काश्मीरप्रश्न धोकेदायक वळणावर!
By admin | Published: March 30, 2017 12:44 AM2017-03-30T00:44:14+5:302017-03-30T00:44:14+5:30
काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात चादोरा येथे खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेलेल्या
काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात चादोरा येथे खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेलेल्या लष्कर तसेच जम्मू-काश्मीर पोलीस यांच्यावर सुरू झालेल्या दगडफेकीचा प्रतिकार करताना झालेल्या गोळीबारात तीन तरुणांचा मृत्यू झाला आणि बुऱ्हान वाणीच्या मृत्यूनंतर सुरू झालेली हिंंसाचाराची मालिका एका अवघड टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. बडगाम जिल्हा हा शिया मुस्लीमबहुल असलेला जिल्हा. बुऱ्हान वाणीच्या मृत्यूनंतरही येथे देशविरोधी आंदोलनाची धग पोहोचली नव्हती किंबहुना या भागात हजारो शिया तरुणांनी भारताचे तिरंगी झेंडे घेऊन मोर्चाही काढला होता. त्याच भागात आता तरुण पुढे येऊन छाती पुढे करून छातीवर गोळ्या मारा असे शेकडोंच्या संख्येने सांगू लागले आहे. याचा कधीतरी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
आम्हाला एकाच वेळी पाकिस्तान, अतिरेकी आणि नागरिकांशीही लढावे लागले तर ही लढाई जिंंकणे अवघड होईल म्हणूनच दहशतवाद्यांपासून लोकांना वेगळे काढण्यासाठी राजकीय पातळीवरच प्रयत्न झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका यापूर्वीचे उत्तर कमांडचे कमांडर ले. जन. डी.एस. हुडा यांनी घेतली होती. किंबहुना तरुणांच्यामध्ये प्रचंड संताप आहे आणि त्यांच्यावरील हुरियत अथवा कट्टरतावाद्यांचे नियंत्रण कमी होऊ लागले आहे. हे नियंत्रण कमी झाले तर स्थानिक तरुण दहशतवादाकडे वळतील आणि त्याचा फायदा शत्रू राष्ट्रे अथवा शक्ती घेतील ही भीतीही ले. जन. हुडा यांनी व्यक्त केली होती ते त्यांच्या या मतावर आजही कायम आहेत. त्याचवेळी पुण्यात मेजर जनरल (निवृत्त) संजय भिडे यांनी बोलताना लष्कर दहशतवाद्यांना नष्ट करू शकतील मात्र लोकांच्या मनातील विचार नष्ट करू शकत नाही त्यासाठी वेगळे प्रयत्न व्हायला हवे, असे वक्तव्य केले. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची मते सध्याच्या लष्करप्रमुखांपेक्षा वेगळी आहे.
सध्याचे लष्करप्रमुख रावत यांनी जे लोक चकमकीच्या वेळी लष्करात अडथळे निर्माण करतील त्यांना देशद्रोही म्हणून कारवाई केली जाईल, असे वक्तव्य केले होते. खरं म्हणजे अशा प्रकारे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई करणे हे लष्कराचे नियमित काम आहे. यासाठी जाहीरपणे वेगळे बोलण्याची गरज नव्हती. दहशतवाद्यांची शक्ती वाढणार नाही आणि त्यांचा जनतेतील पाठिंबा कमी होईल असेच बोलायचे असते आणि धोरणे आखायची असतात. भारतातील महत्त्वाच्या वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमे आमच्या देशाच्या लष्करावर काश्मीरमध्ये लोक हल्ले करत आहे, अशी भूमिका मांडत आहेत तर पाकिस्तानमध्ये माध्यमे आपल्या काश्मीरमध्ये भारतीय लष्कर तरुणांना वेचून वेचून ठार मारत आहे असा गैरप्रसार करीत आहेत. काश्मिरींना भारतापासून दूर करणाऱ्या या गैरप्रचाराला अथवा प्रसाराला कृतीने तोंड देण्याऐवजी पाकिस्तानला संधी मिळेल अशाच प्रकारे वातावरण निर्माण केले जात आहे. काल जिथे पाच लोक मारले गेले त्यातील एक अतिरेकी होता, एक स्थानिक नागरिक तर तीन तरुण, ज्यांचा दहशतवादी कृत्याशी यापूर्वी संबंध आलेला नव्हता असे म्हटले गेले आहे. त्या बडगाम जिल्ह्यातील चादोरा गावाजवळच्या दरभग गावामधील गुलाम कादीर बाबा याच्या घरी अतिरेकी लपले आहे अशी पोलिसांना सूचना मिळाली.
