किम जोंगची लहान बहीण जास्त खतरनाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 08:12 IST2025-03-07T08:11:36+5:302025-03-07T08:12:29+5:30
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे एक माथेफिरू, मनाला येईल ते करणारे एक हेकट गृहस्थ आहेत, असं जगभरात मानलं जातं.

किम जोंगची लहान बहीण जास्त खतरनाक
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे एक माथेफिरू, मनाला येईल ते करणारे एक हेकट गृहस्थ आहेत, असं जगभरात मानलं जातं. याचं कारण त्यांनी अनेक वेळा त्याचं प्रत्यंतरही दिलं आहे. आपल्याला जे वाटेल तेच करताना अनेकदा त्यांनी अमेरिकेलाही अंगावर घेतलं आहे आणि त्याला डिवचलं आहे. आपल्यावर त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार त्यांनी तेव्हाही केला नव्हता आणि आता डोनाल्ड ट्रम्पसारखा त्यांच्याइतकाच हट्टी नेता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यावरही त्यांनी त्याचा फारसा विचार केलेला नाही.
एक हेकेखोर व्यक्ती म्हणून आजवर जगभरात किम जोंग उन यांचं नाव घेतलं जात असलं तरी त्यांच्याच घराण्यात त्यांच्याइतकीच आणखी एक खतरनाक व्यक्ती आहे. उत्तर कोरियाच्या राजकारणात आणि देशाच्या संदर्भात कोणतेही निर्णय घेण्यात बऱ्याचदा त्यांचा निर्णय अंतिम असला तरी त्यांचं नाव मात्र माध्यमांमध्ये, जगभरच्या लोकांमध्ये फारसं परिचित नाही. ही व्यक्ती म्हणजेच किम जोंग उन यांची लहान बहीण किम यो जोंग. नुकतीच त्यांनीही अमेरिकेला थेट धमकी दिली आहे.
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातून विस्तवही जात नाही, हे अख्ख्या जगाला माहीत आहे. या दोन्ही सख्ख्या शेजारी देशांची कायम एकमेकांवर मात करण्यासाठी अहमहमिका सुरू असते. आपला कट्टर वैरी, शत्रू म्हणूनच किम भावंडं दक्षिण कोरियाकडे पाहातात. त्यामुळे दक्षिण कोरियाशी कोणताही व्यवहार, कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणाऱ्यांवर त्यांचं बारीक लक्ष असतं. उत्तर कोरियाच्या शाळकरी मुलांनी दक्षिण कोरियन चित्रपट सीडी, डीव्हीडीवर पाहिल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यापासून तर फासावर लटकवण्यापर्यंतचे प्रकार किम यांनी केले आहेत.
दक्षिण कोरियाशी इतकं हाडवैर असताना अमेरिकेनं त्यांना विमानवाहू युद्धनौका दिल्यानं आणि त्यांना लष्करी मदत केल्यानं किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांचा पुरता तीळपापड झाला. ‘अमेरिकेनं असं काही केलं तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत आणि तुम्हाला अद्दल घडवू’ अशी थेट धमकीच किम यो जाेंगनं अमेरिकेला दिली आहे. ‘त्या बोलतात कमी आणि करतात जास्त’, अशी उत्तर कोरियात त्यांची ख्याती आहे. आता तर त्या थेट बोलल्याही आहेत, त्यामुळे त्याचे परिणाम काय होतील, याचा कयास अख्ख्या जगभरात लावला जात आहे. या धमकीनंतर उत्तर कोरिया आता आपल्या शस्त्रास्त्र चाचण्यांना आणखी गती देईल आणि अमेरिकेच्या विरोधात आपली संघर्षाची भूमिका आणखी तेज करेल, असं मानलं जातंय.
या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प काय करतील हादेखील अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. डोनाल्ड ट्रम्प कायम तोऱ्यात असतात, जगाला अद्दल घडवण्याची भाषा बोलत असतात आणि आपल्या विरोधात जाणाऱ्यांच्या विरोधात तर ते सतत आपली तलवार परजत असतात, अशावेळी ट्रम्प यांची उत्तर कोरिया, किम भावंडांसोबतची भूमिका काय असेल याविषयी तर्ककुतर्क लढवले जात आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सामंजस्याची भूमिका घेतली असून, दोन्ही देशांचे संबंध चांगले राहावेत यासाठी किम भावंडांना आपण भेटू असं त्यांनी जाहीर केलं आहे.