राजकीय समरांगणातील लोकप्रिय ‘ब्रॅन्ड’ केजरीवाल!

By admin | Published: February 13, 2016 03:48 AM2016-02-13T03:48:36+5:302016-02-13T04:25:25+5:30

दिल्लीकरांनी गतवर्षी सारे पर्याय धुडकावून आम आदमी पक्षाला स्वीकारले. ऐतिहासिक बहुमतावर स्वार होत दिल्लीत केजरीवाल सरकार सत्तेवर आले. रविवारी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी

Kejriwal popularly known as 'Brand' | राजकीय समरांगणातील लोकप्रिय ‘ब्रॅन्ड’ केजरीवाल!

राजकीय समरांगणातील लोकप्रिय ‘ब्रॅन्ड’ केजरीवाल!

Next

- सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)

दिल्लीकरांनी गतवर्षी सारे पर्याय धुडकावून आम आदमी पक्षाला स्वीकारले. ऐतिहासिक बहुमतावर स्वार होत दिल्लीत केजरीवाल सरकार सत्तेवर आले. रविवारी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी दिल्लीकर जनता आणि ‘आप’च्या अलौकिक प्रेमोत्सवाचा पहिला वर्षपूर्ती सोहळा आहे. ‘आप’ ने त्यासाठी कोणताही दिखाऊ समारंभ योजलेला नाही. मुख्यमंत्री केजरीवाल आणि दिल्ली सरकारचे सारे मंत्री रविवारी लोकांशी फोनवर संवाद साधणार आहेत व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत हा दिवस साजरा करणार आहेत. लोकचळवळीतून जन्मलेल्या ‘आप’चा आक्रमक अवतार, राजकारणात अभावानेच आढळणारे प्रामाणिक व पारदर्शी कामकाज, दांडगा लोकसंपर्क असे सारेच गुण आश्वासक आहेत. राजकीय समरांगणातला हा नवा प्रयोग दिल्लीकराना भावला आहे. आता दिग्विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी ‘आप’ ची पंजाबमधे घोडदौड सुरू झाली आहे.
भारतीय राजकारणात पंतप्रधान मोदींच्या तुलनेत मुख्यमंत्री केजरीवालही आता आम आदमी पक्षाचा ब्रँड बनले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा राजकीय ब्रँड त्यांच्या प्रसिध्दी मॅनेजर्सनी घडवला होता. केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या २0 महिन्यातच मोदी ब्रँड ला जोरदार धक्के बसायला सुरूवात झाली. दिल्लीत वर्षापूर्वी ७0 पैकी ६७ जागा जिंकून केजरीवालांनी मोदी ब्रँडला पहिला झटका दिला. प्रयत्नपूर्वक आपली प्रतिमा लोकांसमोर सादर केली. वर्षभराच्या सत्तेनंतरही कुठेही तिला तडा जाऊ दिला नाही. जनमानसात जे परसेप्शन केजरीवालांनी तयार केले तीच त्यांची शक्ति आहे. आजवरच्या त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आलेखही निश्चितच प्रभावी आहे.
आयआयटी खरगपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी प्राप्त केलेले केजरीवाल, भारतीय राजस्व सेवेत आयकर विभागाचे सह- आयुक्त होते. सामुदायिक नेतृत्वाच्या प्रयोगासाठी २00६ साली त्यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाला. भ्रष्टाचाराच्या विरोधात देशातला लक्षवेधी संग्राम उभा करताना विभिन्न क्षेत्रातले हजारो सहकारी त्यांनी जमवले. कालांतराने थेट राजकारणाच्या परिघात झेप घेत, एकदा नव्हे तर दोनदा ऐतिहासिक बहुमत मिळवून ते दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. केजरीवालांच्या अजेंड्याचे विच्छेदन करताना राजकीय विश्लेषक सुरूवातीला म्हणायचे, ‘आप’ चा अजेंडा ना वास्तववादी आहे ना व्यावहारिक. केजरीवालांनी मात्र त्याकडे लक्ष न देता आपला मार्ग शोधून काढला. राजकारणात इतर नेत्यांपेक्षा ते वेगळे आहेत. अजेंड्याचा पाठपुरावा करताना आपल्या तत्त्वांशी ते तडजोड करीत नाहीत. दिल्लीत प्रदूषणासारख्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कॅलेंडरच्या सम विषम तारखानुसार (आॅड/इव्हन) वाहनांच्या फेऱ्यांचा जगावेगळा विलक्षण पर्याय त्यांनी अजमावला. दिल्ली सरकारचा दैनंदिन कारभार सांभाळताना, केंद्र सरकार आणि नायब राज्यपालांशी झुंज देत प्रसिध्दीच्या वेगवेगळ्या व्यासपीठांचा त्यांनी कौशल्याने वापर केला. लोकचळवळीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर केजरीवालांनी सर्वप्रथम केला होता. मुख्यमंत्री बनल्यानंतर रेडिओ आणि व्हॉटस् अ‍ॅपचे माध्यमही त्यांनी झटपट आत्मसात केले.
