अपने सपनों को अपनी निगाहों में रखो...
By विजय दर्डा | Published: January 1, 2024 08:16 AM2024-01-01T08:16:45+5:302024-01-01T08:18:53+5:30
आपण स्वतःला विचारायला हवे की, आपल्यात रोज काहीतरी नवे जन्माला येते का? त्या स्वप्नांच्या दिशेने आपण आपले पंख पसरुया !..
डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -
मागच्या आठवड्यात नागपूरला काँग्रेसचे अधिवेशन झाले, त्यावर यावेळी लिहावे की व्यक्तिगत जीवनावर लिहावे, अशा विचारांच्या द्वंद्वात मी होतो. काहीतरी मिळविण्याच्या लालसेने आपण सतत पुष्कळ काही गमावत चाललो आहोत, ही भावना त्यामागे होती. ज्यांना आम्ही मिळवू इच्छितो, ते आपल्या हातातून निसटत आहेत आणि जे आमच्याजवळ आहेत, ते जवळ असूनही दूर होत चालले आहेत. नवे साल उंबरठ्यावर आहे; तर माझ्या मनात विचार आला की, जगण्याविषयी का काही गोष्टी करू नयेत? जगण्याविषयी बोलावे, काळाविषयी बोलावे.
मी स्वतःविषयी विचार करीत होतो. अर्थातच आपणही सर्वजण स्वत:विषयी विचार करीतच असाल. आपल्यापैकी कुणी राजकारणात असेल, कोणी सामाजिक जीवनात, कोणी विज्ञान किंवा कलेच्या क्षेत्रात; कोणी शिक्षणात, तर कोणी उद्योग आणि व्यवसाय किंवा आणखी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असेल; पण गंभीर प्रश्न असा आहे की, आपण आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देतो का? काही लोक लक्ष देऊ शकतात; परंतु बहुतांश लोक आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत, हेच वास्तव आहे. मी स्वतःसुद्धा स्वास्थ्याबद्दल विचार करतो की, मला त्याकडे लक्ष दिले पाहिजे; परंतु ते देऊ शकत नाही, हेच वास्तव हेच असते. मला वाटते की, रोजच्या जगण्याच्या धबडग्यात मी गीत लिहावे, गझल लिहावी, मनात भावपण येतात, मात्र लिहू शकत नाही. माझे रंगांवर अतोनात प्रेम आहे आणि रंगांशी मला पुष्कळ खेळता येते. कुंचल्यावर माझे प्रेम आहे; पण इच्छा असूनही मी चित्र काढू शकत नाही. मित्रांबरोबर काही आनंदाचे क्षण घालवावेत, असे मला वाटते; पण ते मी नाही घालवू शकत.
स्वजनांबरोबर थोडाफार तरी वेळ घालवावा, असे मला वाटते. जर कधी एकत्र जमलोच तर माझे मन, जे तिथे अनुपस्थित असतात, त्यांच्यात अडकून पडते. जे नसतात त्यांच्या चिंतेत बुडाल्यामुळे, जे असतात त्यांच्याबरोबर पुरेसा आनंद घेता येत नाही. मुठीतून वाळू घसरत जावी, तसा वेळ निसटून जात असतो. तर मग असे काही का करू नये की, अगदी आपल्या मनात जे होते ते आपण केले आहे, असे नंतर वाटेल. मनाप्रमाणे जगावे अशी माझी इच्छा आहे, आपलीही असेल. मनाप्रमाणे जगले पाहिजे, कुणाच्या अकारण दबावाखाली नव्हे. कुणाच्या सल्ल्याची सावली मनावर नको. यात काही चुकीचे नाही; परंतु मनाप्रमाणे जगण्याचा असा अर्थ असा नाही की, आपल्याला नेहमी येणाऱ्या आळसात जीवन घालवावे.
