स्वातंत्र्य लढ्यातील खारोट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 04:36 AM2018-08-15T04:36:33+5:302018-08-15T04:36:48+5:30

१५ आॅगस्ट, अत्यंत अभिमानाचा दिवस. किती आठवणी त्यामागे. लहानवयात स्वातंत्र्य शब्दाचा अर्थपण डोक्यावरून जायचा. पण त्याबद्दल चाललेल्या चर्चा, आवेश मोठ्या मुलांची छाती फुगवून तावातावात बोलणं हे सारं आजूबाजूला घडत असताना, बघत असताना मनात काहीतरी खळबळ असायचीच.

 Kharuya in the freedom fight | स्वातंत्र्य लढ्यातील खारोट्या

स्वातंत्र्य लढ्यातील खारोट्या

Next

- सौ. शोभना (चिकेरुर) खर्डेनवीस

१५ आॅगस्ट, अत्यंत अभिमानाचा दिवस. किती आठवणी त्यामागे. लहानवयात स्वातंत्र्य शब्दाचा अर्थपण डोक्यावरून जायचा. पण त्याबद्दल चाललेल्या चर्चा, आवेश मोठ्या मुलांची छाती फुगवून तावातावात बोलणं हे सारं आजूबाजूला घडत असताना, बघत असताना मनात काहीतरी खळबळ असायचीच. शाळेत पण तेच. त्या प्रभात फेऱ्या, तावातावात म्हटलेली देशभक्तीपर गीतं सारं भारावून टाकायचं.
लख्ख आठवतयं, शाळेत एका सिनियर ताईनी सांगितलं होतं, बहुधा प्रभा नाव होतं. ‘उद्या कुणी शाळेत यायचं नाही’ ‘सुटी आहे’? एका छोटीनी आनंदानं, विचारलं ‘सुट्टी नाही, बुट्टी मारायची. स्वातंत्र्य हवंयना’ ‘हो ऽऽऽ’ सगळ्या चित्कारल्या. काय माहीत स्वातंत्र्य काही घरी गेल्यावर सांगितलं, उद्या शाळा नाही - ‘का’? आई-ताई सारे सुटी कशाची? ‘सुटी नाही, बुटी’. मी ‘नाही शाळेत जायचंच. उगीच घरी राहायचं नाही’ आई. नाही जाणार, स्वातंत्र्य हवंच ना’ मी. सारे हसले. आईला एकटं पाहून विचारलं - स्वातंत्र्य म्हणजे काय? ते कुठून आणायचं, कोण देतं सगळ्यांना, ते का हवंय. आईनं हसत पण छान समजावलं. तुझी बाहुली छायानं घेतली, तुझी रिबिन घेतली, तुझं ताट घेतलं आणि हे माझं आहे म्हटलं तर. ‘मुळीच नाही, ते माझं म्हणजे माझंच आहे’ हो ना तसंच आपला देश, हे आपलं घर, आपलं गाव कुणी म्हटलं आमचंच आहे तर. हा देश इंग्रज आपला असताना आमचा आहे म्हणतात. तो आपण परत घ्यायचा, त्यांना परत पाठवायच’ ‘इंग्रज म्हणजे ते गोरे ना, गाडीतून जातात, बिस्कीट, पाव फेकतात. आपले लोक धावतात रेल्वे लाईनवर ते वेचायला’ ‘हो ग बाई जा आता, आज एवढं पुरे’. आमच्या घरामागे रेल्वेलाईन होती त्यावेळी हे ब्रिटिश आर्मीचे किंवा अधिकारी आगगाडीने जात. जाताना बिस्किटांचे पुडे , पाव काय काय फेकायचे आणि खरंच गरीबच नाही - इतर पण लहान-मोठे, पोरंटोरं धावत सुटायचे ते घ्यायला. हे इंग्रज खूप हसायचे, टिंगल करायचे. असो
तर बुट्टी मारून दुसºया दिवशी शाळेत गेलो तर सन्नाटा. प्रिन्सिपाल बाई प्रत्येक वर्गात जाऊन ‘हजेरी’ घेत होत्या. शिक्षक मौन धरून. प्रिन्सिपॉल आमच्या वर्गावर ‘बोला काल शाळेत का आल्या नाहीत, कोण कोण आलं नाही’ सारा वर्ग उभा. बाईला खूप राग आला. जोरात ओरडल्या ‘कुणी सांगितलं शाळेत यायचं नाही, बोला . काय ग कुणी सांगितलं, कुणाची परवानगी घेतली. बोला नाही तर शिक्षा करीन’, दाणकन पट्टी आपटली. साºया