राजा उदार झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:01 AM2018-02-20T04:01:45+5:302018-02-20T04:01:49+5:30
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु मराठी अभिजात आणि समृद्ध, पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम अशी भाषा आहे. मराठी ही देशातील मोठ्या समूहाकडून बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु मराठी अभिजात आणि समृद्ध, पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम अशी भाषा आहे. मराठी ही देशातील मोठ्या समूहाकडून बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा असून जगातील असंख्य भाषांमध्ये मराठीचा पंधरावा क्रमांक लागतो. अशा या माय मराठीच्या समृद्धीसाठी शासन ते नागरिक सातत्याने प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नात मराठी साहित्य संमेलनाचेही मोठे योगदान आहे. मराठीचा हा गौरव सोहळा दरवर्षी न चुकता आयोजित केला जातो. परंतु या भव्य आयोजनाला कोटीच्या वर खर्च येतो. शासन मात्र दरवेळी २५ लाखांचे अनुदान देऊन आपली सुटका करून घेत होते. महागाईमुळे संमेलनासाठी २५ लाख पुरत नाहीत. त्यामुळे संमेलनाचे अनुदान वाढविण्यात यावे, असा प्रस्ताव महामंडळाने सरकारकडे पाठवला होता. अखेर सरकारने या प्रस्तावाची दखल घेत मराठीच्या या गौरव सोहळ्यासाठी आपली तिजोरी उघडली असून २५ लाखांचे अनुदान आता दुप्पट म्हणजे ५० लाख इतके केले आहे. शासनाची ही उदारता खरच अभिनंदनीय आहे. शासनाच्या या निर्णयाला आणखी एक महत्त्वाचा कंगोरा आहे. तो म्हणजे, इंग्रजी ही जागतिक पातळीवरची ज्ञानभाषा आहे आणि आता तर ती बाजारपेठेची भाषा झाली आहे. परिणामी इंग्रजीचा वापर प्रचंड वाढला आहे. याचा फटका मराठीला बसत आहे. मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी प्रयत्नशीलता आणि प्रयोगशीलता कमी पडत आहे. मुळात कोणतीही भाषा टिकणे आणि तिचा विकास होणे म्हणजे काय, तर संभाषण, वाचन, लेखन या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही आघाड्यांवर मराठीला अग्रेसर करण्यासाठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. अनेकदा संमेलनाच्या आयोजनावरून आणि अंतर्गत राजकारणावरून टीकाही होत असते. परंतु म्हणून मराठीसाठी हे संमेलन घेत असलेले कष्ट नजरेआड करता येत नाही. साडेपाच दशकांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषेची स्थिती बदलणे शक्य होते, परंतु तेव्हा ते तितक्या क्षमतेने घडले नाही. मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी भाषा याच्या केवळ गप्पाच झाल्या. शासनानेही घोषणा खूप केल्या पण जेव्हा गोष्ट पैशांची आली तेव्हा मात्र बहाणे शोधले. पण, साहित्य संमेलनाने मराठीची पताका कायम फडकत ठेवली. कधी झुणका-भाकर खाऊन तर कधी फाटक्या चादरी पांघरून सारस्वतांनी मराठीचा भविष्यातील प्रवास समृद्ध कसा होईल, यासाठी अखंड खस्ता खाल्ल्या. उशिरा का होईला शासनाला याची जाणीव झाली आणि शासनाने संमेलनाचे अनुदान दुप्पट केले. त्यासाठी शासनाचे मनस्वी अभिनंदन...