कन्हैयामुळे मिळाला ‘आझादी’ला नवा अर्थ
By admin | Published: March 7, 2016 01:02 AM2016-03-07T01:02:47+5:302016-03-07T01:02:47+5:30
गेल्या आठवड्यात आपल्याला लोकशाहीतील एक आश्चर्य पाहायला मिळाले. महिनाभरापूर्वीपर्यंत ज्याची कोणी दखलही घेतली नसती असा २८ वर्षांचा एक विद्यार्थी देशद्रोहाच्या आरोपावरून तीन आठवडे तिहार तुरुंगात
विजय दर्डा (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
गेल्या आठवड्यात आपल्याला लोकशाहीतील एक आश्चर्य पाहायला मिळाले. महिनाभरापूर्वीपर्यंत ज्याची कोणी दखलही घेतली नसती असा २८ वर्षांचा एक विद्यार्थी देशद्रोहाच्या आरोपावरून तीन आठवडे तिहार तुरुंगात राहून जामिनावर सुटून बाहेर आला व त्यानंतर दोन तासांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येऊन त्याने विद्यार्थ्यांसमोर ४५ मिनिटे जे उत्स्फूर्त भाषण केले ते देशभरातील वृत्तवाहिन्यांवर ‘लाइव्ह’ प्रक्षेपित केले गेले. त्यानंतर सर्व सीमा ओलांडून त्या भाषणाने सोशल मीडियाही व्यापून टाकला. क्षणार्धात सर्व बदलून टाकण्याच्या हल्लीच्या जमान्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार बघता बघता राजकीय ‘सेलेब्रिटी’ झाला. मी विद्यार्थी आहे व अभ्यास हेच माझे मुख्य लक्ष्य आहे, असे तो सांगत असला, तरी मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या दोन वर्षात सर्व विरोधी पक्षांना मिळून जे जमले नाही ते कन्हैयाकुमारने या एका भाषणाने साध्य केले. भाजपा/रा. स्व. संघ/ मोदी सरकारविरुद्धच्या संघर्षास त्याने सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत नवा आयाम दिला. आम जनतेला सहज समजेल, पटेल अशा भाषेत तो बोलला व त्याच्या तोंडून निघालेल्या ‘आझादी’ या शब्दास नवा अर्थ प्राप्त झाला. तोपर्यंत कन्हैया काश्मीरच्या आझादीबद्दल बोलत असावा, असे म्हटले गेले. मात्र आता त्याची ‘आझादी’ जातीयवाद, पिळवणूक, गरिबी व भूक यांच्यापासून मिळवायची मुक्ती झाली असून, आता ती घोषणा देशविरोधी राहिलेली नाही.
तुरुंगातून बाहेर आलेला कन्हैयाकुमार हा संवेदनशील हृदयाचा, स्पष्ट विचारांचा, भावनाप्रधान पण तरीही कोणाहीविषयी मनात कटुता व शत्रुत्व न बाळगणारा तरुण म्हणून देशासमोर आला. वयाच्या मानाने त्याच्यात खूपच परिपक्वता दिसली. अटकेपासून जामिनावर सुटकेपर्यंतच्या तीन आठवड्यांच्या काळात सोसावा लागलेला छळ, मानखंडना व उद्विग्नता हे सर्व मागे ठेवून स्वच्छ मनाने पुढे पाहण्याच्या त्याच्या दृष्टीने बिहारच्या बेगुसराईसारख्या मागासलेल्या जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात त्याच्यावर झालेले सुसंस्कारच दिसून आले. एक महिन्यापूर्वी कन्हैयाकुमारची पूर्वकल्पना करणे जसे शक्य नव्हते तसेच त्याच्या भावी मार्गक्रमणाचे भाकीत करणेही कठीण आहे. या संधीचा फायदा घेऊन तो राजकारणाच्या मुख्य प्रवाहात उडी घेणार का, हा खरा प्रश्न नाही. एका विद्यार्थी नेत्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घ्यावे व बाहेरच्या जगातही चर्चेचा विषय व्हावे अशी परिस्थिती कशामुळे निर्माण झाली हा खरा विचार करण्याचा मुद्दा आहे.
