ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा कांगावा

By admin | Published: January 16, 2016 02:59 AM2016-01-16T02:59:12+5:302016-01-16T02:59:12+5:30

लोकमतच्या (दि.१४) संपादकीय पानावरील थोर विचारवंत प्रकाश बाळ यांचा लेख वाचला. बाळ आणि त्यांच्यासारखे विचारवंत यांचे लेख म्हटले की हिंदू समाज, हिंदुत्व

Kangaava of Dhonji secularism | ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा कांगावा

ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा कांगावा

Next

- केशव उपाध्ये 
(लेखक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आहेत)

लोकमतच्या (दि.१४) संपादकीय पानावरील थोर विचारवंत प्रकाश बाळ यांचा लेख वाचला. बाळ आणि त्यांच्यासारखे विचारवंत यांचे लेख म्हटले की हिंदू समाज, हिंदुत्व आणि संघ म्हणजे सर्व वाईट व बाकी सर्व चांगले हे वारंवार नमूद होणार, हे गृहीत धरूनच लेख वाचला. पत्रकारितेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेले हे विचारवंत लेखात आव आणतात की, मालद्यातील दंगल आरोप-प्रत्यारोपापलीकडे जाऊन पाहिली पाहिजे. त्याचवेळी ते या लेखात हिंदू-मुस्लीम दंगल घडवून आणण्याचे निमित्तच संघ परिवाराला मिळणार आहे असं बेजबाबदार आणि पूर्वग्रहाने बरबटलेले विधान कोणत्याही पुराव्याशिवाय करतात.
या देशात हिंदू-मुस्लीम दंगलीचा इतिहास हा संघ निर्माण होण्यापूर्वीपासूनचा आहे, हे त्यांना माहीत नसेल असे नव्हे. पण संघाला दूषणं दिली नाहीत तर त्यांची धर्मनिरपेक्षता सिद्ध होणार कशी? फार जुन्या इतिहासाचे स्मरण नको... मुंबईत २०१२मध्ये आजाद मैदानावर रजा अकादमीने मोर्चा काढला होता, त्यावेळी दंगल झाली होती. बंदोबस्तावरील पोलीस महिलांचा विनयभंग झाला आणि स्मारकाला मस्तवालपणे लाथा मारण्यात आल्या. त्या दंगलीच्या वेळी काय कारणे होती? अशी अजून उदाहरणे देता येतील. बाळ पुढे म्हणतात, संघ परिवाराची कार्यपद्धती पाहता एखाद्या मंदिराचा मुद्दाम विद्ध्वंस केला जाऊ शकतो. एखाद्या धार्मिक नेत्याचा खून मुद्दाम केला जाऊ शकतो. असले निव्वळ निराधार आरोप ते या लेखात करतात. संघाने नेहमीच आपण आपले काम करत रहावे आणि अशा भंपक टीकाकारांकडे लक्ष देऊ नये असे सहिष्णू धोरण ठेवल्याचा गैरफायदा घेण्याचा हा प्रकार आहे. राहुल गांधी यांनी संघावर आचरट आरोप केल्यानंतर त्यांना न्यायालयात खेचले त्यावेळी त्यांची आणि काँग्रेसची उडालेली तारांबळ फार जुनी नाही. अशी अनेक एकांगी आणि अर्धवट विधाने या लेखात आहेत. दहशतवादाला हिंदू-मुस्लीम तेढ जबाबदार असल्याचे बाळ सांगतात. आताच जकार्ताला दहशतवाद्यांचा हल्ला झाला. काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाला. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे पाडण्यात आले, त्यावेळी कोणती हिंदू-मुस्लीम तेढ होती? मालद्याच्या दंगलीला मुलामा देण्याचा प्रयत्न ते करतात. दंगल म्हणण्याऐवजी मालद्यातला हिंसाचार पद्धतशीरपणे घडविण्यात आला, असे ते म्हणतात. पुढचे वाक्य आहे, या प्रकरणात धार्मिक ध्रुवीकरणाची संधी भाजपाला साधायची आहे. दंगल झाली कशावरून तर एक महिन्यापूर्वी झालेल्या विधानावरून. इस्लाम खतरे मेचा नारा देऊन लोक जमवली गेली, अशी मौलिक माहिती बाळ देतात. पण सगळ्याला दोषी मात्र संघ परिवाराला आणि भाजपाला धरतात. याला कावीळ म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?
मुळातच बाळ व त्यांच्यासारख्या विचारवंताचा बेगडीपणा सातत्याने उघडा पडतोय. दादरीवरून या देशात असहिष्णुतेच्या नावाखाली एक वादळ उठविण्याचा प्रयत्न झाला होता. देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न होता. तेव्हा तावातावाने रस्त्यावर उतरलेले, पुरस्कार परत करणारे सर्वजण बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चिडीचूप झाले. मालद्यातील घटना सहिष्णुतेचा आविष्कार आहे, असे या सेक्युलरांना वाटते का? मालदा येथील थैमानाचा साधा निषेधही करायची हिंमत यांच्यामध्ये नाही. ही त्यांची सहिष्णुता आहे का सवडीशास्त्र आहे? ही सर्व मंडळी आपापल्या वातानुकूलित कक्षात बकध्यान करण्यात मग्न आहेत. जगात सर्वाधिक सहिष्णू देश आणि धर्म भारत व हिंदू हेच आहेत. मुसलमानांना राहण्यासाठी भारतासारखा देश नाही आणि हिंदूंसारखा शेजारी नाही, असे त्या समुदायातील लोक आता जगभरातील घटना पाहून म्हणतात. मुसलमानांमधील ही नवी जाणीव टोचत असल्यानेच बाळ हिंदू-मुस्लीम द्वेषाच्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा आणि सेक्युलर राजकारणाची सोय करण्याचा प्रयत्न करत आहेत काय, अशी शंका येते.
हिंदु ही चिरंतन आणि प्रवाही जीवनपद्धती आहे. कालौघात काही चुकीच्या गोष्टी या प्रवाहात शिरल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याची दखल घेण्याऐवजी हिंदु म्हणजे बुरसटलेले व असहिष्णू ठरवून टीका करण्यात ही मंडळी धन्यता मानत आहेत. हिंदू धर्माची किंवा संघाची बदनामी करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचे दिवस आता गेले. ही अशा विचारवंताची दांभिक मांडणी समाजाने कधीच नाकारायला सुरुवात केली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील झटका हा त्याचा आविष्कार होता. संघाला तुम्ही वाईट म्हणून संघाच्या सर्वव्यापकतेचा सूर्य झाकला जाणारच नाही. शिवशक्ती संगमात लाखो स्वयंसेवकांचा देशभक्तीचा हुंकार ऐकून ते हादरले. आता तेथील महात्मा फुलेंचा वंशज खरा की खोटा आहे, ही चर्चा करीत आहेत अशा चर्चेने स्वत:च समाधान करून घ्या. पण समाजाने ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना कधीच नाकारले आहे. संघाच्या राष्ट्रवादाकडे लोक आकर्षित होत आहेत. अशा स्थितीत याला आकांडतांडवाशिवाय दुसरे नाव नाही. बाकी हे विचारवंत अशा पद्धतीने जितके लिहितील तितके उघडे पडतील. आम्ही म्हणू तेच सत्य आणि आम्ही मांडू तेच विचार या असहिष्णू वृत्तीने त्यांना ठरावीक आत्मप्रौढी कंपूत जागा जरूर मिळेल. संघविचार मात्र समाज स्वीकारत राहील !

Web Title: Kangaava of Dhonji secularism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.