खंड्या उडाला भुर्रर्र....

By admin | Published: September 22, 2016 05:49 AM2016-09-22T05:49:41+5:302016-09-22T05:49:41+5:30

मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण त्या खंड्याला सुखरूप देशाबाहेर जाऊ देणाऱ्या साऱ्यांच्या थोबाडीत मारल्यासारखे आणि सरकारी यंत्रणांचा गलथानपणा उघड करणारे आहे.

Khandya Udala Bhurrar .... | खंड्या उडाला भुर्रर्र....

खंड्या उडाला भुर्रर्र....

Next


देश आणि सरकार यांना हजारो कोटींना बुडवून खासदार विजय मल्ल्या हा किंगफिशर एअरलाईन्सचा मालक किंगफिशरसारखाच (म्हणजे खंड्या पक्षासारखा) भुर्रदिशी देश सोडून उडाला हे मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण त्या खंड्याला सुखरूप देशाबाहेर जाऊ देणाऱ्या साऱ्यांच्या थोबाडीत मारल्यासारखे आणि सरकारी यंत्रणांचा गलथानपणा उघड करणारे आहे. मल्ल्याची मालमत्ता जप्त होत होती, त्याच्या घरावर, बंगल्यांवर छापे घातले जात होते, त्याची विमाने आकाशात उडायची थांबली होती आणि त्याच्या विरुद्ध अनेक न्यायालयांत खटले दाखल होत होते. शिवाय त्याच काळात सरकारातली जबाबदार माणसे त्याला धडा शिकविण्याची भाषा बोलत होती. एवढे सारे होत असताना हा मल्ल्या जेट एअरलाईन्सच्या (ही एअरलाईन आणि तिचे मालक नरेश गोयल हेही आताशा एक संशयास्पद बनलेले व्यक्तिमत्त्व आहे) विमानाने, भरदुपारी, दोनेक डझन बॅगांसहित, पहिल्या वर्गाच्या तिकिटावर एका अज्ञात महिलेला घेऊन देश सोडून पळाला असेल तर ती त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या व त्याची चौकशी करणाऱ्या यंत्रणांएवढीच त्याच्याभोवती पिंगा घालणाऱ्या त्याच्या राजकीय व शासकीय दोस्तांचीही बेजबाबदारी मानली पाहिजे. मल्ल्याने विदेशात मोठ्या इस्टेटी जमविल्या आहेत. मुकेश अंबानी या उद्योगपतीने त्याच्या पत्नीला तिच्या वाढदिवसाला ३०० कोटींचे विमान भेट म्हणून दिले त्याची फार चर्चा देशात झाली. मात्र या मल्ल्याने आपल्या मुलाला त्याच्या वाढदिवशी आख्खी ‘खंड्या एअरलाईन’ भेट दिली त्याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. मल्ल्याच्या विदेशातील व विशेषत: दक्षिण आफ्रिकेतील हजारो एकरांच्या फार्म्सवर मुक्काम करून त्याचा पाहुणचार घेतलेल्या अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक पुढाऱ्यांची नावे देशाला व सरकारलाही ठाऊक आहेत. मल्ल्याचे हे मित्रही त्याच्या पळून जाण्याच्या काळात गप्प होते व नंतरही त्यांनी त्याविषयी कुठे कुजबूज केल्याचे दिसले नाही. त्यांनीही मल्ल्याच्या पलायनाची वार्ता सरकारी यंत्रणांपासून दडवून ठेवली. आता मल्ल्या बाहेर आहे आणि त्याच्यावरचे खटले देशात आहेत. त्याच्या अनुपस्थितीत चालणाऱ्या या खटल्यांचे भवितव्यही खंड्याएवढेच अधांतरी उडणारे आहे. तसाही या देशाच्या गाठीशी ललित मोदीच्या पलायनाचा अनुभव आहेच. त्याने क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आणि कोट्यवधींची माया जमविली. आपल्याला अटक होणार असल्याचे लक्षात येताच त्यानेही खंड्यासारखेच पलायन केले. त्याच्या पलायनाला प्रत्यक्ष सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे शिंदे यांचीही मदत होती. त्यासाठी मोदीने वसुंधराबाईंच्या खासदार चिरंजिवाच्या खात्यात काही कोटी रुपये जमा केल्याचे नंतर उघडकीलाही आले. आता तो इंग्लंडमध्ये आहे आणि तेथून भारतातल्या न्यायव्यवस्थेला व सुरक्षा यंत्रणेला वाकुल्या दाखवीत आहे. आपल्या समाजाचेही मोठेपण असे की तो अशा बड्या चाच्यांचे अपराध लवकर पोटात घालतो आणि विसरतो. यातला खरा प्रश्न ही माणसे अल्पावधीत एवढी धनवंत होतात कशी आणि त्यांच्या चौर्यकाळात त्यांच्यावर कुणाची नजर नसते कशी, हा आहे. सारे काही होऊन गेल्यानंतर आणि ही माणसे पार हाताबाहेर गेल्यानंतर त्यांच्या विरोधात गैरजमानती वॉरंटे काढण्यात काही अर्थ नसतो हे न्यायालयांनाही चांगले समजते. त्यांची जेवढी मालमत्ता आपण जप्त केली त्याहून कितीतरी पटींनी अधिक संपत्ती त्यांनी देशाबाहेर पळविली हे चौकशी यंत्रणांनाही कळते. त्याहून गंभीर बाब ही की त्यांना तसे पळून जाण्यात मदत करणाऱ्या पुढाऱ्यांची, मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची नावे साऱ्या संबंधित यंत्रणांना कधीचीच ठाऊकही असतात. समाजाचा या लुच्च्या सहकाऱ्यांवर तेवढासा राग नसतो आणि त्यांची भलावण देशातील माध्यमे आणि मोठी माणसेही करीत असतात. ज्या इंग्लंडमध्ये विजय मल्ल्या आणि ललित मोदी सध्या आनंदात आहेत त्या देशाशी भारताचे संबंध मैत्रीचे आहेत. मात्र आमच्या गुन्हेगारांना आमच्या स्वाधीन करा असे भारत सरकारने इंग्लंडच्या सरकारला कधी म्हटले नाही. इंग्लंड ही लोकशाही आहे. तरीही भारताला त्या देशाला आमचे गुन्हेगार आमच्या ताब्यात द्या असे म्हणता येत नसेल तर या देशाचे राज्यकर्ते पाकिस्तानसारख्या गुंड व दहशतखोर देशात दडून बसलेल्या दाऊद इब्राहीम आणि हाफिज सईद या आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम असलेल्या गुन्हेगारांना आमच्याकडे द्या हे कसे म्हणू शकतील? आज ना उद्या दाऊदला भारतात आणू असे दिल्ली सरकारतले मंत्री तर म्हणतातच पण अलीकडे त्याला पकडून आणण्याची भाषा मुंबईचे दुबळे मंत्रीही बोलू लागले आहेत. जी माणसे मल्ल्या वा ललित मोदीला देशात आणू शकत नाहीत त्यांच्या तोंडी दाऊद आणि हाफीज यांना पकडण्याची भाषा नुसती वायफळच नव्हे तर कमालीची हास्यास्पद वाटावी अशी आहे. तिला यश येण्याची शक्यता नाही आणि देशानेही त्याची वाट पाहाण्यात अर्थ नाही.

Web Title: Khandya Udala Bhurrar ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.