रा. स्व. संघ/भाजपाची विचारसरणी आणि संघ परिवाराच्या तालावर नाचत मोदी सरकार करीत असलेला कारभार यातून कन्हैयाकुमार उभा राहिला आहे, हे समजणे काही कठीण नाही. भारताच्या बहुढंगी संस्कृतीशी रा. स्व. संघ/भाजपाची विचारधारा कधीही मेळ खाणारी नव्हती व आपले विचार इतरांवर लादण्याचा संघ परिवाराचा सतत प्रयत्न सुरू असतो. जेएनयू हे त्यांना आपल्या विचारांच्या पूर्णपणे विरोधात वाटते व म्हणून तर डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ‘देशविरोधी’ असे लेबल लावून जेएनयू बंद करून टाकण्याची भाषा केली. जेएनयूच्या विद्यार्थ्यांचे समर्थन केल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले त्यातूनही हीच भावना दिसून येते. कन्हैयाकुमारविरुद्ध ज्या तत्परतेने देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तो योग्य ठरविण्याचा अट्टहास केला गेला त्यावरून रा. स्व. संघाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी मोदी सरकार किती तत्पर आहे हेच स्पष्ट होते. पण मोदी सरकारचे हे वागणे २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनतेने त्यांना दिलेल्या भरघोस जनाधाराच्या पूर्णपणे विरोधात जाणारे आहे. लोकसभेत २८२ सदस्यांचे बहुमत असलेल्या सरकारने राज्यसभेत सहकार्याची भूमिका ठेवून थोडी देवाण-घेवाण करण्याची तयारी दर्शविली असती तर महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसंबंधीची विधेयके मार्गी लावणे या सरकारला सहज शक्य झाले असते. संसदेत विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे मोदी सरकारला जनतेने ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेवर निवडून दिले आहे, रा. स्व. संघाचा अजेंडा राबविण्यासाठी नाही. राष्ट्रवाद व देशभक्ती ही फक्त आपलीच मक्तेदारी आहे व जे कोणी याला साथ देणार नाहीत ते सर्व देशद्रोही आहेत, अशी संघवाल्यांची अरेरावी सुरू असते. समाजात फूट पाडणाऱ्या या विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम काही घटना घडवून आणल्याचे दिसते. पण यातून देशाचे काहीच भले होत नाही. संघाच्या व्याख्येनुसार देशाची ‘देशभक्त’व ‘देशद्रोही’ अशी विभागणी करून कोणाचे हित साधले जाणार आहे?
कोणाही मुरब्बी राजकारण्यास पूर्वी जमले नाही एवढ्या सहजपणे कन्हैयाकुमारने या फुटपाडू प्रवृत्तींचे पितळ उघडे पाडले म्हणूनच तो लोकांच्या हृदयाला हात घालू शकला. सैनिक हाही शेतकऱ्याचाच मुलगा असतो. सैनिक देशासाठी सीमेवर प्राणांची बाजी लावतो तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत, असे सांगून कन्हैयाकुमारने तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या जुन्या घोषणेलाही वेगळा संदर्भ दिला. पोलीससुद्धा माझ्यासारखे शेतकऱ्याचीच अपत्ये आहेत, असे त्याने सांगितले तेव्हा त्याच्या ९ फेब्रुवारीच्या मूळ भाषणाचे छेडछाड केलेले व्हिडीओ पाहून त्याच्यावर दंडुका उगारणाऱ्या पोलिसांच्या हृदयालाही हात घातला गेला. मोदी सरकारच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा हा कालखंड आहे. दोन महिन्यांत पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनी मोदींची कसोटी लागणार आहे. या निवडणूक प्रचारात मोदी आता कोणत्या पातळीपर्यंत विखार पसरवितात याची लोक श्वास रोखून प्रतीक्षा करीत आहेत.
विकासाच्या दिशेने खंबीर पावले टाकणारा एकमेव देश म्हणून जग भारताकडे पाहत आहे. अशा कसोटीच्या वेळी देशाचे नेतृत्व करताना चतुर धोरणबाज व जनतेची अचूक नाडी ओळखणारा नेता म्हणून ओळख असलेल्या मोदींनी अशा फुटपाडू वातावरणास वाव द्यावा याचे कोडे पडते. पण एक मात्र नक्की की, यामुळे सरकारची गाडी विकासाच्या अजेंड्याच्या मुख्य मार्गावरून भरकटत आहे. म्हणजेच देशाला याची किंमत मोजावी लागत आहे.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
बहुसंख्य मध्यमवर्गीय नोकरदारांना भविष्यनिर्वाह निधी हाच निवृत्तीनंतरचा मोठा आधार असतो. इतर सर्व गोष्टी सोडून वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या फंडातील पैशांवरही प्राप्तिकर लावण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात करावा, हे धक्कादायक आहे. यातून सरकारला किती महसूल मिळेल हे नक्की माहीत नाही पण समाजाचा जो वर्ग भाजपाला आपला पक्ष मानतो अशा वर्गात यामुळे नक्कीच पक्षाविषयी कटुता निर्माण झाली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना जेटली ही चूक सुधारतील, अशी आशा करू या.