मुली चूप. कुणी प्रभाताईचं नाव सांगेना. बाई आणखी चिडल्या. एका बेंचजवळ जाऊन हळूच मऊ आवाजात बोलल्या, सांगतेस का, शहाणी ना, कुणी सांगितलं,’ तिचा रडवेला चेहरा, घाबरलेला, पण जाम बोलेना. मान हलवली. ‘नाही’ त्या आणखी चिडल्या जोरात बेंचवर पट्टी आपटली. तिला घाबरून सू झाली . ती जोरात रडायला लागली. बघता बघता सारा वर्ग रडायला लागला. हलकल्लोळ, प्रिन्सिपाल रागारागात बाहेर गेल्या. वर्गशिक्षिकेचा चेहरा हसरा, रिलॅक्स. घरी आल्यावर आईबाबा सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांनी जवळ घेतलं .‘मग स्वातंत्र्य हवंय नां, एवढं करायला हवं’. सारे खूप हसले, हा पहिला प्रयोग.
काही महिन्यांनी आमच्या चौकात खूप लोक गोळा झाले होते. होळी करत होते. भाऊ-बहीण तिथेच होते. आईची लगबग होती. बाबा घरी नव्हते. बाहेर काहीतरी घोषणा सुरू होत्या. स्वातंत्र्य शब्द होता. आईला विचारलं , विदेशी वस्तूंची होळी’ म्हणजे इंग्रजी वस्तू’. ‘हो ग बाई’ मी आत गेले. माझी अननसाची बाहुली, अत्यंत आवडती हुडकून काढली. त्याला शंकरपाळ्याचं डिझाईन होतं म्हणून का काय दुसरं पण ती अननसाची बाहुली. तोडू पण झाली होती. शिल्लक होती ती घेतली. एक डबा होता त्यावर इंग्रज राणी होती तो घेतला. मी पण ते होळीत टाकलं विदेशीची होळी केली. प्रभातफेºया काढायच्या जोरजोरात वंदे मातरम् म्हणायचं. गल्लीतच देवभानकर काकू नाटुकल्या, गाणी स्वत: लिहून बसवायच्या. गोडबोल्यांच्या विठ्ठल मंदिरात करायचं. बहुतांश देशभक्तीपर असायची. खूप आवेश यायचा. एकदा त्या नाटकात सारे वंदे मातरम् म्हणतात असं होतं. त्याचा आवाज एवढा मोठा झाला कारण प्रेक्षक पण सामील झाले. कुणीतरी पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस आले. थोडं घाबरलो पण नाटक सुरू ठेवलं आणि त्यातलंच एक भजन मामींनी सुरू केलं. सारे भजनात दंग झाले. पोलिसानं पाहिलं विपरीत काही नाही, चुपचाप परत गेला, गॅलरीतून पाहिलं, गल्लीबाहेर गेला आणि पुन्हा सारे भजनाच्या नाटकातून चालू नाटकात शिरले. हे सारं पाहत असताना अनुभवताना आम्ही तयार होत होतो, वाचन वाढत होतं, वाचनाची गोडी घरात सर्वांनाच होती. वडील डॉक्टर होते पण सामाजिक कार्यात अग्रेसर होते. काँग्रेसचं पहिलं अधिवेशन फैजपूरला झालं. त्याच्या बैठका आमच्या घरी वडिलांकडे जळगावला झाल्या आहेत. वाचन पण त्यावेळी बाळबोध, पण गांधी-बोस स्वातंत्र्यलढा सावरकर अशा गोष्टीरूपात होत होतं. त्याच गोष्टी आमच्यापेक्षा लहानांना सांगत होतो. स्फुल्लिंग जागवत होतो. एवढंच काय टकळीवर सूतकताई केली शिकलो. आताही बहुधा ते येईल. स्वातंत्र्यासाठी फार काही नाही केलं, पण जे बालवयात केलं ते आसुसून मनापासून केलं. त्यावेळी माझा देश स्वातंत्र्य, वंदे मातरम् हा मंत्र रक्तात भिनला होता. खूप चेव यायचा, आवेश असायचा. सारं खरं होतं आता मात्र हसू येतं. १५ आॅगस्ट असाही लक्षात राहतो.

Web Title:  Kharuya in the freedom fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.