पाकिस्तानी 'थिंक टँक'ला आवडली मोदी-शहांची हिंमत; 'या' खेळीला दिले 'शत-प्रतिशत'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 06:41 PM2019-08-08T18:41:11+5:302019-08-08T20:27:52+5:30
काश्मीरसाठी मध्यस्थी करण्याची भाषा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती आणि त्याचा बराच गाजावाजा पाकिस्तानमध्ये करण्यात आला.
- प्रशांत दीक्षित -
काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या भारताच्या धाडसी पावलाकडे पाकिस्तानमधील स्तंभलेखक, ज्येष्ठ पत्रकार व डिप्लोमैट कसे पाहात आहेत हे पाहणे उद्बोधक ठरेल. पाकिस्तान संसदेमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह सर्व पक्षांनी भारतविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि भारताबरोबरचे संबंधही कमी केले. ही त्या देशाची राजकीय भूमिका झाली. तेथील थिंक टँक या घटनेकडे कसे पाहात आहेत हेही महत्वाचे आहे.
पाकिस्तानमधील मान्यवर स्तंभलेखकांच्या मते ३७० कलमाखाली काश्मीरला मिळणारी स्वायत्तता संपणे ही भारतीय राज्यघटनेपुरती मर्यादित गोष्ट नसून भारताने यातून काही वेगळे संदेश जगाला दिले आहेत. भारत-पाक संबंधांचा पटच हा निर्णय घेऊन मोदी सरकारने बदलून टाकला आहे. काश्मीरवर भारताचा पूर्ण ताबा असल्याचे भारताने पाकिस्तान व जगाला दाखवून दिले. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठराव संसदेत अनेकदा झाले आहेत. परंतु, यावेळी केवळ ठराव न करता जम्मू-काश्मीरचे विभाजन करून त्या राज्याला केंद्रशासित प्रदेश करणे या बाबी केवळ ठराव करण्याच्या बऱ्याच पुढच्या आहेत. काश्मीरच्या जमिनीवर कोणाचा ताबा आहे हे निर्विवादपणे दाखवून देण्यात भारत यशस्वी ठरला. नेहरूंच्या काळात झालेले युनोमधील काश्मीरविषयक ठराव आणि बांगलादेश युद्धाच्या विजयानंतर इंदिरा गांधींनी केलेला सिमला करार या दोन महत्वाच्या ठरावांना भारताने आता केराची टोपली दाखविली आहे.
काश्मीरमध्ये सामान्य स्थिती निर्माण होईपर्यंत जम्मू-काश्मीर व लडाखच्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेत कोणतेही परिवर्तन केले जाणार नाही असे या दोन ठरावांमध्ये ढोबळमानाने मान्य करण्यात आले होते. हे भारताप्रमाणे पाकिस्तानलाही लागू होते. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीही बदल करू नयेत असे अपेक्षित होते.पाकिस्तानने हे आश्वासन फारसे पाळले नाही. पण आता भारतानेही पाकिस्तान वा युनोला न विचारता काश्मीरमध्ये आपल्याला हवे तसे बदल करून घेतले.
गेल्या वर्षी बलुचिस्थान व अन्य वादग्रस्त भागात पाकिस्तानने असेच बदल केले होते. तेव्हा भारताने निषेध नोंदला होता. पण पाकिस्तानने त्याकडे लक्ष दिले नव्हते. तोच डाव आता भारताने पाकिस्तानवर उलटविला आहे. युनोचा ठरावच अप्रत्यक्षपणे धुडकावून लावल्यामुळे काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचा प्रश्नही बाजूला पडला आहे. पाकिस्तानी पंडितांच्या मते पाकला अस्वस्थ करणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना झटका दिला आहे.
