केशवसुतांनी सव्वाशे वर्षांपूर्वी स्वप्राणाने फुंकलेली ‘तुतारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:14 AM2018-04-06T00:14:22+5:302018-04-06T00:14:22+5:30
‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कविवर्य केशवसुतांनी विविध विषयांवर काव्यलेखन केले. त्यांनी लिहिलेल्या समाजप्रबोधनपर कविता सर्वाधिक सरस आहेत. या कवितांत ‘तुतारी’ या कवितेला मानाचं स्थान आहे. त्यांच्या सुप्रसिद्ध ‘तुतारी’ या कवितेला नुकतीच सव्वाशे वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त या अजरामर काव्याचे केलेले स्मरण...
- विजय बाविस्कर
‘एक तुतारी द्या मज आणून
फुंकील मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने...
सव्वाशे वर्षांपूर्वी कविवर्य केशवसुतांनी लिहिलेल्या ‘तुतारी’ या कवितेची सुरुवात या ओळींनी होते. त्यांच्या या कवितेने व्यक्तिस्वातंत्र्यांची, क्रांतीची, समतेची, नव्या मनूची ‘तुतारी’ फुंकली. एकोणिसाव्या शतकात इंग्रजी काव्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करून मराठी काव्यांत त्या संकल्पना रुजवण्याचे श्रेय केशवसुतांना जाते. त्यांनी संतकाव्य-पंतकाव्याचा प्रभाव असलेल्या मराठी काव्याला एक धीट वळण दिलं. त्यामुळे ‘आधुनिक मराठी काव्याचे जनक’ असा मान त्यांना मिळाला. आपल्या कवितांद्वारे त्यांनी महाराष्ट्रावर सुधारकी संस्कार केले.
केशवसुतांनी सतत २२ वर्षे काव्यलेखन केलं. ‘कविता आणि कवी’पासून ‘प्रतिभा’ या कवितेपर्यंत त्यांनी अव्याहतपणे विविध विषय हाताळले. दिव्य भास, आम्ही कोण, झपूर्झा, हरपले श्रेय, शब्दांनो मागुते या अशा त्यांच्या विविध कविता अजरामर झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या समाजप्रबोधनपर कवितांत रसिक, समीक्षकांनी ‘तुतारी’ या काव्याला सर्वश्रेष्ठ कवितेचा मान दिला. केशवसुतांनी ही कविता पहिल्यांदा लिहिली तेव्हा ती १७ कडव्यांची होती. ती त्यांनी मुंबईत लिहिल्याचा उल्लेख आढळतो. कालांतरानं त्यातील तेराव्या आणि चौदाव्या कडव्यात त्यांनी बदल केला व नंतर ही कविता २० कडव्यांची केली. ही कविता नावाप्रमाणे महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचं ‘रणशिंग’ ठरली. या कवितेनं मराठी मनांवर एवढा खोल ठसा उमटवला, की या कवितेत मांडलेल्या तत्त्वज्ञानावर आधारित कविता करणाऱ्या कवींचा एक ‘तुतारी संप्रदाय’च तयार झाला. झोपी गेलेल्या समाजाला जागं करण्याचं काम या ‘तुतारी’नं केलं. त्यामुळे ‘तुतारी’ ही सामाजिक क्रांतीचे खºया अर्थानं समरगीत ठरली. यातील ओळींना मंत्राक्षरांसारखं अमरत्व प्राप्त झालं. आजही या कवितेतील ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि..., प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा... सावध ऐका पुढल्या हाका... समतेचा ध्वज उंच धरा रे... या गाजलेल्या ओळी एखाद्या वाक्प्रचाराप्रमाणे वापरल्या जातात. सामाजिक विषमतेमुळे केशवसुत अस्वस्थ झाले होते. चुकीच्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान, जातिभेद या सर्वांविरुद्ध त्यांनी ‘तुतारी’द्वारे रणशिंगच फुंकले. सारंगी, सतार, सनई अशी वाद्ये नादमधुर आणि श्रवणीय असतात. पण विषमतेच्या, अज्ञानाच्या गोंधळात झोपी गेलेल्या सामान्य जनतेला जागं करण्यासाठी ही वाद्यं योग्य नाहीत. त्यासाठी कर्कश्श तुतारीच आवश्यक आहे. या हेतूनेच केशवसुतांनी ‘तुतारी’ वाद्य या कवितेसाठी निवडलं. ते प्रतीकात्मक आहे. ते म्हणतात, ‘सारंगी, ती सतार सुंदर
वीणा, बीनही, मृदंग, बाजा,
सूरही, सनई, अलगुज माझ्या
कसची ही हो पडतील काजा?
कालबाह्य रूढी, अंधश्रद्धा, अज्ञान, अन्यायाच्या अंधकारात समाजाचं पतन होत आहे. गोड वाद्ये वाजवत उत्सव साजरा करण्याचा हा काळ नाही. त्यामुळे या आव्हानांचा समूळ नायनाट करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारणे, त्यासाठी ‘तुतारी’ पुकारून निद्रिस्त समाजाला भानावर आणण्याचा केशवसुतांचा हेतू होता. दुर्दैवानं सव्वाशे वर्षांनंतरही या समस्या न संपल्याने ‘तुतारी’ ही कविता कालबाह्य ठरत नाही. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, जाळुनी किंवा पुरूनी टाका’ हा केशवसुतांचा संदेश मानून प्राप्तकाळात नवीन सुंदर अक्षरलेणी खोदणे, ही काळाची गरज आहे.