‘आप’ चे सरकार वर्षापूर्वी सत्तेवर आले तेव्हा दिल्लीकर जनतेला केजरीवालांनी ७0 आश्वासने दिली होती. त्यापैकी वीज बील निम्म्या रकमेवर आणणे व प्रत्येक कुटुंबाला २0 हजार लिटर्स पाणी मोफत देणे या आश्वासनांची केजरीवालांच्या टीकाकारांनी जोरदार खिल्ली उडवली होती. स्वस्त लोकप्रियतेसाठी दिलेल्या या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सरकार पैसे कुठून आणणार, असे सवालही विचारले गेले. प्रत्यक्षात भ्रष्टाचार रोखून जे पैसे दिल्ली सरकारने वाचवले, त्यातून जनतेला या सबसिडीचा लाभ सरकारने मिळवून दिला. दिल्लीकराना पाणी फुकट पुरवले तर दिल्लीच्या जल बोर्डाचे एके दिवशी दिवाळे निघेल, अशी टीकाही होत होती. तथापि गत वर्षाच्या तुलनेत जल बोर्डाचे महसुली उत्पन्न १७६ कोटी रूपयांनी वाढले. पूर्वीच्या तुलनेत दररोज ३0 लाख गॅलन्स पाण्याची बचतही होऊ लागली. वर्षभरातले हे वास्तव. दिल्लीकर जनतेच्या हार्दिक सहकार्यामुळेच हा चमत्कार शक्य झाला, असे केजरीवाल म्हणतात. हवेतले जीवघेणे प्रदूषण आणि दिल्लीतल्या रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी, केजरीवालांनी घेतलेल्या वाहनांच्या ‘आॅड/इव्हन’ फेऱ्यांच्या धाडसी निर्णयाचेही दिल्लीकरांनी मनापासून स्वागत केले. देशातल्या तमाम शहरांनी अनुकरण करावे, असाच हा प्रयोग आहे. आॅप्टिकल फायबर, हॉटस्पॉटसारखे नवे पर्याय उपलब्ध झाल्याने येत्या तीन महिन्यात फ्री वायफायचा निर्णयही दिल्ली सरकार घेईल. ही सेवा मोफत दिल्यानंतरही सरकारचे महसुली उत्पन्न वाढेल, असा केजरीवालांचा दावा आहे. स्वच्छ व पारदर्शी कारभार करून, भ्रष्टाचाराला परिणामकारक वेसण घालणारे सरकार चालवता येते, हे केजरीवालांनी वर्षभरात सिध्द करून दाखवले आहे.
दिल्लीत मोदी सरकार आणि भाजपाची भूमिका नकारात्मक राजकारणाची आहे. दिल्लीतल्या तीनही महापालिका आणि नवी दिल्ली नगरपरिषद(एनडीएमसी)चा कारभार सध्या भाजपा आणि मोदी सरकारच्या हाती आहे. महापालिका सफाई कामगारांच्या बेजबाबदार संपाला चिथावणी देऊ न, दिल्ली महानगरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साठवण्यास भाजपाचा राजकीय आततायीपणा कारणीभूत ठरला. या प्रकरणात जनमानसात भाजपाने स्वत:चे हसे करून घेतले. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर जागोजागी दिल्ली सरकारची अडवणूक करण्याचा चालवलेला पोरखेळ, त्यांच्या घटनात्मक पदाला लाज आणणारा आहे. दिल्लीकर जनता मात्र ठामपणे केजरीवालांच्या पाठीशी उभी आहे. मोदी ब्रँडच्या तुलनेत दिल्लीत तरी केजरीवाल ब्रँड त्यामुळेच अधिक लोकप्रिय आहे.
वर्षभराच्या प्रवासात अण्णा हजारेंसारखे समाजसेवक केजरीवालांशी फटकून वागले. प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यासारख्या सहकाऱ्यांनी सवता सुभा उभा करण्याचा खटाटोप चालवला आहे. प्रत्यक्षात हे सारे जण केजरीवालांनी उभ्या केलेल्या आश्वासक दुनियेतले परप्रकाशित ग्रह होते. भ्रष्टाचार विरोधी लढाईत अण्णा हजारे तर केवळ बुजगावण्याच्या भूमिकेत होते, हे देखील वर्षभरात सिध्द झाले आहे. लोकचळवळीतून सत्तेवर आलेल्या सरकारांचा आजवरचा इतिहास फारसा उत्साहवर्धक नाही. वानगीदाखल आसाम गणपरिषद हे त्याचे एक उदाहरण. या इतिहासाला केजरीवालांचे ‘आप’ सरकार मात्र तूर्त तरी एक सन्माननीय अपवाद ठरले आहे.

 

Web Title: Kejriwal popularly known as 'Brand'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.