कंगनाने केला महाराष्ट्रातील हुतात्म्यांचा अपमान

By राजेंद्र दर्डा | Published: September 5, 2020 05:32 AM2020-09-05T05:32:52+5:302020-09-05T05:33:37+5:30

शिवसेना नेत्यांविषयीच्या तक्रारीबद्दल कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कंगनाला आहेत पण त्यांनी मुंबईचा अपमान करण्याचे काहीच कारण नव्हते.

Kangana insults the martyrs of Maharashtra | कंगनाने केला महाराष्ट्रातील हुतात्म्यांचा अपमान

कंगनाने केला महाराष्ट्रातील हुतात्म्यांचा अपमान

Next

- राजेंद्र दर्डा
एडिटर इन चीफ
लोकमत वृत्तपत्र समूह

‘‘मला मुंबईत न येण्याची शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिलेली धमकी पाहून मला मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखे भासत आहे’’ असे अत्यंत बेजबाबदार विधान अभिनेत्री कंगना रनौतने केले आहे. शिवसेना नेत्यांविषयीच्या तक्रारीबद्दल कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कंगनाला आहेत पण त्यांनी मुंबईचा अपमान करण्याचे काहीच कारण नव्हते.

तिच्या या विधानामुळे संयुक्त महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी बलिदान देणाऱ्यांंचाच घोर अपमान झाला आहे. हा अत्यंत चीड आणि उद्वेग निर्माण करणारा प्रकार आहे. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत १०८ हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ती ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या मुशीतून हा महाराष्ट्र तावून सुलाखून तयार झाला आहे. ज्या सावित्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणाची ज्योत देशात पेटवली, ज्यांच्यामुळे महिलांना शिक्षण मिळाले, त्याच शिक्षणाचा अविवेकी वापर कंगनाने केला आहे.

हृतिक रोशनवर बेफाम आरोप करत कंगना प्रसिद्धीच्या झोतात आली. सिनेक्षेत्राविषयी बोलायला ती मोकळी आहे. तिथे कोणीही तिचे तोंड बंद केलेले नाही. मात्र ज्या मुंबईने तिला मोठे केले, नावलौकिक दिला, देशभरात स्वत:ची ओळख दिली, त्या मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ची उपमा देणे यासारखा समस्त मुंबईकरांचा, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा दुसरा अपमान नाही. जी अभिनेत्री अशा पद्धतीची बेछूट विधाने करते, तिच्याकडून माफीची अपेक्षा तरी कशी करायची?

एखादी व्यक्ती, एखाद्या राजकीय पक्षाच्या हिताची भूमिका मांडत असेल तर तो त्या व्यक्तीचा व्यक्तिगत प्रश्न असतो. मात्र देशाच्या, राज्याच्या आणि शहराच्या अस्मिता त्यापेक्षा कितीतरी मोठ्या असतात. त्यामुळे त्या शहरांच्या, तेथे राहणाऱ्यांच्या अस्मितांना धक्का लावण्याचे काम कधीही, कोणीही करू नये. मात्र सवंग प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या नादात कंगनाने जी विधाने मुंबई शहराविषयी किंवा मुंबई पोलिसांविषयी केली आहेत ती अत्यंत आक्षेपार्ह आहेत. ‘मुंबई पोलिसांची आपल्याला भीती वाटते, मुंबई पोलीस आपल्याला संरक्षण देऊ शकत नाहीत’ अशी विधाने करणे हेदेखील इथल्या समस्त पोलीस दलाचा अवमान आहे. स्कॉटलंड यार्डच्या पोलीस दलाशी ज्या पोलिसांची तुलना होते, ज्या पोलिसांनी कसाबसारख्या जिवंत अतिरेक्यास पकडले, ज्या हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे यांनी अतिरेक्यांशी लढताना बलिदान दिले, त्या शहीद परिवाराचादेखील कंगनाने अपमान केला आहे.

आपल्याकडे जेवढे सक्षम पोलीस अधिकारी आहेत तेवढे अन्यत्र कुठेही नाहीत हे देशपातळीवर मान्य झालेले आहे. आजही मुंबई पोलीस दलात अनेक उत्तम अधिकारी आहेत. ९१ वर्षाच्या ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या सुपर कॉपपासून आजच्या सदानंद दाते यांच्यापर्यंत चांगल्या पोलीस अधिकाºयांची भली मोठी यादी देता येईल. मुंबई पोलीस दल ज्या महाराष्ट्रात आहे, त्या राज्याचा काही वर्षे मी गृहराज्यमंत्री होतो, मला मुंबई पोलीस दलाची इत्थंभूत माहिती आहे. मला पोलीस दलाचे आलेले अनुभव, मी पाहिलेले अत्यंत कर्तृत्ववान पोलीस अधिकारी यांचा मला कायम अभिमानच वाटत आला आहे. असे असताना एक अभिनेत्री येते आणि संपूर्ण पोलीस दलालाच आरोपीच्या पिंजºयात उभे करते ही गोष्ट वरवर दिसते तेवढी साधी सरळ आहे असे मला वाटत नाही.

‘मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नाही, मला येथे संरक्षण मिळेल की नाही हे माहिती नाही’, अशी विधानं करून संपूर्ण व्यवस्थेला आरोपीच्या पिंजºयात उभे केल्यामुळे सर्वसामान्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडू शकतो हे कळण्याइतपत अज्ञान तिच्याकडे नक्कीच नसेल. कंगना राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे. अनेक मानसन्मान तिला अभिनयासाठी मिळाले आहेत. महाराष्ट्राने ज्या कंगनाच्या अभिनयावर प्रेम केले, तिला नावलौकिक मिळवून दिला ती हीच का? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.

एखाद्या घटनेवरून किंवा एखाद्या प्रकरणात सत्तारूढ पक्षाला कोंडीत पकडणे हे विरोधी पक्षांनी केले तर त्यात गैर काहीही नाही. मात्र असे आरोप करत असताना पोलीस, महसूल किंवा अन्य कोणत्याही संस्था बदनाम होऊ नयेत याची काळजी कायम घेतली गेली पाहिजे. एखादा अपवाद वगळता विरोधी पक्षातल्या कोणत्याही नेत्याने वादग्रस्त विधानासाठी कंगनाला जाहीरपणे फटकारल्याचे माझ्या तरी वाचनात नाही.

कंगनाने अभिनेता रणबीर, रणवीर आणि विकी कौशल यांनी ड्रग्जची तपासणी करून घ्यावी, असेही विधान केले आहे. तिच्याजवळ जर खरोखरीच काही माहिती असेल तर तिने ती जाहीर केली पाहिजे. पोलिसांना माहिती दिली पाहिजे. जेणेकरून तपासात त्याचा उपयोग होऊ शकेल. मात्र असे काहीही न करता सवंग विधाने करत राहणे, स्वत:कडे प्रसिद्धीचा झोत ओढून घेणे ही गोष्ट बरोबर नाही. कदाचित तिच्या तोंडून मुंबई विषयी सतत विधान करण्यामागे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे राजकारण तर केले जात नसेल ना..? हे यानिमित्ताने तपासून पाहीले पाहिजे. देशात आज कोरोनामुळे निर्माण झालेली बेकारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, सीमेवरील तणाव अशा अनेक ज्वलंत प्रश्नावर खरेतर चर्चा अपेक्षीत नाही का...?

Web Title: Kangana insults the martyrs of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.