काश्मीरची भळभळती जखम आता पूर्णत्वाने भरून निघेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 06:32 AM2019-08-16T06:32:59+5:302019-08-16T06:33:10+5:30

नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक या अतिमहत्त्वाच्या टप्प्यानंतर काश्मीरमध्ये एवढ्यात एक क्रांतिकारी ऐतिहासिक बदल घडून आला आहे.

Kashmir's heinous wounds will now heal in full | काश्मीरची भळभळती जखम आता पूर्णत्वाने भरून निघेल

काश्मीरची भळभळती जखम आता पूर्णत्वाने भरून निघेल

Next

- डॉ. वामनराव जगताप

नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक या अतिमहत्त्वाच्या टप्प्यानंतर काश्मीरमध्ये एवढ्यात एक क्रांतिकारी ऐतिहासिक बदल घडून आला आहे. काश्मीरला कलम ३७० च्या अंतर्गत प्राप्त झालेला विशेष दर्जा भारत सरकारने हटवून काश्मीरला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणले आहे, यातून बरेच काही चांगले निष्पन्न होईल हे खरे असले तरी बरेच प्रश्न गंभीर स्वरूपात उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यात चांगले असे होईल की, पाकिस्तानी अतिरेक्यांच्या घुसखोरीला आळा बसून अतिरेकी कारवायांना वाव राहणार नाही. तस्करीचे अमाप अड्डे असलेल्या या राज्याला यातून मुक्त करावे लागेल. आता सरकारला बंदुका खाली ठेवून तेथील जनतेच्या सहभागातूनच सर्वांगीण विकासाचे महाभियान प्राधान्याने चालवावे लागेल. तिथल्या तरुण-तरुणींकडे संशयाच्या नजरेने न पाहता बिहार, युपी व समस्त दक्षिण भारताच्या धर्तीवर (हिंदी भाषेवरून संबंध सध्याही बिघडलेले असूनही) काश्मिरी तरुण-तरुणींना देशातील संरक्षण व मुलकी सेवेत संधी दिली जावी. काश्मीरमध्ये अनेकानेक उद्योगधंदे सुरू करून तिथल्या बेकार तरुण-तरुणींचे आयुष्य कसे सुखकर होईल याकडे लक्ष पुरवावे लागणार आहे, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील उद्योजकांना तसे आवाहनही केले आहे. यातून त्यांच्या बेकार हातांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. तिथला लक्षावधींचा फौजफाटा कमी करून इतर राज्याप्रमाणे आवश्यक तेवढाच फौजफाटा ठेवावा लागेल. त्यातूनही मुस्लीम जनतेला अवास्तव त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

शिक्षण, नोकरी, धंदा-व्यवसाय यासाठी तरुणांना प्रेरित करीत त्यासाठी शिष्यवृत्त्या-कर्जाची पूर्तता करून त्यांचे समायोजन- समुपदेशन करावे लागेल. यासाठी शिबिरे, महामंडळे, सामाजिक संस्थांकडून जनजागृती करावी लागणार आहे. हे राज्य व देश माझे असून हीच माझी निष्ठाभूमी असल्याचे (राष्ट्रीयत्व) लोकशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या मनावर बिंबवून त्यांना त्यासाठी तयार करावे लागेल.

पर्यटनाच्या दृष्टीने काश्मीर प्रथम क्रमांकावर असल्यामुळे यात मुस्लीम तरुणांचा सहभाग वाढवून पर्यटकांसाठी विश्वासाचे-संरक्षणाचे- स्वस्थ वातावरण नक्कीच निर्माण करता येईल शिवाय काश्मिरी जनतेसाठी भारतभ्रमण (देशाटन) यासारखी प्रदीर्घ व व्यापक मोहीम आखली तर देशातील हिंदू-मुस्लिमांशी त्यांचा वार्तालाप-संवाद होईल व इथल्या धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव तत्त्वाचा, व्यवहार व कायद्याचा परिचय होऊन भारतीय संस्कृतीशी ते एकरूप होण्यास मदत होईल. हे सर्व भारत सरकार करेलच करेल. त्यांनी जन्म दिलेल्या गोंडस बाळासाठी सरकार कुवत व म्हणेल तेवढा निधी अंत:प्रेरणेने व अग्रक्रमाने वापरेल याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. त्यांनी केलेली ही उज्ज्वल ऐतिहासिक कामगिरी आहे. यातून काश्मिरी मुस्लीम जनता खऱ्या अर्थाने राष्ट्रीय प्रवाहात येईल व खºया अर्थाने काश्मिरात शांती प्रस्थापित होईल.

३७० च्या ऐतिहासिक घटनेवरून पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. जखमी, चिडलेल्या वाघासारखी त्याची स्थिती झाली आहे, काश्मीरप्रश्न भारताचा निव्वळ अंतर्गत प्रश्न असला तरी धार्मिक अनुबंध व कट्टरपणा यामुळे गेल्या ७०-७१ वर्षांचा त्याचा धार्मिक अभिमान व उन्माद लयाला गेला आहे. भारतासाठीच्या रोजच्या कुरापतींनी त्यांची रणभूमी नष्ट झाली आहे. याबद्दलच्या त्याच्या कांगाव्याची स्वत: मुस्लीम राष्ट्रे, युनो व अमेरिकेसह अन्य अनेक देशांनी थोडीही दखल घेतली नाही. ३७० च्या कारवाईपूर्वी भारताने जागतिक समूहांशी संवाद साधला नसेल असे नाही. म्हणूनही पाकिस्तानची स्थिती जखमी सिंहासारखी झाली आहे. ३७० ची घटना म्हणजे इस्लाम धर्मावरील आक्रमण असून त्याला त्याच पद्धतीने किंबहुना जोरकसपणे उत्तर देण्याची त्याची दर्पोक्ती आहे; पण भारत त्यासाठी सिद्ध व समर्थ असल्याचे तो जाणून आहे.

या सोबतच देशभरातील जनतेकडून एक अतिमहत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, देशहित लक्षात घेऊन सरकारने केलेली ही कामगिरी देशाने स्वाभिमानाने स्वीकारली आहे; पण पुढे प्रश्न असा पडतो की, याच बळावर येत्या काळात काही अनुचित-अवांच्छित निर्णय होऊन त्यातून वेगवेगळ्या समाजात तेढ निर्माण होऊन समाज दुभंगून जाईल. काही दुर्बल-वंचित घटक विकासापासून व त्यांच्यासाठीच्या कायद्यांपासून वंचित होऊन देशाच्या मुख्य प्रवाहातून दूर फेकले जातील, असे होऊ नये ही अपेक्षा, कारण या प्रश्नावरून हे घटक अस्थिर, अस्वस्थ व साशंक आहेत, म्हणूनच या महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते.

Web Title: Kashmir's heinous wounds will now heal in full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.