मुलांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’शी मैत्री करावी, कारण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 07:30 AM2024-01-24T07:30:43+5:302024-01-24T07:31:20+5:30
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा मुलांच्या विकासातील मोठाच धोका असल्याचा भयगंड दूर सारून या नव्या साधनाशी मुलांना सुरक्षितरीत्या जोडता येऊ शकते.. कसे?
-डॉ. रीता श्रीकांत पाटील
वीस-तीस वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत टायपिंगची मूलभूत कौशल्ये शिकवली गेली असतील. परंतु, आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) धडा गिरवणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. दैनंदिन जीवनात एआयचा वापर कसा करायचा या मूलभूत गोष्टींपासून एआय शिकण्याची सुरुवात होते. डेटामधील पॅटर्नमधून यंत्रे कशी शिकू शकतात आणि एआय जबाबदारीने शिकवणे का गरजेचे आहे, याचे साधे, गैर-तांत्रिक स्पष्टीकरण मुलांच्या शिक्षणाचा भाग झाला पाहिजे. थेट प्रात्यक्षिक अनुभव मुलांना एआयच्या संभाव्य उपयोगांचा आणि मर्यादांचा प्रत्यक्ष अनुभव देईल. विद्यार्थ्यांना आवश्यक एआय संकल्पनांचा परिचय करून देण्यासाठी शिक्षक तीन ते सहा मिनिटांचे व्हिडीओ साधन म्हणून वापरू शकतात.
एआय प्रणालीची रचना आणि विकास करताना मुलांच्या हक्कांना आणि कल्याणाला नवोन्मेषकांनी प्राधान्य दिले पाहिजे. भावी पिढ्यांना कोडिंग कौशल्याने सुसज्ज करण्यासाठी आणि त्यांना पुरेसे एआय प्रशिक्षण देण्यासाठी एआय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले पाहिजे. त्याच वेळी, मुलांना तंत्रज्ञानाबद्दल गंभीरपणे विचार करण्यास आणि संबंधित धोक्यांबद्दल उचित निर्णय घेण्यास शिकवले पाहिजे. त्यातूनच ‘ग्लोबल नॉर्थ’ आणि ‘ग्लोबल साउथ’ या दरम्यानची डिजिटल साक्षरतेची दरी भरून काढण्यास नक्कीच मदत होईल.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मुलांचे शिक्षण, खेळ आणि विकासाच्या वातावरणासह त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी संवाद साधण्याची पद्धती बदलेल यात शंका नाही. हा बदल चांगल्यासाठी व्हावा, याची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे.
भारताच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीत सर्व भाषिक शिक्षण ही काळाची गरज आहे. भारत हा बहुभाषिक देश असल्याने विद्यार्थ्यांसाठी भाषा शिकणे आणि शिक्षकासाठी ती शिकविणे हे एक मोठे आव्हान असते. भारतीय शिक्षण क्षेत्रात एआय-सक्षम ‘चॅट जीपीटी’सारखे साधन वापरून भाषा शिक्षण सुलभपणाने घेतले जाऊ शकते. ‘चॅट जीपीटी’ हे भाषा शिक्षणासाठी उत्तम साधन आहे, कारण त्याद्वारे कमी वेळात भाषा प्रात्यक्षिके आणि चाचण्यांसाठीच्या प्रश्नावल्या तयार करता येतात. या शिक्षणाव्यतिरिक्त ऑनलाइन बुलिंग आणि बाल शोषण याचा पर्दाफाश करून मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एआय आधारित उपकरणे / प्रणालीच्या तैनातीची उदाहरणेही पुढे येत आहेत.
‘लहान मुलांनी एआय शिकण्याची गरज का आहे?- याची काही कारणे :
१) एआयची मूलभूत क्षमता जाणून घेणे आणि एआय ॲप्लिकेशन्स वापरणे. आजच्या डिजिटल जगात एआय साक्षर होणे हे सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे.
२) मुलांना एआय समजून घेण्यासह, वापरण्यासाठी आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी सशक्त करणे आवश्यक आहे.
३) मुलांमध्ये एआयची मूलभूत कार्ये समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे. वर्गात शिकलेले ज्ञान वास्तविक जगातील परिस्थितीशी ताडून पाहणे त्यामुळे मुलांसाठी सोपे होईल. एआय खेळणी मुलांना हाताळायला मिळाली, तर मुलांची तीन साक्षरता कौशल्ये वाढतात : चौकशी साक्षरता, भावनिक चौकशी साक्षरता आणि सहयोगी चौकशी साक्षरता. भविष्यात मुलांसाठी ‘एआयसाठी सुसज्ज पिढी’ या नावाने उपक्रम सुरू होत आहे. एआय मुलांकरता सुरक्षित बनवण्यासाठी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने ‘स्मार्ट टॉईज अवॉर्ड्स’ सुरू केली आहेत. मुलांसाठी सुरक्षित स्मार्ट खेळण्यांच्याद्वारा शिकण्याच्या संधी वाढवण्यासाठी, या प्रक्रियेतले धोके कमी करण्यासाठी हा उपक्रम मदत करील.