कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 07:28 AM2024-09-30T07:28:26+5:302024-09-30T07:28:49+5:30

या शतकात स्वतःची मुले जन्माला घालण्यापेक्षा प्राणी पाळण्याला विशेष पसंती दिली जात आहे. घर परिपूर्ण करणारे हे प्राणी माणसांना काय देतात?

Kamala Harris, Donald Trump, Dogs-Cats and You-Us! | कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

- साधना शंकर, लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी

पाळीव कुत्रे, मांजरे आणि त्यांचे मालक हा सध्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील लढाईत सध्या कुत्रे आणि मांजरांचे संदर्भ सातत्याने येत आहेत. त्यातून स्वाभाविकपणे मीम्सची मेजवानी तर मिळतेच, शिवाय वर्तमानकाळात पाळीव प्राण्यांचे महत्व किती वाढले आहे, हेही कळते. प्राणी पाळणे आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे, हे काही नवे नाही. मानववंशशास्त्रज्ञांना जमिनीखाली १० हजार वर्षांपूर्वीचे मानवी आणि कुत्र्यांचे सांगाडे सापडले आहेत. त्यातील काही कुत्रे जखमी होते किंवा आजाराने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची काळजीही घेतली जात होती, असे  त्यावरून आढळून येते. जगभरातील राजघराण्यात मालकांबरोबर त्यांच्या पाळीव प्राण्यांचे फोटो, चित्रे राजप्रासादातील भिंतीवर हमखास आढळतात. 
 मात्र अनेकांना आधार वाटणारे पाळीव प्राणी त्यांच्या घरातील लोकांच्या भावना, पैसा आणि वेळ किती खातात, याचे प्रमाण मात्र अलीकडे वाढलेले दिसते. प्राण्यांचे  मानवीकरण अलीकडे वाढत चालले आहे. पाळीव प्राण्यांच्या मालकांनी स्वत:चे रुपांतर ‘प्राण्यांच्या पालकां’मध्ये (पेट पेरेंट्स) केले असून, कोरियासारख्या देशात ‘आमच्या घरातल्या प्राण्यांनीच आम्हाला पाळले आहे’, असे सांगताना लोक धन्यता मानतात. प्राण्यांचे मानुषीकरण झाले हा यातला मुद्दा नाही; तर प्राणी त्यांच्या मालकांना प्रेम, साहचर्य देतात, समजून घेतात हा आहे. एका अर्थाने इतर माणसांकडून जे मिळणे अपेक्षित असते (आणि ते अल्पसे मिळते किंवा बदलत्या काळाबरोबर काहीसे आटतच चालले आहे) ते हे प्राणी देतात. प्राणी तुम्हाला शांत करतात, तुमच्या उत्तम आरोग्याचा आधार (आणि अनेकदा कारणही),  तुमचे मित्र होतात, एकटेपणा आणि नैराश्याच्या गर्तेतून तुम्हाला बाहेर काढतात. अशा प्रकारे प्राणी पाळल्याने होणाऱ्या  फायद्यांची यादी न संपणारी आहे. हे सगळे प्रत्यक्षात कितपत खरे आहे, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय झाला.

पूर्वी प्राण्यांना शिळे अन्न दिले जायचे आणि घराच्या मागील बखळ असेल, तिथे एखाद्या कोपऱ्यात त्यांच्या झोपण्याची जागा असायची. आता घरातल्या लाडक्या पाळीव प्राण्यांना तज्ज्ञांकरवी तयार झालेले अन्न पुरवले जाते, त्यांची ब्युटी पार्लर्स असतात, पार्टीसाठी त्यांना सजवतात, लग्न लावतात, त्यांच्यासाठी स्वतंत्र बिछाने असतात किंवा ते मालक मंडळींच्या बिछान्यातच झोपतात. या सगळ्यामुळे ‘पाळीव प्राणी’ हा भरभराटीला आलेला उद्योग झाला आहे. कोविडमुळे या उद्योगाला मोठी चालना मिळाली. अधिकाधिक एकट्या लोकांनी प्राणी पाळायला सुरुवात केली. प्राण्यांवर होत असलेला खर्च चक्रवाढीने  फुगला. २०१९ ते २०२३  या काळात हा खर्च ११ टक्क्यांनी वाढला.  २०३० पर्यंत तो २६० अब्ज डॉलर्सच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. या शतकात स्वतःची मुले जन्माला घालण्यापेक्षा प्राणी पाळण्याला पसंती दिली जात आहे. मानवी जन्मदरात घट झाल्यानंतर प्राणी पाळण्याचे प्रमाण वाढले. मुले आणि प्राण्यांमुळे कुटुंबाला परिपूर्णता येते. समृद्ध आर्थिक प्रदेशात माणसाच्या मुलांची जागा प्राणी घेत असून, तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेतील चर्चेत मांजरी पाळणाऱ्या स्त्रिया आणि प्राण्यांच्या पालकत्त्वावर भर राहिला, अनेक भारतीय वृत्तपत्रांमध्येही याचे प्रतिबिंब उमटले. 

पाळीव प्राण्यांवर होणारा खर्च जगभर वाढत असताना त्यांच्यासाठीच्या सेवांमध्ये वाढ होते आहे. पाळीव प्राण्यांच्या मालकांना प्राण्यांपासून काय हवे असते? तर स्नेह, बिनशर्त प्रेम, स्नेह आणि समजून घेणे. खरेतर याच गोष्टी आपण मित्र, जोडीदार आणि जीवनसाथी यांच्याकडून अपेक्षितो. पण, त्यासाठी आता एक नवा जोडीदार आपलासा केला जाऊ लागला आहे. माणसांशी असलेल्या आपल्या नात्याची जागा पाळीव प्राणी घेत आहेत का? - यावर आपण विचार केला पाहिजे.
    sadhna99@hotmail.com

Web Title: Kamala Harris, Donald Trump, Dogs-Cats and You-Us!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.