कृतार्थ कामत!
By admin | Published: October 9, 2015 04:04 AM2015-10-09T04:04:23+5:302015-10-09T04:04:23+5:30
मौज आणि सत्यकथा ऐन भरात असण्याच्या काळात ज्या थोरांनी त्यासाठी घाम गाळला, त्यात ग.रा.कामत यांचे नाव अग्रणी होते. लेखक म्हणून त्यांची ओळख ठसणे
मौज आणि सत्यकथा ऐन भरात असण्याच्या काळात ज्या थोरांनी त्यासाठी घाम गाळला, त्यात ग.रा.कामत यांचे नाव अग्रणी होते. लेखक म्हणून त्यांची ओळख ठसणे अपरिहार्य असतानाच ते पटकथा लेखनाकडे वळले. त्यांच्या आयुष्यास मिळालेल्या या ‘टर्नींग पॉईन्ट’मुळे मराठी व हिंदीतल्या अनेक चित्रपटांचा पाया भक्कम ्नंरोवला गेला. कामत रुईया महाविद्यालयात शिकत असताना थोर संशोधक व अभ्यासक न.र.फाटक यांचा त्यांना सहवास लाभला आणि त्यांच्या साहित्यिक व संपादकीय गुणांना वेगळे वळण मिळाले. मराठी भाषेतील सुवर्णपदक मिळवण्याचा मानही त्याना प्राप्त झाला. त्यांचा पुढील प्रवास मात्र कलाटणी घेणारा ठरला. ‘ग.रा.’ या अद्याक्षरांनीच ते प्रसिद्ध होते. सिद्धहस्त लेखक ग.दि.माडगूळकर हे चित्रपटसृष्टीतील कामतांचे गुरु. त्याकाळी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटासाठी गदिमा लेखन करत होते. ग.रां.नी त्यांना लेखन सहाय्य केले. हा चित्रपट प्रचंड गाजला. ग.रां.च्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र लाखाची गोष्ट खऱ्या अर्थाने लाखमोलाची ठरली. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्याशी त्यांचे याच चित्रपटाच्या दरम्यान सूर जुळले. लाखाची गोष्ट नंतर ग.रां.नी ‘शापित’ची पटकथा लिहिली व या चित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले. त्याआधी ‘पेडगावचे शहाणे’ हा त्यांचा चित्रपटही हिट झाला होता. तरीही ते खरे रमले हिंदी चित्रपटसृष्टीत! ज्येष्ठ दिग्दर्शक राज खोसला यांच्यासोबत पटकथालेखक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. ‘मेरा साया, मेरा गाव मेरा देश, काला पानी, दो रास्ते, पुकार, मनचली, मैं तुलसी तेरे आंगन की, बंबई का बाबू, कच्चे धागे, बसेरा’ या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटाच्या कथा-पटकथा ग.रां.च्या लेखणीतून उतरल्या. ९२ वर्षांचे कृतार्थ आयुष्य त्यांच्या वाट्याला आले आणि त्यांनी त्याचे सोने केले. त्यांच्याशी अनेकदा गप्पा मारताना त्यांनी वयातील अंतर कधीच आड येऊ दिले नाही. गेल्या वर्षी झी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते स्वत: हा पुरस्कार स्वीकारायला जाऊ न शकल्याने रेखा कामत यांनी तो स्वीकारला. तथापि ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी त्यानंतर ग.रां.च्या घरी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.