तीन विभिन्न दृष्टीकोनातील काश्मीरची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 04:42 AM2016-10-27T04:42:56+5:302016-10-27T04:42:56+5:30
- मागील आठवड्यात एका लांबच्या विमानप्रवासात असताना मी विमानतळावरून तीन नवी मासिके विकत घेतली. पहिल्या मासिकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्तीय विचारवंत इंद्रेश कुमार
- रामचन्द्र गुहा
(ज्येष्ठ इतिहासकार आणि स्तंभलेखक)
- मागील आठवड्यात एका लांबच्या विमानप्रवासात असताना मी विमानतळावरून तीन नवी मासिके विकत घेतली. पहिल्या मासिकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्तीय विचारवंत इंद्रेश कुमार यांची मुलाखत प्रकाशित झालेली होती. त्यांना काश्मीरातील पेचप्रसंगावर त्यांचे मत विचारले होते. त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, ‘हा पेचप्रसंग मानवतेच्या भावनेने हाताळला गेला पाहिजे’. त्यांच्या प्रतिक्रियेची सुरुवात चांगलीच होती, पण कुमार पुढे जाऊन म्हणतात की ‘हा मुद्दा सोडवताना इथले बौद्ध, डोग्रा, शीख, गुज्जर आणि इतर काही समुदायांचे म्हणणे आणि अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. एकदा या सर्व समुदायांच्या अडचणी आणि म्हणणे ऐकल्यानंतर त्यांचे लगेच निवारण व्हायला हवे. असे झाले तर सध्याचा पेचप्रसंग लगेच संपेल. जे पाकिस्तान समर्थक आहेत त्यांची सुरक्षा काढून घेतली पाहिजे. एक छोटासा समुदाय पाकिस्तानच्या बाजूने आहे, हा समुदाय तिथे जाऊन राहू शकतो’, असेही कुमार यांनी म्हटले आहे.
कुमार यांच्या शब्दांकडे लक्ष दिले तर जे सहज लक्षात येते की त्यांनी बौद्ध, डोग्रा, शीख आाण गुज्जरांना विशेष ओळख असलेले समुदाय म्हटले आहे. पण काश्मीरातील मुसलमानांना जे या सर्व पेचप्रसंगात सर्वात पुढे आहेत त्यांना कुमार यांनी उर्वरित आणि इतर काही समुदाय असे म्हटले आहे. कदाचित कुमार यांना काश्मीरी मुसलमानांचेही प्रश्न असू शकतात हे वास्तव मान्य नसावे. खरे तर सध्याच्या पेचप्रसंगात तिथल्या मुसलमानांच्या अडचणी आणि प्रश्न इतरांपेक्षा तीव्र आणि दीर्घकालीन आहेत. कुमारांच्या शब्दांवरून असे लक्षात येते की काश्मीरी मुसलमानांविषयी एक प्रकारचा गैरसमज त्यांच्या मनी असावा. असा गैरसमज जर संघ प्रेरित भाजपा सरकारचा असेल तर ते काश्मीरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कसा प्रयत्न करू शकतील? कुमार यांची मुलाखत काश्मीरातील खालच्या स्तरावरील परिस्थितीशी फारकत घेणारी होती.
दुसरा एका लेख याच्या नेमका उलटपक्षी होता. तरुण पत्रकार प्रवीण डोंथी यांनी त्यांच्या काश्मीरातील प्रवासादरम्यान तिथल्या लोकांशी साधलेल्या संवादावर हा लेख होता. या लेखाच्या माध्यमातून त्यांनी काश्मीरातील मोठ्या समुदायाच्या वास्तवतेशी भारतीयांचा तुटलेला संपर्क साधण्याचे काम केले आहे. डोंथी यांनी वाचकांचा परिचय सध्या काश्मीरात उद्भवलेल्या पेचप्रसंगाशीे निगडित लोकांच्या संवेदनांशी करून दिला आहे. यात काही असे लोक आहेत ज्यांच्या मुलांनी पोलीस आणि अर्धसैनिक बलांच्या गोळीबारात जीव गमावला आहे.
जे लोक असा विचार करतात की काश्मीरातला पेचप्रसंग हा केवळ पाकिस्तानी हस्तक्षेपातून निर्माण झाला आहे, त्यांना डोंथी यांनी वेगळ्या वास्तवाशी ओळख करून दिली आहे. या लेखाच्या शेवटी सय्यद अली शाह गिलानी यांना लोकशाही आणि स्वातंत्र्याचे अग्रणी म्हणण्यात आले आहे, ही एक गोष्ट मात्र निराशाजनक आहे. काश्मीरी युवकांमध्ये गिलानी लोकप्रिय असतील पण ही राजकीय विचारसरणी पूर्णपणे प्रतिगामी आहे. गिलानी यांचा भर इस्लामी राष्ट्र निर्माणावर आहे व ते तसे बोलूनही दाखवतात. ते म्हणतात की मुसलमानांनी प्रत्येक कृतीत इस्लामला अनुसरून चालले पाहिजे. गिलानी यांचा विश्वास आहे की खरा मुसलमान ज्या लढ्यात सहभागी होतो, तो लढा इस्लामच्या हिताचाच असतो.
