लहरी हुकूमशहा किम ट्रम्पना खरंच जुमानेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:54 AM2018-03-12T00:54:22+5:302018-03-12T00:54:22+5:30

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील कमालीच्या ताणलेल्या संबंधांवरून संपूर्ण जगाला घोर चिंता आहे. दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. उत्तर कोरियाने अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम सोडून दिला नाही तर तो देश नष्ट करून टाकण्याची उघड धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देत असतात.

kim jong un-Donald Trump News | लहरी हुकूमशहा किम ट्रम्पना खरंच जुमानेल?

लहरी हुकूमशहा किम ट्रम्पना खरंच जुमानेल?

Next

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील कमालीच्या ताणलेल्या संबंधांवरून संपूर्ण जगाला घोर चिंता आहे. दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. उत्तर कोरियाने अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम सोडून दिला नाही तर तो देश नष्ट करून टाकण्याची उघड धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देत असतात. अमेरिकेच्या तुलनेत उत्तर कोरिया हा अगदीच छोटा देश आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी या धमकीची टर उडविताना म्हटले की, ट्रम्प हे तर एक वृद्ध व सनकी व्यक्ती आहेत! यानंतर ट्रम्प व उन यांच्यात परस्परांना शिव्या देण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. हे वाग््युद्ध सुरू असतानाच किम यांनी एकापाठोपाठ एक अधिक लांब पल्ल्याच्या व अधिक शक्तिशाली क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या केल्या. अमेरिकेच्या मुख्यभूमीवरही क्षेपणास्त्र सोडण्याची आमची क्षमता आहे. त्यामुळे आम्हाला नष्ट करायची धमकी द्याल तर आम्हीही तुमचा नायनाट करू, असे किम यांनी ट्र्म्पना धमकावले. अशा त-हेने युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली.
ही हमरातुमरी सुरू असतानाच एका बातमीने जगाला धक्का बसला. मे महिन्यात ट्रम्प आणि किम यांची भेट होणार असल्याचे दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चुंग याँग यांनी सांगितले. ही भेट कुठे होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. पण किम आपला देश सोडून ट्रम्पना भेटण्यासाठी बाहेर कुठे जाणार नाहीत, हे नक्की. मग ट्रम्प उत्तर कोरियाला जाणार?की दोघांची भेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होणार? या बैठकीबद्दल ट्रम्प यांनीही टिष्ट्वट केले आहे. मात्र किम यांनी काही सकारात्मक पावले उचलली तरच ही बैठक शक्य होईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. थोडक्यात जगाचे लक्ष लागलेल्या या बैठकीविषयी रहस्य कायम आहे.
बरं, ही बैठक होईल हे मान्य केले तरी प्रश्न पडतो की, एकमेकांना बेचिराख करण्याची भाषा करणाºया ट्रम्प व किम यांना भेट घेण्याची गरज का वाटावी? मला वाटते की, सध्या किम व ट्रम्प दोघेही त्रस्त आहेत. देशाच्या पातळीवर ट्रम्प यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. माध्यमांशी त्यांचे संबंध चांगले नाहीत व त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित अनेक अडचणीच्या गोष्टी बाहेर येत आहेत. अमेरिकी माध्यमांना नवा मसाला मिळेल, असे काही तरी हटके करणे ही ट्रम्प यांची गरज आहे. बिल क्लिंटन यांनी राष्ट्राध्यक्ष असताना अशी चलाखी केलेली आहे. व्हाईट हाऊसमधील एक महिला कर्मचारी मोनिका लेविन्स्की यांच्याशी क्लिंटन यांच्या लैंगिक संबंधांची रसभरित चर्चा अमेरिकी माध्यमांमध्ये सुरु असतानाच क्लिंटन यांनी सुदानमधील अल शिफा फार्मास्युटिकल्स कंपनीच्या कारखान्यावर हल्ला करविला. पुढे त्यावरून मोठा वाद झाला व अमेरिकेला त्या कंपनीला मोठी रक्कम भरपाई म्हणून द्यावीही लागली. परंतु त्यावेळी तरी क्लिंटन यांना अडचणीतून बाहेर येण्यास मदत झाली. किम यांच्याशी बैठकीचा विषय समोर आणून ट्रम्प यांनी माध्यमांना चर्वणासाठी नवा मुद्दा दिला आहे. भले त्या बैठकीतून काही फायदा होवो अथवा न होवो!
