किंग चार्ल्स द थर्ड : या राजाच्या जीवनाची आगळी कहाणी आहे खरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 06:17 AM2023-05-06T06:17:58+5:302023-05-06T06:18:32+5:30

ब्रिटनचे राजे तिसरे चार्ल्स यांचा आज राज्याभिषेक सोहळा. तब्बल ६४ वर्षे सिंहासनाची प्रतीक्षा केलेल्या या राजाच्या विलक्षण आयुष्याची ही कहाणी!

King Charles the Third: The story of this king's life is true! | किंग चार्ल्स द थर्ड : या राजाच्या जीवनाची आगळी कहाणी आहे खरी!

किंग चार्ल्स द थर्ड : या राजाच्या जीवनाची आगळी कहाणी आहे खरी!

googlenewsNext

 निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार

चार्ल्स जन्मले तेव्हा त्यांची आई एक युवराज्ञी होती. चार्ल्स चार वर्षांचे झाले तेव्हा त्यांची आई राणी झाली. चार्ल्स दहा वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या आईनं, राणी दुसरी एलिझाबेथनं त्यांना प्रिन्स हा किताब दिला. मग प्रिन्स चार्ल्स ब्रिटनच्या राजेपदाच्या रांगेत उभे राहिले. आईच्या मृत्यूनंतर तब्बल ६४ वर्षांनी ते राजे झाले. आज त्यांचा अधिकृत राज्यारोहण सोहळा लंडनमध्ये संपन्न होत आहे. ‘आपण नेमके कोण आहोत आणि आपले  काम काय आहे?’ याचा शोध घेण्यात या माणसाने गेली तब्बल ६४ वर्षे घालवली आहेत. जेमतेम उभे राहाता यायला लागले  तेव्हापासून राणी वगळता आजूबाजूची सर्व माणसे त्यांच्यासमोर गुडघ्यात वाकत आणि  त्यांना सर म्हणत. तुम्ही भावी राजे आहात, ब्रिटिश साम्राज्याचे रक्षणकर्ते आहात, हे त्यांना सतत सांगितले गेले आणि त्यांना ते ऐकून राजघराण्याच्या सोनेरी चौकटीत आपले आयुष्य ‘बसवावे’ लागले.

आता तरुण पिढीतल्या एक तृतीयांश ब्रिटिश नागरिकांना तर राजेशाहीच नकोय आणि किमान चाळीसेक टक्के वयस्क नागरिकांना हे ‘चार्ल्स’ आवडत नाहीत! अशा प्रजाजनांचा राजा म्हणून आज त्यांचा राज्याभिषेक होईल. राजा या संस्थेचा इतिहास सांगतो की, मुकुट डोक्यावर घेण्याआधीचा राजपुत्र एक वेगळा माणूस असतो, मुकुट डोक्यावर घेतलेला राजा एक वेगळाच माणूस असतो. राजमुकुट माणसाला पार बदलून टाकतो. तरुण वयातले  प्रिन्स  चार्ल्स कसे होते? - ते  राजवाड्यातल्या गुदमरल्या वैभवात फारसे रमले नाहीत. त्यांना सतत इंग्लंमधल्या निसर्गरम्य खेड्यात जावेसे वाटे. लंडनमधल्या उंच इमारती अजिबात आवडत नसत, ‘तीस मजल्याइतक्या उंच इमारती मुळात बांधताच का,’ असे त्यांनी एकदा रागाने आर्किटेक्ट्सना विचारले होते. आधुनिक इमारतींचा त्यांना अतीव तिटकारा.

प्रिन्स  चार्ल्स यांनी एकदा डॉक्टरांच्या परिषदेचे उद्घाटन केले. ते म्हणाले, ‘आधुनिक वैद्यकीय व्यवस्था म्हणजे पिसाचा झुकलेला मनोरा आहे, त्याचा तोल गेलाय!’ आधुनिक वैद्यकशास्त्रापेक्षा होमिओपॅथीवर त्यांचा फार विश्वास. शेक्सपियर जवळजवळ तोंडपाठ. आयुष्यात कठीण प्रसंग आले की शेक्सपियरची साक्ष काढावी आणि त्याची पात्रे सांगतात त्यानुसार वागावे, अशी त्यांची धारणा! या माणसाला ऑर्गन फार आवडते. विज्ञान आणि तंत्रज्ञानामागोमाग उद्योगांचा उदय झाला त्या आधीचा काळ चार्ल्स यांना फार प्रिय आहे. जैविक शेती हवी, रासायनिक खते आणि जंतुनाशकांना शेतीत मज्जाव असला पाहिजे, असाही त्यांचा हट्ट आहे. पेट्रोल हा आधुनिक जगाच्या नशिबी आलेला शाप आहे, असे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे.

