कपिल शर्मा काट्रॅजेडीशो

By Admin | Published: September 11, 2016 03:35 AM2016-09-11T03:35:42+5:302016-09-11T04:14:08+5:30

विनोदवीर कपिल शर्माने मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे लाच मागितल्याचे टिष्ट्वट केले आणि त्याचे टिष्ट्वट त्याच्याच अंगलट आले

Kapil Sharma CastraZedisho | कपिल शर्मा काट्रॅजेडीशो

कपिल शर्मा काट्रॅजेडीशो

googlenewsNext

विनोदवीर कपिल शर्माने मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे लाच मागितल्याचे टिष्ट्वट केले आणि त्याचे टिष्ट्वट त्याच्याच अंगलट आले. शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याच्यावर उगारलेल्या टीकास्त्रानंतर कपिलने सारवासारव केली. आपण केवळ काही व्यक्तींच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. भाजपा, मनसे किंवा शिवसेना अशा कोणत्याही पक्षाविरुद्ध आरोप केलेले नसल्याचे त्याने म्हटले. मात्र या वेळी झालेल्या टोलेबाजीने रंगलेल्या राजकारणात कपिलचे टिष्ट्वट ‘हास्यास्पद’ ठरले. आणि याचनिमित्ताने महापालिका सेलीब्रिटींच्या तक्रारीवर किती सक्षमपणे आणि सर्वसामान्यांच्या तक्रारीवर किती शिथिलपणे कार्यवाही करते याची प्रचिती आली.
शुक्रवारी भल्या पहाटे ५ वाजून ५३ मिनिटांनी विनोदवीर कपिल शर्माने मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे लाच मागितल्याचे टिष्ट्वट केले. मात्र कार्यालयाच्या बांधकामासाठी लाच दिल्याचे कपिल सांगतोय, ते कार्यालयच अनधिकृत असल्याचे समोर आले. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेनेही कपिल याला पत्र पाठवत लाचखोर अधिकाऱ्याच्या नावाचा खुलासा करावा. त्यामुळे आम्हाला योग्य ती कारवाई करता येईल, असे म्हटले. प्रत्यक्षात मात्र कपिल याने अद्यापही लाचखोर अधिकाऱ्याच्या नावाबाबत मौन बाळगले आहे. शिवसेना आणि मनसेने केलेल्या टीकेनंतर शुक्रवारी रात्री कपिल याने पुन्हा आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी कपिलने केलेला कांगावा यानिमिताने लोकांसमोर उघड झाला आहे. कपिलने केलेल्या टिष्ट्वटमुळे सोशल नेटवर्क साइट्सवर झालेला धुमाकूळ, महापालिकेने केलेली सारवासारव, राजकीय पक्षांनी कपिलवर केलेले आरोप आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे महापालिकेला केलेले आवाहन; या घडामोडींमुळे सेलीब्रिटींना एखाद्या प्रशासनाने किती महत्त्व द्यावे? हा मुद्दाही यानिमित्ताने पुढे आला आहे. महापालिकेने यापूर्वीही अनेक सेलीब्रिटींना अशा प्रकरणात नोटीस बजावली आहे. मात्र कालांतराने त्याकडे झालेले दुर्लक्ष आणि प्रकरणाचे झालेले राजकारण अशा अनेक मुद्द्यांमुळे मूळ मुद्दा बाजूलाच पडल्याचे चित्र आहे.


वादग्रस्त कपिल
कपिल शुक्रवारी पुन्हा एकदा चर्चेत आला. पण, हे नवीन नाही. कारण, याआधी अनेकदा शोमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे कपिल गोत्यात आलेला आहे. त्यातील काही उदाहरणे

कपिलने याआधी शोमध्ये देशातील रस्त्यांच्या स्थितीवर वक्तव्य केले होते. रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांची खिल्ली उडवताना कपिल म्हणाला होता, ‘या रस्त्यावरून प्रवास करताना गर्भवतींची प्रसूती होईल’. या वक्तव्यावर आक्षेप घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कपिल विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

कपिलच्या शोमध्ये एका परिचारिकेची व्यक्तिरेखा आहे. ही परिचारिका ग्लॅमरस दाखवण्यात आली आहे. पण, परिचारिका अशा पद्धतीने रंगवल्यामुळे परिचारिका दुखावल्या गेल्या होत्या. अमृतसर येथील काही वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिका कपिल विरुद्ध बदनामीचा गुन्हा दाखल करण्याच्या विचारात होत्या. कारण, परिचारिकांचा अपमान होत असल्यांचे परिचारिकांचे म्हणणे होते.

