Killari Earthquake : मूकवेदनेला ‘लोकमत’चा आवाज अन् मायेची फुंकरही...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 03:53 AM2018-09-30T03:53:48+5:302018-09-30T11:23:35+5:30
Killari Earthquake : २५ वर्षांपूर्वी ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे नियतीच्या प्रलयंकारी, महाविध्वंसक तांडवात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. हजारो घरं जमीनदोस्त झाली.
राजेंद्र दर्डा
२५ वर्षांपूर्वी ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे नियतीच्या प्रलयंकारी, महाविध्वंसक तांडवात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. हजारो घरं जमीनदोस्त झाली. माणसांच्या मरणाचं तर तांडवच त्या अंधारपहाटी सुरू होतं. थोडीथोडकीनव्हे तब्बल १०,००० माणसं धरतीमातेनं आपल्या पोटात घेतली. हुंदक्यांचा प्रवासच सुरू झाला. निसर्गानं दु:ख करायलाही सवड दिली नाही. धरणीकंपात उद्ध्वस्त झालेली घरदारं, मोडून पडलेली माणसं नि सोडून गेलेले नातलग... सगेसोयरे... आणि त्यानंतर कोसळत राहिलेला धुवाधार पाऊस, दु:ख उधळायला आसवांना वेळ तरी कुठं होता? आपल्या वाटेला आलेले जखमांचे क्रूस आपल्याच खांद्यावर ते वाहून नेत होते. ‘सांडोनि प्रबोधनाची संगती, चालों नये इतर पंथी’चा वसा घेतलेल्या ‘लोकमत’नं मातीशी नातं सांगत अशा पिचलेल्या, मोडून पडलेल्या माणसांना पुन्हा उभं करण्यासाठी आपली वज्रमूठ आवळली. नियतीलाच ठणकावून सांगितलं.
‘तुम्हें शौक है जहां बिजलियाँ गिराने का
हमें जिद है वहीं आशियाँ बनाने की’
औरंगाबादेतील अनेक सहकारी मित्र, आमचे वाचक आणि समाजसेवी संस्थांच्या सहयोगातून ‘लोकमत भूकंपग्रस्त निधी’ उभा राहिला. अज्ञात भुकेलेल्यांची नि:शब्द आव्हानं समोर उभी होती. मात्र, ‘लोकमत’नं त्याच उद्ध्वस्त वस्तीत आपल्या परीनं आनंदाचं घरटं बांधलं. अन्नधान्य, कपडे, उबदार रजया, कंदिल, घासलेट, गॅसबत्त्या, स्टोव्ह, धोतरजोड्या, आट्याची नि साखरेची पोती...अगदी काड्यांच्या पेट्यांपासून डोईवरच्या फेट्यांपर्यंत जगण्याची अशी सामुग्री घेऊन ‘लोकमत’चे काही ट्रक्स औरंगाबादहून घेऊन आम्ही सास्तूरकडं रवाना झालो. तिथं आधीच पोहोचले होते ‘लोकमत परिवारा’तील बिनीचे सैनिक. ‘लोकमत’चे जयप्रकाश दगडे, विजयकुमार बेदमुथा, राम अग्रवाल, जगदीश पिंगळे, श्यामसुंदर बोरा, मधुकर यादव यांनी अनेक दिवस त्याठिकाणी तळ ठोकून वाचकांसाठी ‘आॅन दी स्पॉट’ रिपोर्टिंग केलं. औरंगाबादहून मदतीचे ट्रक ज्या वेळेस पोहोचले त्या वेळेस भूकंपग्रस्त आया-बाया-बापे केविलपणे होऊन तिथं रांगेत उभे होते. काही तालेवारांनी भूकंपामध्ये सर्वस्व गमावलं होतं; पण ते संकोचामुळं पुढं येत नव्हते. त्यामुळं शेवटी मदतीचा एक ट्रक त्या १५-२० सधन भूकंपग्रस्तांच्या शेतात नेऊन उभा केला नि तिथं ‘लोकमत’नं त्यांच्याभोवती ओंजळ धरून त्यांना मदतीचा हात पुढं केला.
लोकमत वृत्तपत्र समूहानं भूकंपग्रस्त निधीतून बांधलेल्या चार प्रशस्त आणि सुसज्ज अंगणवाड्यांचे लोकार्पण त्यावेळी मुख्यमंत्री असलेले मनोहर जोशी यांच्या हस्ते २३ आॅगस्ट १९९६ रोजी संपन्न झाले. या प्रत्येक अंगणवाडीत दोन खोल्या, एक सभागृह, एक स्वयंपाकगृह आणि एक संडास-बाथरूम यांचा समावेश होता. शासकीय नियमाप्रमाणे ४०० चौरस फुटांच्या अंगणवाड्या उभारणे आवश्यक होते; परंतु ‘लोकमत’नं एक हजार चौरस फुटांच्या वर अंगणवाड्या उभारल्या. सामाजिक बांधिलकी प्रमाण मानणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने बांधण्यात आलेल्या चार टूमदार अंगणवाड्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यावेळी हस्तांतरित करण्यात आल्या. त्या सोहळ्याचे साक्षीदार होते उस्मानाबाद जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुरेश नवले, गृहनिर्माणमंत्री चंद्रकांत खैरे, क्रीडा व पाटबंधारे राज्यमंत्री गुलाबराव गावंडे. ‘लोकमत’च्या सामाजिक जाणिवेला मुजरा करण्यासाठी आपण आलो आहोत, असं मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हणाले आणि सास्तूरकरांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात ‘लोकमत’बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या अंगणवाड्या आपल्यासाठी केवळ इमारती नाहीत, दु:खितांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची जाणीव त्यात मला दिसते, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सास्तूर भागातील चिमुकल्या बछड्यांसाठी या अंगणवाड्या उभारून ‘लोकमत’नं आपल्या सामाजिक ऋणातून मुक्त होण्याचा हा छोटासा प्रयत्न केला.
(लेखक लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ आहेत)