हे ज्ञानदीप अविरत उजळत राहो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:17 AM2017-10-06T03:17:07+5:302017-10-06T03:17:43+5:30
शिक्षकाचा जगभरात होणारा हा गौरव केवळ एक दिवसाचा न राहता शिक्षकरूपी हे ज्ञानदीप अविरत उजळत राहू दे !
‘एखाद्या राष्ट्राची उंची त्या देशातील शिक्षकांच्या ज्ञानात्मक उंचीइतकीच असते,’ असे म्हटले जाते. म्हणूनच शिक्षकाकडे अवघा समाज एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहतो. आपल्या भारतीय समाजातच नाही तर जगभरातील संस्कृतींकडे पाहिले की गुरूकडे, शिक्षकाकडे अत्यंत आदराने पाहिले जात होते. भारतात याच भावनेतून माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन या हाडाचे शिक्षक असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा शिक्षणक्षेत्रातील कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने ५ सप्टेंबर हा दिवस १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून उत्साहाने साजरा होतो. जागतिक स्तरावरही शिक्षणाप्रति जागरूकता वाढावी म्हणून युनेस्कोतर्फे १९९४ पासून दरवर्षी ५ आॅक्टोबर हा दिवस ‘जागतिक शिक्षक दिन’ साजरा केला जातो. भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, सुसंस्कृत समाजनिर्मिती व्हावी या उद्देशाने शंभरहून अधिक देशांत हा दिवस साजरा होतो. विकसित, विकसनशील देश एकत्र येऊन शिक्षणासंदर्भात भरीव असे काही करण्यासाठी विचारांचे, कृतीचे आदानप्रदान करीत असताना भारतानेही या दिवसाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. कारण जगभरातील विकसनशील राष्ट्रांत शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के खर्च केला जात असताना तोच खर्च भारतात केवळ तीन ते पाच टक्क्यांच्या आसपास आहे. आजची सामाजिक परिस्थिती पाहता भौतिक विकास होऊनसुद्धा आपला नैतिक विकास होत आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मूल्यव्यवस्था कोलमडत असताना समाज शिक्षकाकडेच आशेने पाहत आहे. शिक्षणक्षेत्रात शिक्षकच केंद्रवर्ती घटक आहे.
‘आदर्श राज्याच्या निर्मितीत शिक्षकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो’, असे मानणारा प्लेटो शिक्षकांवर मनापासून प्रेम करायचा. कविवर्य कुसुमाग्रजांनीही, ‘जेथे जेथे शिक्षकाचा होतो बहुमान तो देश ठरतो महान’ असे म्हटले होते. उगवत्या पिढीला कोणतं शिक्षण दिलं जातं, ते देण्याची पद्धत काय, यावर राष्ट्राचं भवितव्य अवलंबून असतं. यादृष्टीने शिक्षणक्षेत्रात शिक्षक, विद्यार्थी व पालक हे तीन प्रमुख घटक आहेत. पण या सर्वात शिक्षक हा केंद्रवर्ती घटक आहे. आजच्या युवाशक्तीला योग्य दिशा देणारा शिक्षक पाहिजे आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेतील असे साधन आहे, की ज्यामुळे माणूस नवीन होतो. नवराष्ट्र उभारणीसाठी विज्ञाननिष्ठा, समता, धर्मनिरपेक्षता, चारित्र्य ही मूल्ये नव्या पिढीत रुजविणे शिक्षकाला शक्य आहे. विचार करणे म्हणजे प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्य प्राप्त करणे. म्हणूनच समाज परिवर्तनाचे, राष्ट्रीय एकात्मतेचे व आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे साधन म्हणजे शिक्षण आहे. अमेरिकन शिक्षण शास्त्रज्ञ जॉन ड्युई म्हणतो, ‘शिक्षक हा मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक असतो. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी योग्य त्या वातावरणनिर्मितीची कुशलता शिक्षकाजवळ असते. त्याला सामाजिक समस्यांची, गरजांची तसेच जबाबदारीची जाणीव असते.’ अशा या शिक्षकाचा होणारा हा गौरव केवळ एक दिवसापुरता राहू नये. तर ‘अविवेकाची काजळी। झाडूनि विवेकदीप उजळी। योगिया पाहे दिवाळी । निरंतर॥’ असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे हा शिक्षकरूपी ज्ञानदीप अविरत उजळत राहायला हवा.
- विजय बाविस्कर
vijay.baviskar@lokmat.com