विराट गती ठेवायला हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:26 AM2018-01-20T04:26:26+5:302018-01-20T04:26:41+5:30

विराट कोहलीने यंदाच्या मोसमात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आयसीसीचा प्रतिष्ठेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावला.

Keeping the speed of ... | विराट गती ठेवायला हवी...

विराट गती ठेवायला हवी...

Next

विराट कोहलीने यंदाच्या मोसमात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आयसीसीचा प्रतिष्ठेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे यासह तो एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजही ठरला. त्याचबरोबर आयसीसीच्या कसोटी व एकदिवसीय एकादश संघाची धुराही त्याच्याकडेच सोपविण्यात आली. एकूणच यंदा क्रिकेटविश्वावर कोहलीने ‘विराट’ वर्चस्व राखले असेच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे कसोटी क्रमवारीत त्याने ९०० गुणांचा टप्पा पार करून अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय खेळाडू असा मानही मिळवला. याआधी केवळ सुनील गावसकर यांनी असा पराक्रम केला होता, तर सचिन तेंडुलकर (८९८) आणि राहुल द्रविड (८९२) यांचा विक्रम थोडक्यात हुकला होता. कोहली सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला आहे. मात्र, दुसरीकडे इतर खेळाडूंच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव अडचण ठरत आहे. हेच चित्र सध्या दक्षिण आफ्रिका दौºयात पाहायला मिळाले. आजपर्यंत गोलंदाजी ही टीम इंडियाची कमजोरी मानली जायची. दक्षिण आफ्रिकेत गोलंदाजांनी शानदार कामगिरी करताना भारतीय संघाला विजयानजीक आणले होते. पण, भारताची खरी ताकद असलेल्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला मालिकाही गमवावी लागली. तब्बल २५ वर्षांपासून भारताला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विजयांची मालिका गुंफलेला सध्याचा भारतीय संघ जबरदस्त मजबूत असून या वेळी आफ्रिकेतील अपयशाची मालिका नक्कीच खंडित होणार अशी आशा अनेकांनी व्यक्त केली होती. इतकेच काय, तर विराट सेनेचा धडाका पाहून खुद्द आफ्रिका संघालाही घाम फुटला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील वेगवान खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. त्यानंतरही फलंदाजांनी बोध घेतला नाही हे दुर्दैवच. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार कोहलीने पुन्हा एकदा एकाकी झुंज दिली. दोनवेळा संधी मिळूनही रोहित शर्मा अपयशी ठरला. कसोटी विशेषज्ञ असलेल्या चेतेश्वर पुजाराकडून झालेली चूक धक्कादायक होती, तर हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यात केलेल्या ९३ धावांच्या खेळीनंतर यशस्वी ठरला नाही. त्यामुळे गोलंदाजांची मेहनत वाया गेली. तरी, आफ्रिकेत पडलेल्या दुष्काळामुळे खेळपट्ट्या काही प्रमाणात फलंदाजीस अनुकूल झाल्या होत्या. मात्र, तरीही भारतीयांना चमक दाखवता आली नाही. त्यामुळे हा पराभव नकारात्मक मानसिकतेमुळे झाल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. येथील वेगवान खेळपट्टीवर फलंदाजी अवघड ठरणार, ही मानसिकता सर्वप्रथम फलंदाजांनी बदलण्याची गरज आहे. तसे झाले तरच यशाची कमान पुन्हा उंचावरती येईल.

Web Title: Keeping the speed of ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.