खैैरेंच्या शेंगा अन् कदमांची टरफले
By सुधीर महाजन | Published: December 20, 2017 11:54 PM2017-12-20T23:54:42+5:302017-12-21T00:04:43+5:30
शिवसेनेत भाजपविषयीचा सवतीमत्सर जोरावर असतानाच अंतर्गत हाणामारीसुद्धा तितक्याच मनापासून चाललेली दिसते. मराठवाड्यात सेना तशी औरंगाबादेत प्रभावी म्हणून येथील हाणामारीचा कांगावा थेट ‘मातोश्री’पर्यंत जातो. पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील ‘लव्ह-हेट’ स्टोरीला अनेक छटा आहेत.
शिवसेनेत भाजपविषयीचा सवतीमत्सर जोरावर असतानाच अंतर्गत हाणामारीसुद्धा तितक्याच मनापासून चाललेली दिसते. मराठवाड्यात सेना तशी औरंगाबादेत प्रभावी म्हणून येथील हाणामारीचा कांगावा थेट ‘मातोश्री’पर्यंत जातो. पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील ‘लव्ह-हेट’ स्टोरीला अनेक छटा आहेत. कधी अट्टी-बट्टी, तर कधी गळाभेट गट्टी अशी ती दिसत असली तरी वेळेवर डंख मारण्याची संधी कुणीही सोडत नाही. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे ही शिवसेनेची जुनी मागणी. दरम्यान, दोनवेळा सरकार आले तरी अजून ती पुढे सरकली नाही, म्हणून परवा शिवसेनेने आंदोलन केले. या आंदोलनाच्या विरोधात खरे तर विरोधकांनी आगपाखड करावी; पण पालकमंत्री रामदास कदमांनीच खैरेंवर टीका केली ती अशी, ‘खैरेंनी आता दुसºयाच्या नावावर शेंगा खाऊ नये स्वत: काही तरी करावे’, एका अर्थाने शिवसेनेच्या आंदोलनावर सेनेचाच मंत्री टीका करतो ही गोष्ट पचनी पडण्यासारखी नाही.
पालकमंत्री रामदास कदम ज्या-ज्या वेळी येतात तेव्हा काहीतरी वाद निर्माण होतो, आता शेंगा आणि टरफलांचा वाद पेटला. कारण शहराचे नामांतर होत नाही त्याला सेनेचे मंत्री जबाबदार आहेत, असा आरोप केला होता, तर प्रस्ताव केंद्रात असताना खैरे संसदेत काय करतात, असा सवाल कदमांनी उभा केला. खैरेंनी आपले मित्र नंदकुमार घोडेले यांना महापौरपदावर बसवले त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून अभय घेतले. त्यासाठी घोडेलेंना घेऊन ते थेट ‘वर्षा’वर धडकले होते. येथे पालकमंत्र्यांना त्यांनी अंधारात ठेवले, ही कदमांची सल आहे. शेंगा आणि टरफलाचे मूळ येथे सापडते.
नामांतराच्या या आंदोलनातही सेनेतील गटबाजी उघड दिसली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे गैरहजर होते. चार दिवसांपूर्वीच सिल्लोडचे नगरसेवक घरमोडे यांच्यावरील गुन्ह्यांसंदर्भात खैरे शिष्टमंडळासह जिल्हाधिकाºयांना भेटले त्यावेळीसुद्धा दानवे नव्हते. त्यांचा दानवेविरोध नवा नाही, तर दुसरीकडे दानवे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचे चांगलेच गूळ-पीठ आहे. त्यात जाधव आता गप्प बसले असले तरी खैरे-जाधवांची खडाखडी आजवर अनेक वेळा दिसून आली. दानवेंना जसा खैरेंचा विरोध तसा सेनेतील बिगर मराठा लॉबीचा विरोध; पण त्यांची जागा घेण्याची एकाचीही तयार नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खैरे कधी दानवेंच्या गळ्यात गळा घालतील याचा नेम नाही, म्हणून सगळेच सावध आहेत.
सेनेच्या संघटनात्मक बांधणीत पदांची खिरापत वाटली गेली. शहरात २४ शहर उपप्रमुख आहेत, तर तेवढेच उपजिल्हाप्रमुख नियुक्त केले, तसे महानगरपद निर्माण करून त्यावर प्रदीप जैस्वालांची नियुक्ती केली, अशी पदांची खिरापत वाटण्यात आली याचाच अर्थ निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली. आता आनंद तांदुळवाडीकर आणि गिरिजाराम हाळनोर यांना कोणती पदे मिळणार याची उत्सुकता आहे. तसेच सुहास दाशरथेंची व्यवस्था कुठे लागणार?
(sudhir.mahajan@lokmat.com)