करम की गती न्यारी...
By Admin | Published: January 6, 2017 11:36 PM2017-01-06T23:36:39+5:302017-01-06T23:36:39+5:30
सूर्यबिंब क्षितिजावर येण्यापूर्वीच सृष्टी तेजाळली. पहाटेची चाहूल लागताच फुले उमलली.
सूर्यबिंब क्षितिजावर येण्यापूर्वीच सृष्टी तेजाळली. पहाटेची चाहूल लागताच फुले उमलली. पाखरांची चिवचिव सुरू झाली. नव्या वर्षाचे नवे पान केव्हाच उघडले आहे. पण अजूनही ते जाणवते आहे. नवे वर्ष चांगले जाईल अशी उमेद, असा विश्वास प्रत्येक व्यक्ती मनात बाळगत असते आणि भेटणाऱ्या घरच्या आणि बाहेरच्या साऱ्यांना ‘हे वर्ष आनंदाचे जावो’ अशा शुभेच्छा प्रसन्नपणे, दिलखुलासपणे देत असते.
‘गेल्या गोष्टी स्मरू नका! गतकाळाचा शोक फुका’ यातील मर्म लक्षात घेऊन सरत्या वर्षातील जिवापाड कष्ट, मतभेद, राग, द्वेष सारे विसरण्याचा प्रयत्न करायचा असा नववर्षाचा प्रत्यक्षात आणायला कठीण असा एक संकल्प समोर ठेवता येतो. गेलेल्या प्रत्येक वर्षासारखेच एका छापाचे हेही वर्ष असा उदास सूरही नको.
जसे अर्धवट उमललेले, न चुरडलेले, न चुरगळलेले पण सुगंधाने घमघमणारे फूल असते, तसेच अज्ञात भविष्य घेऊन येणारे अम्लान नवे वर्ष असते. भविष्यकाळ वा अज्ञाताविषयीची अनावर ओढ प्रत्येकाला अस्वस्थ करते. हा क्षणभराचे वर्तमान घेऊन येणारा प्रत्येक काळ, कर्तृत्व गाजवायला पुकारत असतो. ‘करम की गत न्यारी’ म्हणत काही अनुत्तरित प्रश्नही विचारवंतांनी विचारले आहेत. बगळ्याला पांढराशुभ्र वर्ण तर पंचमात गाणारा कोकिळ काळा का? नदीचे पाणी गोड तर समुद्राचे पाणी खारे का? विद्वानांना दारिद्र्याचा शाप तर मूर्खांच्या वाट्याला राज्यपद कसे?
महाभारतातील कर्णाने सडेतोडपणे म्हटले आहे की कोणत्या कुळात जन्माला येणार हे दैवाधीन असले तरी नाव कमावणे हे तर प्रत्येकाच्या हातात असते. तरीही आपल्या अपयशाचे खापर कुटुंबावर, समाजावर, परिस्थितीवर नाहीतर ‘पाषाणाचे पोटी बैसला दुर्दूर (बेडूक)। तयामुखी चार कोण घाली’ असे दैवाला श्रेय दिले जाते.
भावनिक तोल साधायला सख्खे भावंडही आजच्या काळात दुर्मिळ झाले आहे. नाती लयास जाण्याच्या मार्गावर आहेत. दुसऱ्यांना अपयश आले तर मला काय त्याचे? माझ्या वाट्याला फक्त यशच यावे ही जिद्द पराकोटीला पोहोचते आहे. आई-वडिलांचे किमती मार्गदर्शक वागणे मुलांच्या वाट्याला अनेकदा येत नाही किंवा ज्यांना मिळते त्यांना त्याची किंमत वाटत नाही.
तरीही गाण्याची मधुर धून मनाला मोहवते. व्याधींनी ग्रासले जीव पाहिले की, वाट्याला आलेली वर्षे आपण कुरकुरत का घालवतो हा प्रश्न जागतो. कोवळ्या पालवीवर प्रकाशाची तिरीप नाचावी तसे प्रतिभावंतांच्या कार्याची आठवण होऊन चेहऱ्यावर समाधान जागते. गरिबी, अपयश, मानापमान ही काटेरी दु:खे, धन-चैन सारे विसरून तन्मयतेने ध्येयवेडे लोग जग घडवतात. कृतीतून सांगतात की ‘स्वत:चे उन्नयन स्वत:च्याच हातात असते. ‘उद्धरेदात्मनात्मानं’ हे गीतेचे (अ ६.५) सांगणे आहे. नव्या वर्षात त्याची आठवण मनात सतत ठेवणे हेच यशाकडे नेऊ शकेल.
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे