जगाला वेठीस धरणारा हुकुमशहा किम जोंग उन
By admin | Published: September 14, 2016 05:05 AM2016-09-14T05:05:42+5:302016-09-14T05:05:42+5:30
जग ९/११च्या बॉम्बस्फोटाची पंधरा वर्षे ‘साजरी’ करीत असतानाच उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांनी अणुबॉम्बची पाचवी चाचणी करून नवा धमाका उडवून दिला आहे.
प्रा.दिलीप फडके, (ज्येष्ठ विश्लेषक)
जग ९/११च्या बॉम्बस्फोटाची पंधरा वर्षे ‘साजरी’ करीत असतानाच उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांनी अणुबॉम्बची पाचवी चाचणी करून नवा धमाका उडवून दिला आहे. एका बाजूला या देशाने अणुबॉम्बची चाचणी केली आहे तर दुसऱ्या बाजूला तिथे महापुराचे थैमान सुरु आहे. दीडशेपेक्षा अधिक लोक पुरात वाहून गेले असून तीनशे जण बेपत्ता आहेत तर दीड लाख बेघर झाले आहेत. सहा लाख कोरियन पिण्याच्या पाण्याला वंचित आहेत. कोरियावर निर्बंध असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन त्याला तातडीने मदत केली जाण्याची गरज असल्याचे आवाहन मानवी सहाय्यताविषयक युनोच्या कार्यालयाने केले आहे.
पुरामुळे ग्रासलेल्या जनतेला इतर देशांनी सहाय्य करावे अशी अपेक्षा कोरियन राज्यकर्तेही करीत असल्याचे अॅना फिफिल्ड यांच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील वार्तापत्रात वाचायला मिळते. आम्ही जे पाहिले, त्यावरून संकट अत्यंत भयंकर आणि गुंतागुंतीचे असल्याचे मत रेड क्रॉॅसच्या प्योनग्यांग कार्यालयाचे प्रमुख सिस्टेन यांनी व्यक्त केले आहे. मुळातच त्या देशात गंभीर अन्नटंचाई असून मुलभूत सुविधांचा अभाव आहे. महापुरामुळे संकट अधिकच गंभीर झाले आहे. मुळात गरीबीतील हा देश नैसर्गिक संकटात सापडला असताना शासकीय निधीचा मोठा भाग अण्वस्त्रे आणि शस्त्रसाठ्याच्या हव्यासामुळे जनतेसाठी खर्च होत नसल्याने संकट अधिक भीषण झाल्याचे ‘आॅस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’च्या बातमीत म्हटले आहे. पण किमला त्यामुळे काहीही फरक पडलेला दिसत नाही. पाचव्या चाचणीनंतर आता कोणत्याही क्षणी सहावी चाचणी होऊ शकेल अशा बातम्या येत आहेत.
थेट अमेरिकेवर अण्वस्त्रधारी मिसाईल्सचा हल्ला करण्याच्या तयारीतला पुढचा टप्पा गाठण्याच्या मार्गातला प्रत्येक अणुचाचणी हा एक टप्पा ठरत असल्याचे अॅना फिफिल्ड यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधल्या दुसऱ्या वार्तापत्रात म्हटले आहे. आम्ही आमच्या शत्रूंचा मुकाबला करायला समर्थ आहोत असा दावा किमने केल्याचेही यात वाचायला मिळते.
उत्तर कोरियाने केलेली अण्वस्त्रांची चाचणी मुळीच मान्य करण्यासारखी नाही असे जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी म्हटल्याचे ‘असाही शिम्बून’मधल्या बातमीतून समजते. केवळ नऊ महिन्यांच्या अंतराने उत्तर कोरियाने दोन चाचण्या केल्या असून पाचवी चाचणी आजवरची सर्वात मोठी होती, असे सांगत मोठ्या क्षमतेची अण्वस्त्रे लांब पल्ल्यापर्यंत वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या बॅलेस्टिक मिसाईल्स आता उत्तर कोरियाकडे असल्याने हे जगातल्या सर्वच देशांसाठी एक गंभीर संकट असल्याचेही शिम्बूनने म्हटले आहे. आपला ‘मित्र ’ असणाऱ्या दक्षिण कोरियाला संकटाच्या काळात विश्वास वाटावा म्हणून अमेरिकेने त्या भागात आपल्या हवाई सामर्थ्याचे प्रदर्शन करायला सुरुवात केल्याचे सविस्तर वृत्तदेखील शिम्बूनमध्ये वाचायला मिळते.
