प्रचंड क्षमतेचा जाणता राजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 04:06 AM2020-12-12T04:06:38+5:302020-12-12T04:07:10+5:30
Sharad Pawar Birthday : सन १९८० मध्ये माझी शरदराव पवार यांच्याशी प्रथम भेट झाली. त्यानंतर मी सामुहिक विवाहाची चळवळ सुरु करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची पदयात्रा केली.
- शांतीलाल मुथा
(अध्यक्ष, भारतीय जैन संघटना)
सन १९८० मध्ये माझी शरदराव पवार यांच्याशी प्रथम भेट झाली. त्यानंतर मी सामुहिक विवाहाची चळवळ सुरु करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची पदयात्रा केली. पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ७ जानेवारी १९८८ रोजी ६२५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते आवर्जून उपस्थित होते. या चळवळी विषयी त्यांच्याशी बोलत असताना ते चळवळीची कार्यपध्दती समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. याचे मला आश्चर्य वाटत राहीले.
१९९३ साली लातूर भूकंपात मी दहा हजार लोकांना दररोज जेवण पुरविण्याचे काम करीत होतो. त्यावेळी त्यांचे व्यवस्थापन कौशल्य जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकला होता. सवयंसेवी संस्थांना गावांचे वाटप करून काम करण्याबाबत ते मार्गदर्शन करीत. भूकंपात अनेक लहानग्यांचे आई-वडील मृत पावले होते. काही बेघर झाले. अशा मुलांच्या मानसिकतेवर भूकंपाचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पवार साहेबांच्या कानावर घातले. तसेच भूकंपग्रस्त १२०० मुलांना पदवी पर्यंत शिक्षण देण्यासाठी पुण्यात आणण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावास नोकरशहांकडून कडाडून विरोध झाला. असे असतानाही पवार साहेबांनी या प्रस्तावास मान्यता दिली. इतक्यावरच न थांबता पिंपरी चिंचवड महानगपालिकेची एक नवी इमारत त्यांनी भाडेतत्वावर उपलब्ध करून दिली. या मुलांना भेटण्यासाठी पवार साहेबांनी अनेकदा या प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पातील सर्व मुलांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आम्ही पूर्ण करू शकलो याचा मला आणि पवार साहेबांना मनस्वी आनंद आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून माझे आणि पवार साहेबांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी माझे काम समजावून घेत त्यात सहभाग नोंदविला आहे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास असणारा, विविध विषयांची माहिती ठेवणारा, विषय समजून घेणारा, त्यावर उपाय योजना करणारा हा देशाचा जाणता राजा आहे. अशा प्रचंड ताकदीचा आणि क्षमतेचा नेता आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावामध्ये आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.