युती ठेवावी की तोडावी...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:57 AM2018-04-18T02:57:47+5:302018-04-18T02:57:47+5:30
जगावं की मरावं, हा कसला दळभद्री सवाल आहे? युती ठेवावी की तोडावी, हाच मिलियन डॉलर सवाल आहे...!
- अतुल कुलकर्णी
जगावं की मरावं,
हा कसला दळभद्री सवाल आहे?
युती ठेवावी की तोडावी,
हाच मिलियन डॉलर सवाल आहे...!
काहीच न मिळणाऱ्या सत्तेच्या दारावर
वाईटपणाचा भागीदार होऊन
जगावं बेशरम लाचार आनंदानं,
की फेकून द्यावं सत्तेचं हे लोढणं
त्यात गुंडाळलेल्या नको त्या आमिषांसह...
जनतेच्या मतदारसंघरूपी दारामध्ये...
आणि करावा या सर्वांचा शेवट
एकाच प्रहाराने
नतद्रष्ट सत्तेचा आणि कमळाबाईचाही...
यांचा, त्यांचा आणि सगळ्यांचा...?
युती तोडण्याच्या निर्णयाने
त्यांच्या अस्तित्वालाच असा डंख मारावा
की नंतर येणाºया कोणत्याही
दाढीवाल्याला धनुष्याच्या प्रत्यंचेला
हात लावताना विचार करावा लागेल...
आणि त्यातून येणाºया निद्रानाशाला
नसेल कधीच उतारा...
म्हणूनच म्हणतोय हे नियंत्या...
जगावं की मरावं,
हा कसला दळभद्री सवाल आहे?
युती ठेवावी की तोडावी,
हाच मिलियन डॉलर सवाल आहे...!
जरी त्या निद्रानाशेतही
पुन्हा स्वप्न पडू लागली तर...?
तर... इथंच मेख आहे...
त्यांच्या नव्या पक्षांच्या ओळखीनं
आहे तेही सत्तेचे ताट
हिरावून तर जाणार नाही ना...
त्यासाठीच निर्णय घेण्याचा धीर होत नाहीयं!
म्हणून आम्ही सहन करतोय,
या कमळाबाईचं लोढणं...
हे जुनं जागेपण सहन करतोय;
विरोधकांच्या निर्जीवपणानं...
आमच्याच अभिमानावर होणारं अतिक्रमण
अस्तित्वाच्या गाभाºयात असलेल्या सत्वाची
विटंबना अशी किती रे पाहायची करुणाकरा?
म्हणूनच म्हणतोय हे नियंत्या...
जगावं की मरावं,
हा कसला दळभद्री सवाल आहे?
युती ठेवावी की तोडावी,
हाच मिलियन डॉलर सवाल आहे...!
अखेर सत्तेसाठीचा कटोरा घेऊन
का उभे राहतोय आम्ही खालच्या मानेनं...
आम्हाला संपवायला निघालेल्यांच्या दारात?
विधात्या, तू इतका कठोर का झालास...?
एका बाजूला, आम्ही ज्यांना
लहान भावासारखे वाढवले,
तेच आज आमच्या डोक्यावर बसलेत...
आणि दुसºया बाजूला
आम्ही ज्यांना जन्म दिला तेही आम्हाला
स्वाभिमान शिकवत त्यांच्याच दारी गेले...!
ज्यांना आम्ही सत्तासोपानाच्या
पायºया दाखवल्या,
तेच आता आमच्याशी
फितुरीची भाषा करतात...
आणि आम्हालाच शिकवतात
सत्तेत राहण्याचे फायदे-तोटे...
हे करुणाकरा, आमच्याच फितुरांच्या अशा
वागण्यानं विस्कटणाºया पक्षाचं
हे ओझं घेऊन आम्ही जायचं तरी कुठे...?
म्हणूनच म्हणतोय, युती ठेवावी की तोडावी?
हाच मिलियन डॉलर सवाल आहे...!
(तिरकस)