गर्भातल्या कळ्या खुडणारे ‘कसाब’!
By admin | Published: March 10, 2017 05:37 AM2017-03-10T05:37:05+5:302017-03-10T05:37:05+5:30
सरकार ‘बेटी बचाओ’ मोहीम अग्रक्रमाने राबवत आहे; तरीही स्त्री भ्रूणहत्त्या सुरूच आहेत. त्या रोखण्यासाठी कायदा आणखी कठोर करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले असले
- वसंत भोसले
सरकार ‘बेटी बचाओ’ मोहीम अग्रक्रमाने राबवत आहे; तरीही स्त्री भ्रूणहत्त्या सुरूच आहेत. त्या रोखण्यासाठी कायदा आणखी कठोर करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले असले तरी केवळ कठोर कायदे करून या हत्त्या थांबणार नाहीत. व्यापक जनजागृतीद्वारे समाजाची मानसिकता बदलली तरच ते शक्य होईल.
जागतिक महिला दिन सर्वत्र वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा झाला. त्याचवेळी सांगली जिल्हाच नव्हे तर अवघा दक्षिण महाराष्ट्र चर्चेत आला तो गर्भातल्या कळ्या खुडणाऱ्या ‘डॉक्टर’नामक कसाबांच्या करणीने. कसाबांचे हे रॅकेट आंतरराज्यीय आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील बेकायदा गर्भपात केंद्राचा पोलिसांनी छडा लावला अन् या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी म्हैसाळ येथे खुडलेल्या कळ्यांचे १९ मृतदेह गावातीलच एका ओढ्याकाठी खुदाई करून शोधून काढले अन् सांगलीच नव्हे तर कोल्हापूर जिल्हाही हादरून गेला.
बाबासाहेब खिद्रापुरेनामक होमिओपॅथी डॉक्टर हे गर्भपात केंद्र चालवत होता. हा डॉक्टर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कनवाड गावचा. त्याने म्हैसाळ येथे स्वत:चा दवाखाना थाटून त्यातच हे केंद्र चालविले होते. याप्रकरणी पोलिसांनी कर्नाटकातील कागवाड आणि विजापूर येथे छापे टाकून खिद्रापुरेला सहकार्य करणाऱ्या आणखी दोन डॉक्टरांसह सहाजणांना अटक केली आहे. या दोन्ही डॉक्टरांच्या रुग्णालयांवर छापे टाकून तेथील सोनोग्राफी मशिन्स आणि अन्य साहित्यासह काही कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. हे दोन्ही डॉक्टर गर्भलिंग निदान करत होते. मुलीचा गर्भ असेल तर तो काढून टाकण्यासाठी खिद्रापुरेकडे पाठवत होते, असा पोलिसांचा संशय आहे. पोलीस तपासात त्यांचे आणखी कारनामे उघड होतीलच; पण गेली आठ वर्षे डॉ. खिद्रापुरे हा उद्योग करत होता, ते समाजातील सुज्ञांना किंवा पोलिसांना कसे कळले नाही, हा एक प्रश्नच आहे.
‘मुलगा हा वंशाचा दिवा, मुलगी म्हणजे परक्याचे धन’ ही समाजाची मानसिकता जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत हे असले ‘कसाबखाने’ चालूच राहणार हे उघड सत्य आहे. कारण महिलांना समानतेचा दर्जा देण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या, कायदे करून संधी दिली तरी आजही ‘आपल्याला मुलगाच हवा; मुलगी नको,’ असे म्हणणाऱ्यांची संख्या जादा आहे. त्यांच्यामुळेच खिद्रापुरेसारख्या कसाबांचे फावते. स्त्रीभ्रूणहत्त्येवर कायद्याने बंदी आहे. याप्रकरणी चार वर्षांच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे; तरीही आर्थिक लाभाच्या मोहाने डॉक्टर कळ्या खुडण्याचा उद्योग करतात अन् ‘मुलगी नको’ या मानसिकतेत असलेली जोडपी हजारो रुपये मोजून स्वत:च्या रक्ताच्या कळ्या खुडतात.
हा मामला ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असल्यामुळे सारे काही बिनबोभाट चालू असते. असे असले तरी अशा केंद्रांची कुणकुण लागताच पोलीस कारवाई होत असते. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथील पिंटू रोडे याचे बेकायदा गर्भपात केंद्र पोलिसांनी गेल्याच महिन्यात उघडकीस आणले होते. बीड जिल्ह्यातील डॉ. सुदाम मुंडे प्रकरण अजूनही ताजे आहे. याशिवाय सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत इस्लामपूर, ताकारी, सावळज, दिघंची येथील बेकायदा गर्भपात केंद्रांवर छापे टाकून पोलिसांनी संबंधित डॉक्टरांना अटक केली होती. त्यातील काही डॉक्टरांना न्यायालयाकडून सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली गेली आहे; तरीही गर्भातल्या कळ्या खुडण्याचे प्रकार थांबत नाहीत. कायद्यातील पळवाटा शोधून अथवा बेकायदेशीरपणे गर्भपात केंद्रे चालविली जातात.
सरकार ‘बेटी बचाओ’ मोहीम अग्रक्रमाने राबवत आहे. कोल्हापूरने तर ‘सेव्ह द बेबी गर्ल’सारखा उपक्रम राज्याला दिला आहे. तरीही स्त्रीभ्रूणहत्त्या सुरूच आहेत. त्या रोखण्यासाठी आणखी कठोर कायदा करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केले आहे. मात्र, केवळ कठोर कायदे करून हे थांबणार नाही. त्यासाठी जनजागृतीद्वारे समाजाची मानसिकता बदलली तरच ते शक्य होईल.