लात हाणोनिया। गुंड वाट शुद्ध करी

By admin | Published: March 8, 2016 09:00 PM2016-03-08T21:00:30+5:302016-03-08T21:00:30+5:30

पीएच.डी.साठी एक प्रवेशपूर्व परीक्षा आहे; पण तेथेही सर्व ‘मॅनेज’ असते. त्या परीक्षेला दर्जाच उरला नाही. कारण संशोधनाचे विषय हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.

Kick hymenia Gund Wat Clean Curry | लात हाणोनिया। गुंड वाट शुद्ध करी

लात हाणोनिया। गुंड वाट शुद्ध करी

Next

पीएच.डी.साठी एक प्रवेशपूर्व परीक्षा आहे; पण तेथेही सर्व ‘मॅनेज’ असते.
त्या परीक्षेला दर्जाच उरला नाही.
कारण संशोधनाचे विषय
हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.
उच्च शिक्षणातील हा बाजारबसवेपणा समूळ उखडून टाकण्याची ही वेळ आहे.
एक द्रव्याने विकिले।
एक शिष्याने आखिले
अति दुराशेने केले।
दीन रूप जसा वैद्य दुराचारी।
केली सर्वेस्वी बोहरी
आणि सेखी भांड करी।
घातघेणा । तेसा गुरु नसावा
‘दासबोध’ या ग्रंथात गुरूची लक्षणे सांगताना गुरू कसा नसावा हे चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी जे सांगितले ते आजही तंतोतंत लागू पडते. खरं म्हणजे आता गुरुपौर्णिमाही नाही, गुरूंची आठवण होण्यासाठी. पण गुरू आठवले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी.चा भरलेला बाजार पाहून समर्थांची आठवण झाली. हे विद्यापीठ बाबासाहेबांच्या नावाचे. ज्यांनी मराठवाड्यात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ज्यांनी आयुष्यभर विद्येची कास धरली तेथेच हा बाजार चालतो आणि तोही बिनदिक्कत.
पदव्यांचा बाजार मांडला तसा त्याची किंमतही ठरू लागली. ‘लोकमत’ने जेव्हा हे बिंग फोडले तेव्हां त्याची भयानकता उघड झाली. पीएच.डी.करायची तर पात्रता महत्त्वाची नाही. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याऐवजी त्यांच्याकडून खंडणीरूपात दक्षिणा उकळणारी टोळीच तयार झाली आहे. या टोळीत कोण साव आणि चोर हे सांगता येत नाही. कारण विद्वत्तेचा बुरखा जसा जसा फाडला जाईल तसे चोर कोण हे उघड होणार. गाईड नावाचा प्राणी खरोखरच मार्गदर्शन करतो की विद्यार्थ्यांची आर्थिक, शारीरिक, मानसिक पिळवणूक करतो, हाच चर्चेचा विषय आहे. पीएच.डी. साठी ५० हजारांवरून तीन लाखांपर्यंत दक्षिणेचा दर आहे. हा झाला रोखीचा व्यवहार.
या देण्या-घेण्याच्या व्यवहारातही विविधता दिसते. एका गुरुची पत्नी विमा व्यवसाय करते. या व्यवसायाला हातभार लावून तिला दरवर्षी करोडपती बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना सेवा द्यावी लागते. शिवाय गाडीत पेट्रोल भरणे, गॅरेजवर घेऊन जाणे, घरची-कार्यालयाची कामे करणे अशा सेवावृत्तीचा अंगीकार करावा लागतो. महिला विद्यार्थ्यांकडून तर लैंगिक छळाच्या तक्रारी पूर्वी आलेल्याच आहेत. त्यातून विद्यार्थिनींची बदनामी होते ती वेगळी; पण या साऱ्या प्रकारांनी शैक्षणिक वातावरणाचे तीनतेरा वाजतात, त्याची फिकीर चोथा चघळणारे आणि विद्यापीठ प्रशासनही करीत नाही. गाईडच्या जाचात भरडला जातो तो विद्यार्थी. त्याला व्यथा सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. विद्यार्थ्यांना जी पाठ्यवृत्ती (फेलोशिप) मिळते त्यातही काही गाईड आपला हिस्सा ठेवतात. २५ ते ७५ टक्के रक्कम गाईडला द्यावी लागते.
पीएच.डी.साठी एक प्रवेशपूर्व परीक्षा आहे; पण तेथेही सर्व ‘मॅनेज’ असते. कारण त्या परीक्षेला दर्जाच उरला नाही. कारण संशोधनाचे विषय हासुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे. दरवर्षी पीएच.डी.चे प्रबंध मंजूर होतात, त्यापैकी किती लोकोपयोगी असतात? या संशोधनातून सामान्य माणसाचे जीवनमान बदलणारे किती, देश उभारणीसाठी हातभार लावणारे किती हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. उच्च शिक्षणातील हा बाजारबसवेपणा समूळ उखडून टाकण्याची ही वेळ आहे. अशा प्रकारांनी विद्यापीठाचा दर्जा खालावला हे नाकारून चालणार नाही. त्याहीपेक्षा कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासन या प्रवृत्तींचा नि:पात कसा करतात हेच महत्त्वाचे आहे. भलेही एखादी विद्याशाखा, प्रयोगशाळा उभारणे लांबणीवर पडेल. एखादा आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेता आला नाही तरी चालेल; पण शिक्षण व्यवस्थेला पोखरणाऱ्या या किडीचा बंदोबस्त जरूरीचा आहे. नसता विद्यापीठ नावापुरते उरेल; पण त्याहीपेक्षा बाबासाहेबांच्या नावाशी केलेली गद्दारी ठरेल. संत तुकारामांनी म्हटले आहे-
दुर्जनांचा मान। सुखे करावा खंडण।।
लात हाणोनिया वारी। गुंड वाट शुद्ध करी।
तुका म्हणे नखे। काढूनी टाकिजे ती सुखे।।
- सुधीर महाजन

Web Title: Kick hymenia Gund Wat Clean Curry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.