कंगनाच्या थयथयाटाने शिवसेना बॅकफूटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 11:47 PM2020-09-11T23:47:27+5:302020-09-11T23:48:32+5:30

संजय राऊत यांच्यावर एका तरुणीने केलेल्या छळाच्या आरोपाची चौकशी राष्ट्रीय महिला आयोग करतोय.

Kangana Ranaut thithyata on the Shiv Sena backfoot | कंगनाच्या थयथयाटाने शिवसेना बॅकफूटवर

कंगनाच्या थयथयाटाने शिवसेना बॅकफूटवर

Next

- यदू जोशी

दादर, परळमधील शिवसैनिकांच्या मनात सध्या हीच भावना आहे की अर्णब गोस्वामीनी बाळासाहेबांच्या काळात ही अशी आगपाखड केली असती तर काय झालं असतं? खळ्ळखट्याकचे दिवस गेले आता ! रणकंदन ही शिवसेनेची रणनीती होती. ती आज नाही. कंगना रनौतबद्दल शिवसेनेनं जी रणनीती आखली ती पार फसली. ‘मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर मला हात लावून दाखवा’, अशी धमकी तिनं दिली होती. ती तशी आलीही.

कंगना मुंबईत उतरण्याच्या काही मिनिटं आधी तिच्या कार्यालयाचं अवैध बांधकाम पाडून तिच्या येण्यावरील मीडियाचा फोकस शिवसेनेनं हटवला; पण बुलडोझर चालविल्याच्या घटनेनं कंगनाला विनाकारण सहानुभूतीही मिळाली. तिचं थोबाड फोडू म्हणणारे तिला धक्का लावू शकले नाहीत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही असं म्हणणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नंतर मौनाची गोळी खाल्ली. वितंडवादासाठी विख्यात असलेल्या संजय राऊतांनाही ‘कंगनाचा विषय आता संपला’ असं जाहीर करावं लागलं. कंगना प्रकरणात शिवसेना बॅकफूटवर गेली. पवारसाहेबांनी शिवसेनेचे कान टोचले.

मुंबई पोलीस आयुक्तांना हटविण्यावरून शिवसेना-राष्ट्रवादी शीर्षस्थ नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं कळतंय. एक मात्र झालं. कंगनावर फोकस गेल्यानं आदित्य ठाकरेंवरील फोकस हटला. भाजपनं कंगनाचा पद्धतशीरपणे वापर करून घेतला. तिचं सगळं दिल्ली कनेक्शन आहे. कंगनाबद्दल काय बोलायचं हे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिल्लीहून सांगितलं जातं अशी माहिती आहे. कारण भाजपची नजर बिहार निवडणुकीवर आहे; असो.

संजय राऊत यांच्यावर एका तरुणीने केलेल्या छळाच्या आरोपाची चौकशी राष्ट्रीय महिला आयोग करतोय. याच तरुणीनं हीच तक्रार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे केली होती. दुसरं कोणी असतं तर आपल्यासह मोदी-शहांविरुद्ध वाट्टेल ते लिहिणारे राऊत यांना अडकवण्याची नामी संधी म्हणून त्या तरुणीचा वापर करून घेतला असता. फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत तेव्हा या प्रकरणाची चर्चा होऊ दिली नव्हती.

खडसेंचं काय होणार?

‘सखू पंढरी जाईना’ अशी एक कथा आहे. ती पंढरपूरला जायला निघते; पण मध्येच तिला घरचं काही ना काही काम आठवतं आणि ती परत फिरते. शेवटी सखू पंढरपूरला जातच नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच सध्या त्या सखूसारखं झालेलं दिसतंय. सध्या त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागलीय. वेगवेगळ्या पक्षांची आॅफर असल्याचे खडसे सांगतात. बाकीचे पक्ष खडसेंना सहानुभूती दाखवतात, पण त्यांना कोणी मंत्री करेल का? शेवटी चारदोन प्रसंगांनंतर खडसे त्यांच्या रक्तातच भाजप असल्याचं सांगतात आणि त्यांना सहानुभूती दाखवणारे आतले-बाहेरचे तोंडावर पडतात हा अनुभव आहे. सुधीर मुनगंटीवारांनी मध्यस्थी करून खडसेंशी बोलावं असा एक प्रयत्न भाजपमध्ये चाललाय. रक्षा खडसेंकडे जळगाव जिल्ह्याचं भाजपचं नेतृत्व देऊन गिरीश महाजनांना बाजूला करावं या पर्यायाची चर्चा पक्षात होतेय; पण अजून त्याला वरून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.

कोरोना-काळातही लाच खाताना लाज कशी वाटत नाही?

राज्यात सध्या दिवसाआड एकदोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले जाताहेत. महामारीत महाभ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशींना साडेचार लाखांची लाच घेताना अटक झाली, तत्पूर्वी जळगावच्या एसडीओ पकडल्या गेल्या. अमरावतीत वनाधिकाºयास पाच लाखाच्या लाच प्रकरणात रंगेहाथ पकडलं. नागपूरचे जिल्हा कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाणही असेच अडकले. त्यांना निलंबित करा म्हणून दोनवेळा प्रस्ताव पाठवूनही मंत्रालयात दाबून ठेवला गेला. एका राज्यमंत्र्यांचा पीए त्यामागचा सूत्रधार होता. जालन्यात तीन आरोग्य अधिकारी स्टिंगमध्ये अडकले. राजपत्रित अधिकारी महासंघ म्हणतो, पगारात भागवा, पण अधिकारी म्हणतात पगाराला हात लागला नाही पाहिजे. जे पकडले जातात त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने पैसे खाणारे अधिकारी मोकळे फिरताहेत. मंत्रालयात देवाणघेवाण संस्कृती वाढली आहे. तरीही महासंघाला निवृत्तीचं वय ६० वर्षे करून पाहिजे. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ म्हणतात, दुष्काळ आवडे सर्वांना. इथे मात्र, ‘कोरोना आवडे सर्वांना’ असंच झालंय.

सहज सुचलं...

तुकाराम मुंढे यांनी नागपुरात आपल्याकडे महिलांना पाठवून कपडे फाडण्याचे प्रयत्न झाले असा आरोप केला होता. त्यावर संतप्त भाजपने ‘माफी मागा नाहीतर पोलिसात जाऊ’ असा इशारा दिला होता. मुंढेंनी ना खुलासा केला, ना माफी मागितली. भाजपने तक्रार केलीच नाही.

... मुंढेंचे आरोप खरे होते की काय?
जिगरबाज मुंढे जाता जाता भारी पडले.

Web Title: Kangana Ranaut thithyata on the Shiv Sena backfoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.