कौल ऐक्याचा!
By admin | Published: September 20, 2014 11:55 AM2014-09-20T11:55:51+5:302014-09-20T11:59:12+5:30
सन १७0७मध्ये एकत्र आलेले इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्श हे प्रदेश युनायटेड किंगडम (लोकप्रिय नाव इंग्लंड) या नावाने जगात ओळखले जातात
Next
>सन १७0७मध्ये एकत्र आलेले इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्श हे प्रदेश युनायटेड किंगडम (लोकप्रिय नाव इंग्लंड) या नावाने जगात ओळखले जातात. विसाव्या शतकात त्याच्या रचनेत काहीसा बदल करून, त्यात उत्तर आयर्लंडचा समावेश करण्यात आला. गेली तीन दशके एकत्र राहिलेल्या या प्रदेशात वंशश्रेष्ठत्वाच्या नावाने कुरबुरी होत राहिल्या असल्या, तरी मुख्यत्वे हा देश संघटित व एकात्मच राहिला. त्यातल्या स्कॉटलंडमधील नागरिकांची स्वातंत्र्याकांक्षा मोठी व त्यासाठी लढण्याची त्यांच्यातील धगही धारदार होती. (बॅगपायपर हे त्यांचे लोकप्रिय वाद्य त्यांच्यातील लढाऊपणाचेच चिन्ह आहे.) स्कॉटलंडचा प्रदेश डोंगराळ व दर्याखोर्यांचा असल्यामुळे त्यात भूमिगत चळवळ उभारण्याचे प्रयत्नही फार झाले. ते नेहमीच नि:शस्त्र व अहिंसक नव्हते. त्यांला प्रसंगी उग्र व हिंसक रूप आलेलेही इतिहासाने पाहिले आहे. १९५0नंतर स्कॉटिश जनतेची स्वातंत्र्याकांक्षा जबर झाली आणि तिने इंग्लंडपासून स्वतंत्र होण्याची एक मोठी चळवळच सुरू केली. तिचे नेतृत्व करणारी नॅशनल स्कॉटिश पार्टी त्या प्रदेशात प्रबळ होती. ही चळवळ आणि या पक्षाची टोकाची स्वातंत्र्यांकांक्षा लक्षात घेऊन १९९९मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने स्कॉटलंडला जास्तीची स्वायत्तता देणारे विधेयक मंजूर केले. त्यातून स्कॉटलंडला स्वत:चे प्रादेशिक पार्लमेंट निवडता येणे शक्य झाले. या पार्लमेंटला काही र्मयादित स्वरूपाचे कायदे करण्याचा व तसेच कर आकारणीचा अधिकारही देण्यात आला. मात्र, तेवढय़ावर समाधान न मानणार्या नॅशनल स्कॉटिश पार्टीने पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करून गेल्या काही वर्षांत त्यासाठी एक उग्र आंदोलन उभे केले. या आंदोलनाचा मान राखत इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नावर त्या प्रदेशात जनमत घेण्याचे जाहीर केले. ‘स्कॉटलंडला इंग्लंडपासून स्वातंत्र्य हवे आहे’ या एकाच प्रश्नावर होय किंवा नाही अशी मते त्यात स्कॉटिश जनतेने नोंदवायची होती. काल हे मतदान पार पडले. त्यात ५५ टक्के लोकांनी ‘नाही’ या बाजूने, तर ४५ टक्के लोकांनी ‘होय’ या बाजूने आपली मते नोंदविली. स्वाभाविकच स्कॉटलंडला पूर्ण स्वातंत्र्य मागणार्या नॅशनल स्कॉटिश पार्टीचा पराभव होऊन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या एकात्मतावादी भूमिकेचा विजय झाला. पराभूत पक्षाने आपला पराभव आता खिलाडूपणे मान्यही केला आहे. इंग्लंडसोबत राहून स्कॉटलंडएवढीच इतरही प्रदेशांनी आपली आर्थिक व औद्योगिक प्रगती मोठय़ा प्रमाणावर करून घेतली आहे. त्यांच्यातील आजवरची एकात्मता एवढी मजबूत, की इंग्लंडने आपले अण्वस्त्रधारी आरमार स्कॉटलंडच्या समुद्रातच उभे केले. आम्ही स्वतंत्र झालो, तर हे आरमार येथे राहू देणार नाही, अशी घोषणा नॅशनल स्कॉटिश पार्टीने केली होती. मात्र, ही पार्टी प्रत्यक्ष जनमतापासून फार दूर राहिली असल्याचेच आताच्या मतदानाने घोषित केले आहे. यातून इंग्लंडची एकात्मता टिकली, कॅमेरून यांची प्रतिष्ठा वाढली आणि त्या दोहोंचीही जगाच्या राजकारणातली बाजू भक्कम झाली. स्कॉटलंडच्या या पराभूत झालेल्या उठावातून जगभरातील अनेक प्रदेशांना बरेच महत्त्वाचे धडे घेण्यासारखे आहेत. अनेक मोठय़ा व लहानही देशांतील बर्याच प्रदेशांना फुटून बाहेर पडायचे व स्वतंत्र व्हायचे आहे. अशा घोषणा करणार्यांत लोकशाही देशांतील प्रदेशांचाही समावेश आहे हे महत्त्वाचे. कॅनडामधील फ्रेंच भाषिकांचा क्यूबेक हा प्रांत गेली कित्येक वर्षे स्वातंत्र्याची मागणी करीत आहे. अनेक अरब देशांत जास्तीची स्वायत्तता व स्वातंत्र्य मागणारेही अनेक प्रदेश समाविष्ट आहेत. भारतासारख्या देशात स्वातंत्र्याची मागणी करणारे प्रदेश नसले, तरी आम्हाला जास्तीचे अधिकार हवेत किंवा जास्तीची स्वायत्तता हवी, अशी मागणी वेळोवेळी अनेक राज्यांनी केली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी प्रादेशिक स्वातंत्र्याकांक्षा आणि स्वायत्त होण्याची इच्छा ही या नव्या राजकीय हालचालीची मुख्य प्रेरणा आहे. आम्ही केंद्राच्या नियंत्रणात का राहायचे, केंद्रातील लोकांना आमच्याहून जास्तीचे कळते काय? किंवा आम्हाला आमचे हित जपता येत नाही काय? ही लोकमानसात तयार होणारी धारणा, असे या प्रेरणेचे स्वरूप आहे. स्कॉटलंडमध्ये झालेले मतदान स्वातंत्र्याच्या बाजूने गेले नसले, तरी त्यामुळे त्या प्रदेशाची ती आकांक्षा पूर्णपणे शमली, असे मात्र समजण्याचे कारण नाही. ४५ टक्के लोक स्वातंत्र्याची मागणी करतात, त्याचा अर्थ या पुढच्या काळात हा प्रदेश अधिक स्वायत्ततेची मागणी करील, हे उघड आहे. कॅमेरून यांनी ती देण्याचे मान्यही केले आहे. स्वायत्तता वाढत गेली, की ती स्वातंत्र्याच्याच दिशेने जात असते. त्यामुळे देशाची एकात्मता वाढवणे हाच फुटीरपणावरचा व स्वायत्ततेवरचा खरा उपाय आहे.