2015 मध्ये कपिल त्याच्याबरोबरच्या अभिनेत्रींशी वाईट वागल्याचेही समोर आले होते. इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्ड्सदरम्यान मोनाली ठाकूर, तनिषा मुखर्जी आणि अजून काही सहनायिकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप कपिलवर करण्यात आला होता. पण यावर कपिलने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.

जुलैमध्ये पालिकेने दिली होती नोटीस
टिष्ट्वटनंतर कपिलनेच पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. अंधेरी येथील कपिलचे कार्यालय अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. रो हाऊस आॅफिसचे बांधकाम थांबवावे अशी नोटीस १६ जुलै रोजी पालिकेने दिली होती. नोटीसला उत्तर देण्यासाठी कपिलला २४ तासांची मुदत दिली. ४ आॅगस्ट रोजी त्या बांधकामावर पालिकेने कारवाई केली. कपिलचा गोरेगाव येथे एक फ्लॅट आहे. तेथे त्याने केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे पालिकेने २८ एप्रिलला कपिलला एक नोटीस पाठविली होती. याचप्रकरणी २३ जूनला त्याला दुसरी नोटीस पाठविण्यात आली होती.

नावाचा खुलासा कधी?
महापालिकेच्या दक्षता विभागाचे मुख्य अभियंता मनोहर पवार यांनी कपिल शर्मा याने लाचखोर अधिकाऱ्याच्या नावाचा खुलासा करावा. त्यामुळे आम्हाला योग्य ती कारवाई करता येईल, असे म्हणणे यापूर्वीच मांडले आहे. त्यामुळे कपिल आता लाचखोर अधिकाऱ्याच्या नावाचा खुलासा कधी करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

राखीव जागेवर व्यावसायिक बांधकाम
वर्सोव्यात ज्या ठिकाणी हे कार्यालय बांधण्यात येत आहे; तो भाग रहिवासी बांधकामासाठी राखीव आहे. मात्र येथे व्यावसायिक बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे.

सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’ केव्हा
कपिलने टिष्ट्वटमध्ये आपण आतापर्यंत १५ कोटींचा कर भरल्याचे म्हणत ‘हेच का अच्छे दिन?’ असा सवालही उपस्थित केला. मात्र कपिलसारखा आवाज सामान्य मुंबईकरांकडून सातत्याने उठवला जातो तेव्हा महापालिकेकडून काहीच कारवाई केली जात नाही. परिणामी सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, असा सवालही वॉचडॉग फाउंडेशनने केला आहे.

लाच कधी मागितली होती?
शुक्रवार सकाळपासूनच टिष्ट्वटरवर कपिलच्या टिष्ट्वटमुळे गदारोळ माजला होता. त्याच्या टिष्ट्वटमध्ये लाच मागितली असल्याचा अस्पष्ट उल्लेख केला आहे. पण, नक्की कधी आणि कुठे लाच मागितली होती याविषयी स्पष्टीकरण दिले नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक चर्चा करताना लाच कोणी, कधी मागितली याविषयी खुलासा करेन असेही म्हटले आहे.

आता महापालिकेच्या कारवाईकडे लक्ष
या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले. कपिलने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते लाचखोरी प्रकरणात मध्यस्थी करत असल्याचा आरोप केला. यावर महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कपिलला आरोप सिद्ध करण्याचे आव्हान देत मुंबईत त्याचे शूटिंग कुठेही चालत असल्यास ते बंद पाडू, असा इशारा दिला. यावर कपिलने आपण केवळ काही व्यक्तींच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. भाजपा, मनसे किंवा शिवसेना अशा कोणत्याही पक्षाविरुद्ध आरोप केलेले नाहीत, असे म्हणत सारवासारव केली.


राजकारणास कारण की...
कपिल याने केलेल्या टिष्ट्वटनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले. मात्र त्यानंतर महापालिकेत तापलेल्या राजकारणाने कपिलच्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा बाजूलाच पडला. राजकीय पक्षांनी कपिलवर तोफ डागत आपआपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे आमदार नितेश
राणे, महापालिकेच्या सभागृह नेत्या
तृष्णा विश्वासराव, महापालिकेतील
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर या सगळ्यांनीच कपिल प्रकरणावर टीकास्त्र सोडत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. मात्र सर्वसामान्यांच्या जेव्हा महापालिकेकडे तक्रारी येतील; तेव्हा त्यांना न्याय कोण देणार? हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच आहे.

प्रासंगिक
सचिन लुंगसे, पूजा दामले

Web Title: Kapil Sharma CastraZedisho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.