दक्षिण कोरियामधून प्रकाशित होणाऱ्या ‘कोरिया टाईम्स’च्या अग्रलेखात या परिस्थितीत उत्तर कोरियाला नियंत्रित करण्यात चीनला महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल असा सूर आहे. आपण या चाचणीचा पूर्णपणाने विरोध करीत असल्याचे चीनने चाचणीनंतर लगेच प्रसिद्ध केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले होते. त्यामुळे चीन आपली जबाबदारी पार पडेल अशी दक्षिण कोरियाची अपेक्षा असल्याचे टाईम्स म्हणतो. उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम आटोक्यात आणण्यासाठी चीन खूप काही करु शकतो, पण तो ते करीत नाही याबद्दलची सविस्तर चर्चा कोरिया टाईम्समधल्या अग्रलेखात वाचायला मिळते. जपान अमेरिका आणि इतर पश्चिमी देशांनी उत्तर कोरियाला नेहमीच खलनायक ठरवले आहे. तथापि चीनचे याबद्दलचे विश्लेषण वेगळे आहे. ‘शांघाय डेली’ या चिनी वृत्तपत्रात त्याचे चित्रण पाहायला मिळते. उत्तर कोरियाच्या अणुचाचणीवर चीनने टीका केली अशा मथळ्याखाली दिलेल्या वृत्तात या अणुचाचणीकडे चीन कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, याची माहिती आपल्याला मिळते. चीनची या संदर्भातली भूमिका म्हणजे परराष्ट्र धोरणात शब्दांची चलाखी कशी केली जाते याचे उत्तम उदाहरण असल्याचे लक्षात येते. वरकरणी उत्तर कोरियाला आपला विरोध असल्याचे भासवत आणि त्याच्या अणुचाचणीला आपण खंबीरपणाने विरोध करतो आहोत असे दाखवतानाच या चाचणीची जबाबदारी चीनने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेवरच ढकलली आहे. उत्तर कोरियापासून रक्षण व्हावे यासाठी अमेरिकेने दक्षिण कोरियाला ‘थाड’चे (टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरीया डिफेन्स) विशेष संरक्षण दिले आहे. पण चीनचा त्याला विरोध असणार हे उघडच आहे. अशा स्थितीत थाड हे चीनसह उत्तर कोरियासारख्या इतर देशांसाठी धोक्याचे असल्याचे सांगत त्यामुळेच स्वसंरक्षणासाठी उत्तर कोरियाला अणुचाचण्या कराव्या लागत असल्याचा सूर चीनने लावला आहे. या संकटाचा सामना करायचा असेल तर दोन्ही कोरिया, चीन, अमेरिका आणि रशिया या सहा देशांनी एकत्र बसून विचारविनिमय करणे आवश्यक असल्याची सूचनादेखील चीनने केली आहे. अमेरिका आणि इतर देशांनी अत्यंत कठोर निर्बंध घालूनदेखील उत्तर कोरियावर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. एकीकडे निर्बंधांचा सामना करीत असतानाच महापुरामुळे गंभीर समस्या उभ्या राहिल्या असल्या तरी त्यांचा विचार न करता सहाव्या चाचणीची तयारी करण्याचा खटाटोप उत्तर कोरिया करतो आहे. आपल्या जनतेच्या समोरच्या गंभीर अडचणींचा विचार करण्यासाठी लागणारे मानसिक संतुलन किम जवळ नाही हेच यातून दिसून येते आहे.