काश्मीरसाठी मध्यस्थी करण्याची भाषा ट्रम्प यांनी केली होती आणि त्याचा बराच गाजावाजा पाकिस्तानमध्ये करण्यात आला. विजयी वीराच्या थाटात इम्रान खान यांचे स्वागत करण्यात आले. पण भारताने काश्मीरचे विभाजन करून ट्रम्प यांना त्यांची जागा दाखवून दिली असे पाकिस्तानमधील नजम सेठींसारख्यांना वाटते. भारताविरोधात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी उघडली पाहिजे अशी जोरदार मागणी पाकिस्तानच्या संसदेत करण्यात आली. मुस्लीम देश,चीन, अमेरिका यांच्याकडून पाकिस्तानला सहाय्य मिळेल असे पाकिस्तानी नागरिक व नेत्यांना वाटते. मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यातील माजी अधिकाऱ्यांना तसे वाटत नाही. भारताला दुखविण्याच्या मनःस्थितीत सध्या जगातील कोणतेही राष्ट्र नाही अशी स्वच्छ कबुली तेथील डिप्लोमैट देतात. सर्व जग पाकिस्तानचे ऐकून घेऊन सहानुभुतीचे दोन शब्द काढतील, पण भारताला कोणी सुनावणार नाही, असे या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. अणुबॉम्ब किंवा पाक लष्कराची तयारी व युद्धाची भाषा याचाही भारतावर आता परिणाम होणार नाही.
मोदींच्या नेतृत्वाखालील भारत बदललेला आहे याची जाण पाकिस्तानमधील जनतेला नसली तरी नेते व परराष्ट्र खात्याला आहे. काश्मीरपेक्षा देशात अन्यत्र दहशतवादी कृत्ये करून भारताला जेरीस आणण्याचे काही प्रयत्न यापुढेही होतील, कदाचित अधिक तीव्र होतील. परंतु, अशा हल्ल्याला कित्येक पट अधिक तीव्रतेने प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताने ठेवली आहे हेही बालाकोटवरील प्रतिहल्ल्यानंतर पाकिस्तान समजून चुकला आहे. पाकिस्तानच्या अणुबॉम्बला किंमत राहिली नसल्याचेही भारताने बालाकोटवरून हल्ल्यातून दाखवून दिले आहे. बालाकोटवरील प्रतिहल्ल्याला जगाचा पाठिंबा भारताने मिळविला ही पाकिस्तानसाठी अधिक चिंतेची बाब आहे. काश्मीरच्या विभाजनाही युएई या देशाने त्वरीत मान्यता दिली याचाही पाकिस्तानला विस्मय वाटते.
युएईमध्ये पाकिस्तानी रहिवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. काश्मीरमध्ये गेले चार दिवस लागू केलेली संचारबंदी, पोलीस व निमलष्करी दलाची मोठी संख्या, विमानदलाची सज्जता या सर्व गोष्टी भारताचे कणखर धोरण दाखवितात.यामुळे पाकिस्तानची सर्व आशा आता काश्मीरमधील जनता काय प्रतिक्रिया देते यावर केंद्रीत झाली आहे. काश्मीरमध्ये जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटावी,मोर्चे निघावेत, ते हिंसक व्हावेत आणि ते रोखताना होणार्या गोळीबारात निदर्शक ठार झाले तर अशा घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी पाकिस्तान कंबर कसेल. काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा दावा पाकिस्तान त्यातून करील. मानवी हक्कांचा विषय काढला तर बडी राष्ट्रे पाकिस्तानच्या म्हणण्याकडे लक्ष देतील असे पाकिस्तानला वाटते.
शेखर गुप्ता यांनीही याच मुद्द्यावर जोर दिला आहे. काश्मीरमध्ये पुढील काळात पोलीस वा निमलष्करी दलांकडून अत्याचार होणार नाहीत याकडे लक्ष देण्याची सूचना गुप्ता यांनी केली आहे. देशात विजयोत्सव साजरा करू नका, रस्ता बराच लांबचा आहे व वाट बिकट आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेत्यांना सांगितले. त्यामागचे इंगित हेच आहे. सध्या पाकिस्तानला आपण खिंडींत पकडले असले तरी अस्वस्थ काश्मीरी तरूणांना हाताशी धरून कुरघोडी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्याने होत राहील हे लक्षात ठेवले पाहिजे.