आधुनिक औषधांकडे ते संशयाने पाहतात. मार्केटवाल्यांनी अनेक गोष्टीचे  विकाऊ वस्तूत रूपांतर केल्याचा चार्ल्स यांना कमालीचा राग आहे. चार्ल्सनी पेट्रोल आणि पेट्रोलजन्य वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या कंपन्यांतले आपले शेअर काढून घेतले, ही  बातमी फार गाजली होती. लंडनच्या पुनर्विकासाच्या एका प्रकल्पाच्या संदर्भात चार्ल्स यांनी खरमरीत पात्र लिहून संबंधित मंत्र्याची हजेरी घेतली होती. ‘मोठमोठ्या कुरूप इमारती बांधून हे शहर मी तुम्हाला बेचिराख करू देणार नाही,’ असा दमही भरला होता. चार्ल्स स्वत: ॲस्टन मार्टिन ही गाडी चालवतात. आपली ही गाडी वाइनवर चालली पाहिजे. चीज तयार करताना उरणारा द्रव (व्हे) पेट्रोलऐवजी इंधन म्हणून वापरले पाहिजे, असे त्यांचे स्वप्न त्यांनी संशोधकांसमोर बोलून दाखवले होते.  शिक्षण, पर्यावरण, वास्तुकला, ऊर्जा या खात्यांच्या मंत्र्यांना चार्ल्सनी आजवर असंख्य पत्रे लिहिली आहेत. राजघराण्याच्या लेटरहेडवर स्वत:च्या लफ्फेदार हस्ताक्षरात भरपूर उद्गारचिन्हे असलेली ही पत्रे ते लिहितात. टायपिंगवर त्यांचा राग आहे. 

ब्रिटीश परंपरेनुसार पंतप्रधान आठवड्यातून एकदा राजाला भेटतात. राज्यव्यवस्थेबद्दलची माहिती, आपली मते आणि भावना राजा पंतप्रधानाला सांगतो, एवढेच! त्यानंतर सरकारच्या सर्व निर्णयांवर राजा होकाराचे शिक्के मारत असतो. चार्ल्सनी मात्र सिंहासनावर बसण्याआधीच अनेकदा अनेक मंत्रालयांना सळो की पळो करून सोडलेले आहे. प्रिन्स चार्ल्स यांचे व्यक्तिगत जीवन एकाचवेळी रोमांचक आणि अनेक वादळांनी घेरलेले होते. ऐन तारुण्यात कॅमिला शांड यांच्याबरोबरची त्यांची मैत्री, ती राजघराण्याला पसंत नसल्याने त्यांनी जवळपास मनाविरुद्ध प्रिन्सेस डायनाशी केलेला, परिकथेतच शोभावा असा विवाह, नंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात आलेली वादळे आणि पुन्हा विवाहित कॅमिला पार्कर बोल्स यांच्याशी सुरू झालेले संबंध, त्यातून झालेले व्यभिचाराचे आरोप, लैंगिक क्रियांची वर्णने असलेले अत्यंत खासगी संभाषण जाहीर झाल्याने पदरी आलेली कुचेष्टा, घटस्फोटानंतर प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू आणि त्यानंतर एका साध्या समारंभात प्रिन्स चार्ल्स यांनी कॅमिलाशी बांधलेली लग्नगाठ... असा खूप मोठा व्यक्तिगत प्रवास करून हा माणूस आता आयुष्याच्या संध्याकाळी सिंहासनावर विराजमान होतो आहे. ते होत असताना धाकटा मुलगा आणि सुनेने (प्रिन्स हॅरी व मेगन) दिलेला मनस्ताप सोबत आहेच. एका बाजूला जन्माने लाभलेल्या राजेशाही जीवनाने केलेली सोनेरी कोंडी आणि दुसरीकडे दैवाने टाकलेले चित्रविचित्र फासे, अशी या राजाच्या जीवनाची आगळी कहाणी आहे खरी! 

    damlenilkanth@gmail.com

Web Title: King Charles the Third: The story of this king's life is true!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.