काहीएक उद्दिष्ट समोर ठेवून जगणे, हा जगण्याचा खरा अर्थ आहे. नव्या विचारांबरोबर जगले पाहिजे. आपल्यात काही नवनिर्माण होत आहे का, याचा विचार रोज केला पाहिजे. आपण जे काही करतो आहोत, यातून काय पदरात पडणार आहे, असा विचार करणारे लोक इतरांपेक्षा वेगळे आहेत, हे लगेच लक्षात येते. असे लोक वेळेचा अधिक चांगला आणि योग्य विनियोग करणे जाणतात. ते वेळेची किंमत जाणतात, संयमित असतात, शिस्तीने बांधलेले असतात. महात्मा गांधी यांनी एखाद्या सामान्य माणसासारखे ऐशोआरामात जगायचे ठरवले असते तर आपण आज स्वतंत्र झालो असतो का? ते तर त्या काळातील बॅरिस्टर होते. त्यांनी ठरवले असते तर एक शानदार जीवन ते जगले असते; परंतु त्यांच्या आतल्या आवाजाने सांगितले, पारतंत्र्याच्या शृंखला तोडायच्या आहेत. त्यांनी कित्येक विषयांना स्पर्श केला. रवींद्रनाथ टागोर यांच्या अंतर्मनात नव्या विचारांची पालवी फुटली नसती तर ते आज आपल्या हृदयात वास करणारे रवींद्रनाथ टागोर झाले असते का? आपल्या खेळाडूंकडे पाहा ना. ते किती शिस्तबद्ध जीवन जगतात; स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संतुलित आणि स्वस्थ ठेवण्यासाठी किती परिश्रम करतात! गोष्ट केवळ खेळाची नाही, प्रत्येकच क्षेत्रात जे लोक उच्च पातळीवर जातात, त्यांच्याजवळ केवळ विचार, उद्दिष्ट, एकाग्रता किंवा कौशल्य एवढेच नसते, तर त्यांची शिस्तबद्धता त्यांना या सर्व गोष्टींतून फलप्राप्ती करून देते.
सर्वसामान्यपणे सामान्य लोकांची समस्या ही असते की, ते व्यस्त कमी आणि अस्ताव्यस्त जास्त असतात. याचे एक मोठे कारण तर मला असे वाटते की, ते वेळेचा सदुपयोग करू शकत नाहीत. आपण वेळेचा आदर करायला शिकत नाही तोपर्यंत आपण अशाच प्रकारे अस्ताव्यस्त राहाल. पुढे सरकणाऱ्या काळात भरडले जात राहाल तर नवा विचार अंकुरित व्हायला संधी कधी मिळेल?
धावपळीच्या जीवनातही आपण मन शांत ठेवाल त्याच वेळी नवा विचार अंकुरित होईल. म्हणून रोजची कामे करीत असतानाच मन शांत ठेवणे गरजेचे आहे. आपण काय नवे करू शकतो, काय अधिक चांगले करू शकतो, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सकाळी उठणे, कामावर जाण्याची धावपळ, दिवसभर काम करत राहणे आणि संध्याकाळी घरी परतणे हेच केवळ जीवन नाही. जर आपण आपली ही नेहमीची कामे वेळेच्या हिशेबाने केली; वेळ पूर्णपणे पाळली तर आपल्या लक्षात येईल की, पहिल्यापेक्षा आपण जास्त काम करतो आहोत आणि आपल्या व्यक्तिगत छंदासाठीही आपल्याजवळ वेळ शिल्लक राहतो आहे. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. फिरायला जा, योग करा, व्यायाम करा; जेव्हा आपण स्वस्थ राहाल तेव्हा उमेदीने नव्या काही गोष्टी करू शकाल. आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, व्यक्तिगत जीवनातील आनंदाला पंख तेव्हाच लागतील, जेव्हा आपल्या आजूबाजूलाही आनंदाची पखरण असेल. मग स्वतःसाठी आनंदाची निर्मिती करू, आसपासच्या आनंदात भर घालू, असा संकल्प यावर्षी करू या. नव्या वर्षासाठी माझ्या मनात काही भाव प्रकटत आहेत...
आओ नव वर्ष में जी लें...! प्यार का प्याला पी लें,
जो मेरे है, जो तेरे हैं, उनके साथ जिंदगी जी लें...!