आत्तापर्यंत अशा मिळालेल्या बहुतांश सूचना या स्थानिक मुस्लीम नागरिकांनीच दिलेल्या आहेत. अतिरेकी ज्या घरात आश्रय घेतात त्या घरातील लोक भीतीपोटी त्यांना विरोध करू शकत नाही आणि नंतर जेव्हा पोलीस अथवा लष्कराला हे कळते तेव्हा त्या नागरिकांवर मोठी कारवाई केली जाते. अशी शेकडो उदाहरणे गेल्या अनेक वर्षात काश्मीरमध्ये घडली आहेत. याच चकमकींमध्ये घरात असलेले लोक बाहेर पडू शकत नाही परिणामी बऱ्याचदा ते लष्कराकडून झालेल्या कारवाईकडून बळी पडतात. अशा निरपराधांची कुठलीही माहिती अधिकृतपणे बाहेर कळत नाही. खबऱ्यांची अथवा ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली त्या अतिरेकी नसलेल्यांचे पुनर्वसन बऱ्याचदा होत नाही. त्यांना अतिरेक्यांचे पाठीराखे म्हणजेच दहशतवादी असे समजून कारवाई केली जाते. अनेक घटना अधिक संवेदनशील असलेल्या काश्मीरमध्ये लष्करविरोधी अथवा भारतविरोधी भावनांना बळ देतात.
९ एप्रिलला काश्मीरमधील दोन जागांवर लोकसभेची निवडणूक होत आहे. पैकी ज्या बडगाममध्ये ही घटना घडली तेथे डॉ. फ ारूक अब्दुल्ला एक उमेदवार आहे, तर दुसऱ्या जागेवर मुफ्ती महंमद सईद यांचा मुलगा आणि मेहबूबा मुफ्ती यांचा भाऊ तसद्दुक हा मुख्य उमेदवार आहे. या काळात या घटना घडणे म्हणजे पुढील अनेक वर्षं काश्मीर जळत राहील हे मी यापूर्वी वेळोवेळी म्हटले आहे. आत्ता जर हा हिंसाचार दाबला गेला असता तर सात आठ वर्षे तो पुन्हा वर आला नसता मात्र सरहद संस्थेमधील बडगामच्या तरुणांच्या मते ही परिस्थिती अधिकाधिक बिघडण्याची शक्यता जास्त आहे. शेकडो तरुण बॉर्डर क्रॉस करून ट्रेनिंग घेऊन परत आले आहेत आणि खुलेपणाने फिरत आहेत. जे लोक मरण्यासाठी परत येतात आणि लष्कर तसेच निमलष्करी दलावर हल्ले करतात त्यांच्याशी लढणे सामान्य काश्मिरी माणसाला शक्य आहे का, असा प्रश्न जावेद वाणी, जाहीद भटसारखे तरुण विचारतात ते अगदीच चुकीचे नाही आपण तिथल्या जनतेच्या बाजूनेसुद्धा विचार करून ही लढाई लढली पाहिजे. राष्ट्रीय पक्षांचे काही अतिउत्साही प्रवक्ते आता पॅलेट गनबाहेर काढा आणि या तरुणांना धडा शिकवा, अशी भूमिका घेत आहेत, मात्र ज्या प्रमाणात स्थानिक तरुण बाहेर जाऊ लागले आहे ते शस्त्रांसह शत्रूच्या मदतीने परत आले तर त्यांच्याशी लढणे अतिशय अवघड आहे. आपली लढाई पाकिस्तानविरुद्ध आहे काश्मिरींविरुद्ध नाही याची जाणीव सर्वांनीच ठेवायला हवी. याचा अर्थ दहशतवाद्यांचे लांगूनचालन नाही. एखादा अतिरेकी मेला तर नवीन अतिरेकी तयार होईलच असे नाही; मात्र एखादा तरुण, लहान मुलगा अथवा महिला कोठल्याही कारणाने जखमी अथवा मृत्युमुखी पडल्या तर त्यातून शेकडो तरुण दहशतवादाकडे वळतात. ही मालिका खंडित करावी लागेल.
दरवर्षी उन्हाळा आला आणि बर्फ वितळला की, अतिरेकी कारवाया वाढतात पर्यटकांची संख्या याच काळात वाढते, अमरनाथ यात्रा जुलैमध्ये असते. आजवर पर्यटकांवर अथवा यात्रेकरुंवर हल्ले झाल्याची घटना अपवादानेच घडली आहे. बऱ्याचदा शत्रूचीही योजना असते. मात्र भविष्यात असे घडणार नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. म्हणूनच आपली लढाई शत्रूशी आहे आपल्याच लोकांशी नाही अशाप्रकारे आपल्याही योजना आखाव्या लागतील. गरजेपेक्षा अधिक किंवा चुकीच्या वेळी वापरलेली पॅलेट गन किंवा बंदुकीची गोळी यातून काश्मीरप्रश्न अधिक गुंतागुंतीचा होईल, आधीच तो एका धोकादायक वळणावर येऊन थांबलेला आहे.
संजय नहार
(संस्थापक अध्यक्ष, सरहद)