. भाजपा ही संघ परिवाराची राजकीय आघाडी आहे आणि उघडपणं हिंदुत्वाची भूमिका हा पक्ष घेत आला आहे. भारत हे ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्याचं उद्दिष्ट संघानं कधीही लपवून ठेवलेलं नाही. या उद्दिष्टाकडं वाटचाल करण्याच्या मार्गातील एक महत्वाचा टप्पा म्हणून देशातील राजकीय सत्ता ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे डावपेच संघ गेल्या नऊ दशकात आखत आला आहे. त्याचं फळ संघाला आता दिल्लीतील सत्ता एकहाती ताब्यात आल्यानं मिळालं आहे.
संघाच्या या उद्दिष्टाला काँगे्रसचा विरोध आहे आणि म्हणून संघाची राजकीय आघाडी असलेल्या भाजपाच्या मोदी सरकारला काँगे्रस विरोध करीत आहे. मात्र संघाच्या हिंदुत्वाला काँगे्रसनं गेल्या तीन दशकात खरोखरच कधी वैचारिकदृष्ट्या विरोध केला आहे काय आणि सत्ता हाती असताना राज्यघटनेच्या चौकटीत सरकारला असलेले अधिकार वापरून हिंदुत्ववादी पेरत गेलेले विद्वेषाची बीज उखडून टाकण्यासाठी काँगे्रसनं कधी ठोस पावलं टाकली आहेत काय?
अर्थातच ‘नाही’ हेच या प्रश्नाचं नि:संदिग्ध उत्तर आहे.
सत्तेत राहण्यासाठी जातीयवादी प्रवृत्तींना खतपाणी घालणं, गोंजारणं आणि त्यांच्याकडं काणाडोळा करणं, हेच काँगे्रसचं गेल्या तीन साडेतीन दशकातील धोरण राहिलं आहे. संपूर्ण मुस्लिम समाजाला मुल्ला-मौलवी व कट्टरवाद्यांच्या वेठीला जसं काँगे्रसनं बांधून ठेवलं, तसंच हिंदुत्ववादी शक्तींच्या कारवायांकडंही सतत काणाडोळा केला. शिवाय त्यांच्यावर कारवाई केल्यास हिंदू समाज दुखवला जाईल, अशी लटकी सबबदेखील सतत आपल्या कृतीच्या समर्थनार्थ दिली गेली. इथेच काँगे्रसच्या वैचारिक दिवाळखोरीचं पितळ उघडं पडतं.
हिंदूधर्म म्हणजे हिंदुत्ववाद नव्हे आणि सर्व हिंदू समाज हा हिंदुत्ववाद्यांचा पाठीराखा नाही. मोदी सरकार सत्तेवर आले असतानाचंही हे वास्तव आहे. बहुसंख्यांकांच्या जमातवादाच्या धोक्याची गांधी-नेहरू यांना किती सखोल जाणीव होती, हे आजही जर सहा दशकं मागं जाऊन फाळणीपूर्व व नंतरच्या काही महिन्यांतील घटना एकदा नव्यानं डोळ्याखालून बारकाईनं घातल्यास सहज लक्षात येऊ शकतं. गांधी-नेहरू या दोघांच्या या वैचारिक भूमिका सर्वसामान्य जनतेला पटत होत्या. म्हणूनच गांधींना ठार मारण्याची वेळ हिंदुत्ववाद्यांवर आली; कारण ‘मी सनातन हिंदूधर्म मानतो’, असं जाहीररीत्या सांगणाऱ्या महात्माजींना जनतेचा पाठिंबा मिळणं म्हणजे हिंदूधर्म व हिंदुत्व एक नाही, हे जनतेला पटल्याचंच लक्षण होतं. भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात १९५२ साली नेहरूंनी केलेली भाषणंही हा बहुसंख्याकांच्या जमातवादाचा धोका सांगणारी आहेत. हिंदुत्ववाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान नसताना आणि राजकारणात तर त्यांचंं अस्तित्वाही नसताना हा धोका जनतेला नेहरू सांगत होते; कारण राज्यकारभार हाकताना जे विविध खाचखळगे व वाटा-वळणं येतात, त्याचा फायदा घेऊन जनतेच्या भावनांना हात घालून फासिस्ट शक्ती आपला जम कसा बसवतात, याची परेपूर जाणीव इतिहासाचा गाढा अभ्यास असल्यानं नेहरूंना होती. हा जो गांधी-नेहरू यांचा वैचारिक व राजकीय वारसा होता, तो सत्तेच्या अमर्याद आकांक्षेपायी काँगे्रसनं उतून मातून वाऱ्यावर सोडून दिला. म्हणूनच राजीव गांधी यानी मुस्लिम महिला विधेयक संमत करवून घेतलं आणि त्यावर उतारा म्हणून बाबरी मशिदीची कवाडं उघडली. दिल्लीत शिखांचं शिरकाण काँगे्रस नेत्यांनीच घडवून आणलं होतं. गुजरातमध्ये मोदी यांनी मुख्यमंत्री असताना मुस्लिमांचा नरसंहार घडलून आणला, तेव्हा केवढी ओरड काँगे्रसनं केली! पण काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाकडं जी देशातील प्रतिष्ठित वकिलांची फौज आहे, ती न्यायालयीन लढाई लढण्यासाठी वापरली काय? ते काम तिस्ता सेटलवाड यांनी केलं. म्हणून आज मोदी सरकार त्यांच्यामागं हात धुवून लागलं आहे आणि काँगे्रस त्याचा निषेध करीत आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्त्या झाली, तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसच्या हाती सत्ता होती. ‘गांधीजींचा खून करणाऱ्या प्रवृत्तीच या हत्त्येमागं आहेत,’ असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घटना घडल्यावर दोन तासांच्या आत जाहीर केलं होतं. पण दाभोलकरांच्या हत्त्येआधी तीन वर्षे मराठवाड्यापासून ठाण्यापर्यंत हिंदुत्ववाद्यांनी जे छोटे-मोठे बॉम्बस्फोट घडवून आणले, त्याचा नि:पक्षपाती, तटस्थ व काटेकोर तपास या सरकारनं कधीच केला नाही.
म्हणून पानसरे यांचा खून होऊ शकला. आता कलबुर्गी यांची हत्त्या झाली आहे. कर्नाटकातही काँगे्रस सरकार आहे. पण तेथेही काँगे्रसनं हिंदुत्ववाद्यांना मोकळं रान आधीच दिलं आहे. काँगे्रसच्या संधीसाधू धोरणांमुळं दाभोलकर, पानसरे यांच्याप्रमाणं कलबुर्गी यांची हत्त्या करणं हिंदुत्ववाद्यांना शक्य झालं आहे.
- प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)

Web Title: Kaluburgi is the cause of the Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.