तिसऱ्या मासिकात सुद्धा काश्मीरवरच एक लेख होता, तो पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ परवेज हुडभॉय यांनी लिहिला आहे. हुडभॉय हे स्वतंत्र विचारांचे आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. ते आझादीची चळवळ नव्वदच्या दशकात कशा प्रकारे बदलली याबद्दल लिहितात. त्यांनी लक्षात आणून दिले आहे की, पाकिस्तानने त्या काळात स्थानिक बंडाळीला हवा घालण्याचे काम केले आहे. भारतीय सैन्य दलाकडून झालेल्या अतिरेकामुळे पाकिस्तान पुरस्कृत मुजाहिदीन दहशतवाद्यांचे कृत्य झाकले गेले होते. काश्मीरी पंडितांचे हत्यासत्र, भारताशी निष्ठा दाखवणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करणे, काश्मीरी राजकारण्यांची हत्या, चित्रपटगृहांची आणि मद्य दुकानांची नासधूस, महिलांना बुरखा वापरण्याची सक्ती करणे आणि शिया-सुन्नी वाद उकरून काढून त्यांनी काश्मीरी स्वातंत्र्य युद्धाचे औचित्य पोकळ करून टाकले होते, शिवाय काश्मीरी लोकांच्या हातातले प्रभावी शस्त्र म्हणजे उच्च पातळीची नैतिकता काढून घेतली होती.
हुडभॉय हे विचारवंत नाही, तर अभ्यासक आहेत. ज्या प्रमाणे रा.स्व.संघ मुसलमानांना काही अडचणी असतील हे नाकारतो त्याच प्रमाणे काश्मीरी विचारवंत हे अमान्य करतात की त्यांच्या चळवळीत संपूर्ण मुस्लीम समुदाय आहे. गिलानी यांच्या सारख्यांच्या नजरेत काश्मीरातील महिला आणि अल्पसंख्यांक हे दुय्यम दर्जाचे नागरिक असतील.
गिलानी यांच्या काश्मीरवरच्या विचारांची तुलना १९४४ सालच्या नया काश्मीर जाहीरनाम्यातील तरतुदींशी होऊ शकते, ज्यात लैंगिक समानतेला महत्व दिले आहे आणि सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांना धार्मिक रंग देण्यास नाकारले आहे. पण वास्तवात काश्मीरी स्वातंत्र्य चळवळ गिलानी आणि इतर गट जसे जैश आणि हिजबुल यांच्या नेतृत्वात सामाजिक आणि नैतिक बाजूंनी खूप मागे फेकली गेली आहे.
सध्या मात्र धार्मिक ध्रुवीकरण आणि काश्मीरी पंडितांचे हत्यासत्र या गोष्टी भारतीय सैन्य दलाकडून झालेल्या ताज्या अतिरेकामुळे झाकल्या गेल्या आहेत. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात निदर्शने वाढली होती तेव्हा छऱ्यांच्या बंदुकांचा (पेलेट गन) वापर करण्यात आला होता. या वापराकडे माध्यमांनी आणि राजकीय वर्गाने लक्ष वेधले होते. पण मध्येच उरी हल्ल्याची घटना घडली आणि राजकीय वर्गासोबत माध्यमांचे लक्ष बदलून पाकिस्तानकडे गेले. पंडितांची हत्या आणि महिलांवर बुरख्याची सक्ती असे प्रकार काश्मीरातील दहशतवाद्यांनी केले असले तरी भारतीय जनता जी काश्मीरी नाही, ती सुद्धा येणाऱ्या प्रत्येक सरकारच्या माध्यमातून तेथील दडपशाहीला दीर्घकाळापासून जबाबदार आहे. हे प्रमाण गेल्या काही महिन्यात आणखीनच वाढलेले आहे.
देशात इतरत्र कुठे जेव्हा विराट कोहली द्विशतक झळकावतो किंवा आर अश्विन दोनशे बळी पूर्ण करत असतो तेव्हा वेगळ्या प्रकारचा विक्र म काश्मीरमध्ये मोडीत निघत असतो. तेव्हा इथली संचारबंदी शंभर दिवस पूर्ण करत असते. कोहली, अश्विन आणि सहकाऱ्यांचे विक्र म भारतीय क्रिकेट संघाची आणि देशाची मान उंचावत असतात. पण काश्मीरात मोडीत निघणारा विक्रम देशाची आणि इथल्या लोकशाहीची मान खाली घालत असतो.