इकडे किम जाँग उन यांच्यासाठीही परिस्थिती कठीण होत आहे. उत्तर कोरियावर अनेक प्रकारचे निर्बंध लागू आहेत व त्यामुळे तेथील सामान्य जनतेचे जीणे कठीण झाले आहे. चीन व रशिया छुप्या पद्धतीने उत्तर कोरियाला मदत करत असतात, पण त्यावरही संयुक्त राष्ट्र संघाचे बारीक लक्ष आहे. उत्तर कोरियाला प्रतिबंधित माल घेऊन जाणारी अनेक जहाजे अलीकडे पकडण्यात आली. या दोन्ही देशांकडून उत्तर कोरियाला तांत्रिक मदत मिळते, पण निर्बंध अधिक आवळल्यावर अडचणी आणखी वाढत आहेत. त्यामुळे ज्यातून काही काळ या अडचणींतून जराशी सुटका होईल या बहाण्याने किम कदाचित बैठकीची चाल खेळत असावेत. दक्षिण कोरियात आयोजित हिवाळी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची उत्तर कोरियाची घोषणा ही या डावपेंचाची पहिली खेळी होती. जगासमोर उत्तर कोरियाची प्रतिमा बदलावी यासाठी किम यांनी त्या आॅलिम्पिकसाठी अनेक ‘चिअर लीडर्स’ही पाठविल्या होत्या.
अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यात युद्धाला तोंड लागले तर त्याची सर्वाधिक झळ आपल्याला पोहोचेल हे पक्के ओळखून दक्षिण कोरियानेही या दोघांमध्ये समेट व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे. किम यांच्या क्षेपणास्त्रांनी भले अमेरिका बेचिराख झाली नाही तरी वेगाने विकास करणारा दक्षिण कोरिया मात्र नक्की होरपळून निघेल. त्यामुळे काहीही करून युद्धाची ठिणगी पडू नये असे दक्षिण कोरियाचे प्रयत्न आहेत.
अमेरिकेला शह देण्यासाठी चीन उत्तर कोरियाला नेहमी मदत करत असतो यात शंका नाही. दक्षिण कोरियात अमेरिकेचा मोठा लष्करी तळ आहे. त्यामुळे उत्तर कोरियाच्या किम यांना टेकू देणे ही चीनची गरज आहे. जगासमोर चीन दाखवायला उत्तर कोरियाच्या अणुचाचण्या व क्षेपणास्त्र कार्यक्रमाची निंदा करत आहे, पण उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यात जुंपू नये अशीच चीनचीही मनोमन इच्छा आहे. युद्ध झाले तर चीनलाही मोठी किंमत मोजावी लागेल. युद्धामुळे लाखो निर्वासितांचे लोंढे आपल्याकडे येतील व युद्धाच्या भडक्याने आपल्या वाढत्या व्यापारासही खीळ बसेल, अशी चीनला भीती आहे. अशा स्थितीत किम यांना उघड मदत केली तर चीनला अमेरिकेशीही दोन हात करावे लागतील. त्यामुळे किम-ट्रम्प बैठक व्हावी असे चीनलाही वाटते. मात्र हा तिढा कायमचा सुटावा, अशी चीनची मनापासून इच्छाही नाही. किम यांच्या पाठीशी चीन यापुढेही उभा राहीलच. त्यामुळे ट्रम्प व किम यांची भेट झालीच तरी त्यातून फारसे काही निष्पन्न होण्याची सध्या तरी आशा नाही. कोणताही देश एकदा अण्वस्त्रांची शक्ती प्राप्त केल्यानंतर तिचा कधी त्याग करत नाही. आजवरचा अनुभव, इतिहास हेच सांगतो!

हे लिखाण संपविण्यापूर्वी.....
आर्किटेक्ट बालकृष्ण दोशी यांनी भारताची शान वाढविली आहे. त्यांचा प्रित्जकर आर्किटेक्चर पुरस्काराने गौरव होणार असल्याची घोषणा झाली आहे. एक लाख डॉलरचा हा पुरस्कार आर्किटेक्चरच्या क्षेत्रात नोबेलच्या तोडीचा मानला जातो. पुण्यात जन्मलेले दोशी हा पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय आहेत. मे महिन्यांत टोरंटो येथे त्यांचा सन्मान होईल. प्रत्येक भारतीयांसाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. दोशी यांना मनापासून शुभेच्छा.

Web Title: kim jong un-Donald Trump News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.