खाशाबा ते स्वप्निल! मराठमोळ्या माणसाचे तब्बल ७२ वर्षांनी मोठे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2024 08:02 AM2024-08-03T08:02:04+5:302024-08-03T08:03:17+5:30
प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा असा हा क्षण होता.
विविध क्रीडा प्रकारांत अग्रेसर असणारा प्रांत म्हणून महाराष्ट्राची ओळख असली तरी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात मराठमोळ्या माणसाने तब्बल ७२ वर्षांनंतर यश मिळविले आहे. फिनलँडची राजधानी हेलसिंकीमध्ये जुलै १९५२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडजवळच्या गोळेश्वर या छोट्या गावातील खाशाबा दादासाहेब जाधव या तरुणाने फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. हा पराक्रम करण्याची संधी अनेकांना मिळाली. मात्र, यश मिळाले नाही. पॅरिसमध्ये चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या ११६ खेळाडूंपैकी कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल सुरेश कुसाळे याने तो पराक्रम केला. या ऑलिम्पिकमधील आतापर्यंतचे भारताचे तिसरे पदक, मराठमोळ्या तरुणाचे दुसरे आणि क्रीडानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरचे पहिले पदक ठरले आहे. प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा असा हा क्षण होता.
खाशाबा जाधव यांनी असा पराक्रम ७२ वर्षांपूर्वी केला होता. हॉकीसारख्या सांघिक खेळात भारताचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दबदबा होता. अनेकवेळा सुवर्ण पदकांसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. हॉकीमध्ये पंजाबच्या तरुणांचा नेहमीच दबदबा असतो. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कुस्ती, नेमबाजी आणि ॲथलेटिक्समध्ये सहभाग घेऊन संघर्ष केला आहे. खाशाबा आणि स्वप्निल या दोघांच्या पराक्रमामध्ये ७२ वर्षांचे अंतर असले तरी कौटुंबिक पार्श्वभूमी, खेळासाठीचे मार्गदर्शन, आर्थिक मदतीचा संघर्ष सारखाच आहे. खाशाबाचे वडील शेतकरी होते. कुस्तीगिर होते. आपल्या एकातरी मुलाने कुस्तीचे मैदान गाजवावे अशी त्यांची इच्छा होती. खाशाबाने कोल्हापूरमध्ये कुस्तीचे धडे घेतले.
कोल्हापूरचे महाराजा शहाजीराजे आणि ज्या राजाराम महाविद्यालयात ते शिकत होते त्याचे प्राचार्य बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांनी आर्थिक मदत केली. खाशाबाने १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रथम भाग घेतला. त्याला मातीतील कुस्ती खेळण्याचा सराव होता. अचानक मॅटवरची कुस्ती खेळावी लागली तरी त्याने सहावा क्रमांक पटकावला. स्वप्निल कुसाळे याचे ऑलिम्पिक आधुनिक भारताचे प्रतिनिधित्व करीत असले तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धांची पात्रता अंगी उतरवेपर्यंत कोणाची आर्थिक मदत मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
कांस्य पदक मिळताच लाखो-कोट्यवधींच्या बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला; पण, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असणाऱ्या सुरेश कुसाळे आणि छोट्याशा कांबळवाडी गावच्या विद्यमान सरपंच अनिता कुसाळे यांना कर्ज काढून स्वप्निलला प्रशिक्षणाची सोय करून द्यावी लागली. कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ राधानगरी तालुक्यातील बाराशे लोकवस्ती असलेल्या कांबळवाडीचा स्वप्निल! चौथी इयत्तेपर्यंत गावातच शिकत होता. इंग्रजी माध्यमासाठी त्याने भोगावती, सांगली, मिरज, नाशिक आणि मुंबई असा प्रवास करीत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. या काळात नेमबाजीसारख्या महागड्या क्रीडा प्रकाराची त्याला भुरळ पडली. त्याने त्याचे सोने करायचा चंग बांधला होता.
आई-वडिलांनीदेखील पैसा जमवून त्याला प्रोत्साहन दिले. खाशाबा जाधव यास हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत जाण्यासाठी प्राचार्य खर्डेकर यांनी स्वत:चे घर गहाण ठेवून बँकेकडून सात हजार रुपयांचे कर्ज काढले होते. स्वप्निलच्या वडिलांनाही त्याच मार्गाने जावे लागले. खरे कौशल्य भारताच्या ग्रामीण भागातच आहे. नाशिकची धावपटू कविता राऊत हिच्यासारखे खेळाडू काबाडकष्ट करून मेहनतीने क्रीडा स्पर्धा गाजवित असतात. अपवादाने एखादाच अभिनव बिंद्रा असतो. ज्याची कौटुंबिक परिस्थिती भरभक्कम असते आणि त्याचे बळ मिळते. अलीकडे खेलो इंडिया प्रकल्पामुळे खेळाडूंना थोडा आधार मिळतो आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू सोळा क्रीडा प्रकारांत खेळत आहेत. त्यासाठी भारताने ४७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
स्वप्निलसाठी महाराष्ट्र सरकारनेही पन्नास लाखांची मदत केली. नेमबाजीतील थ्री पोझिशिन क्रीडा प्रकाराची तयारी करणे खूप खर्चीक आहे. शिवाय प्रशिक्षक, मैदान किंवा शूटिंग रेंज आधुनिक असणे, पॅरिसच्या हवामानाची सवय होण्यासाठी फ्रान्समध्ये आधीच राहून सराव करणे अशा अनेक पातळीवर खेळाडूंना तयारी करावी लागली. स्वप्निल कुसाळे याच्या कांस्य पदकाने स्फूर्ती निश्चित दिली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करून प्रोत्साहन द्यायला हवे. कोल्हापुरात १९५८ पासून नेमबाजीत प्रावीण्य मिळविण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्वप्निलच्या निमित्ताने त्याचा विस्तार करण्यासाठीचे नियोजन व्हावे, हाच त्याचा सन्मान असेल!