बाजारातील तेजी टिकून राहो..!

By किरण अग्रवाल | Published: November 19, 2020 08:11 AM2020-11-19T08:11:30+5:302020-11-19T08:12:07+5:30

Economy Market - यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट नक्कीच राहिले; परंतु जनतेने त्याची कसलीही तमा न बाळगता हा सण साजरा केला. लॉकडाऊनमुळे घराघरातच अडकून पडलेली जनता दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडली. जागोजागचे बाजार गर्दीने फुलून निघाले. बंद राहिलेल्या काळात जेवढा व्यवसाय झाला असता त्यापेक्षा अधिक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या आठवडाभरात झाला.

Keep up the momentum in the market ..! | बाजारातील तेजी टिकून राहो..!

बाजारातील तेजी टिकून राहो..!

Next

- किरण अग्रवाल

कोरोनाच्या संकटाचे भय न बाळगता दिवाळी साजरी झाल्याने यंदा बाजारात नेहमीपेक्षाही अधिक तेजी दिसून आली, या तेजीने ढासळलेली अर्थव्यवस्था सावरायला मदत होईलच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गेल्या सात-आठ महिन्यांपासून घोंगावलेल्या संकटाने मनामनांवर जे निराशेचे मळभ दाटून आले होते ते दूर व्हावयास मोठी मदत घडून आली आहे.

यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट नक्कीच राहिले; परंतु जनतेने त्याची कसलीही तमा न बाळगता हा सण साजरा केला. लॉकडाऊनमुळे घराघरातच अडकून पडलेली जनता दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडली. जागोजागचे बाजार गर्दीने फुलून निघाले. बंद राहिलेल्या काळात जेवढा व्यवसाय झाला असता त्यापेक्षा अधिक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या आठवडाभरात झाला. मुंबईच्या बाजार समितीमध्ये दहा दिवसांमध्ये तब्बल 3600 टन सुकामेव्याची विक्री झाली, ज्यात 135 कोटींची उलाढाल झाली. मुद्रांक शुल्क कपात व कमी व्याजदरात उपलब्ध असलेले गृहकर्ज आदी कारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठी उलाढाल झाली. एकट्या नाशकात साडेचारशे ते पाचशे फ्लॅटची बुकिंग या काळात झाली, त्यामुळे येत्या दोन-अडीच महिन्यात रेडीपझेशन फ्लॅटचा तुटवडा जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाहन उद्योगातही भरभराटीचे चित्र असून, अनेक कंपन्यांच्या चारचाकी वाहनांना दीड ते दोन महिन्यांची वेटिंग आहे इतकी मागणी वाढली आहे. कमीत कमी डाऊन पेमेंट व विविध वित्तीय संस्थांनी दिलेल्या आकर्षक ऑफर्स यामुळे मध्यमवर्गीयांनी दुचाकीची खरेदीही मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून आले. लक्ष्मीपूजन व पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दरही काहीसे घसरल्याने सोने-चांदीला चांगली मागणी राहिली. शेअर बाजारही तेजीत राहिला. एकुणात बाजारात उत्साह व आनंदासोबतच आर्थिकदृष्ट्या तेजीही राहिली.

महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या या काळातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातील भारतीय उद्योगपतींच्या राजेशाही थाटाचा मुद्दा एकीकडे चर्चेत आला असतानाच दुसरीकडे भारतातील श्रीमंतांची संख्या वाढत असल्याचीही वार्ता आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या एका रिपोर्टनुसार सन 2000 मध्ये भारतातील अब्जाधीशांची जी संख्या अवघी नऊ होती ती आता 119 झाली आहे. कोरोनाच्या संकटाशी झुंजत असतानाही गेल्या सहा महिन्यात पंधरा नवीन अब्जाधिश झाल्याचे फोर्ब्जच्या वृत्तात म्हटले आहे. गेल्या एका दशकात देशातील अब्जाधीशांची संपत्ती सुमारे दहा पटीने वाढल्याचाही एक अहवाल आहे. हा वेग इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे अधिक आहे. अलीकडे आपल्याकडील अनेक उद्योगसमूहांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील समूहांशी व मान्यवर व्यक्तींसोबत करारमदार झाल्याने त्यातूनही आर्थिक चलनवलनाला यापुढील काळात आणखी मोठा हातभार लागण्याची अपेक्षा आहे. यातून श्रीमंत व गर्भ श्रीमंतांच्या यादीत होणारी लक्षणीय वाढ पाहता लवकरच आपण इतर सक्षम अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्याही पुढे गेलेलो असू. या वर्गाबद्दल असूया बाळगण्याचे कारण नाही, उलट देशाच्या समृद्धीचा दर त्यांच्यामुळे उंचावतो आहे याचा आनंद अगर समाधान बाळगता यावे. कोणताही उद्योग व्यवसाय भरभराटीस येतो तेव्हा तो अनेकांना रोजगार देऊन जातो व अर्थकारणाला अधिक गतिमानता प्रदान करून जातो हे येथे विसरता येऊ नये.

या पार्श्‍वभूमीवर दिवाळीनिमित्त बाजारात आलेली तेजी सामान्य, छोट्या व मध्यम उद्योग व्यावसायिकांनाही दिलासा देणारी व त्यांच्यातील निराशेचे वातावरण दूर करणारीच म्हणायला हवी. आर्थिक सधन संपन्नतेत खारीचा वाटा म्हणून त्याकडे नक्कीच बघता यावे, तेव्हा बाजारातील हा तेजीचा माहौल कायम ठेवायचा असेल तर कोरोनाच्या संकटाबाबतची सावधानता दुर्लक्षून चालणार नाही; कारण विदेशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्याचे पाहता व दिल्लीतही ज्या वेगाने पुन्हा संसर्ग वाढल्याच्या वार्ता येत आहेत त्याकडे बघता देशातील सर्वाधिक बाधित आढळलेल्या महाराष्ट्रात गाफील वा बेफिकीर राहणे धोक्याचे ठरेल. दिवाळीच्या खरेदीसाठी ज्यापद्धतीने गर्दी उसळलेली व त्यात बेफिकीरपणा आढळून आला तो भीती वाढवणाराच ठरला आहे. शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांखेरीज कुटुंब व व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकानेच यासंदर्भाने खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Keep up the momentum in the market ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.