Kiranotsav: अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळ्यांची शर्यत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 06:02 AM2023-02-02T06:02:49+5:302023-02-02T06:04:44+5:30

Kiranotsav: कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात होणारा किरणोत्सव अतिशय प्रसिद्ध आहे; पण सूर्यकिरणांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होत नाहीत..

Kiranotsav: Obstacle Race at Ambabai's Kironotsav... | Kiranotsav: अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळ्यांची शर्यत...

Kiranotsav: अंबाबाईच्या किरणोत्सवातील अडथळ्यांची शर्यत...

Next

- ॲड. प्रसन्न मालेकर
(मंदिर व मूर्ती अभ्यासक)
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरात वर्षभर अनेक उत्सव संपन्न होत असतात, पण या सर्व उत्सवात अनोखा उत्सव म्हणजे किरणोत्सव. आताही कोल्हापुरात हा किरणोत्सव सुरू आहे. देवीचा नित्य भक्त असो वा कधीतरी दर्शनाला येणारा परगावचा भाविक, या दोघांनाही सारखीच उत्सुकता असते ती किरणोत्सवाची. किरणोत्सव म्हणजे सूर्याची मावळती किरणे महाद्वार मार्गाने थेट गाभाऱ्यापर्यंत पोहोचतात आणि त्या सोनेरी प्रकाशात देवीची मूर्ती उजळून निघते.

सूर्याची मावळती किरणं साक्षात जगदंबेच्या विग्रहाला सोनसळी अभिषेक घालून नटवतात ते हे दिवस. उत्तरायणात ३१ जानेवारी, १, २ फेब्रुवारी तर दक्षिणायनात ९, १०, ११ नोव्हेंबर हे किरणोत्सवाचे पारंपरिक दिवस. पहिल्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीला चरणस्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत येतात आणि तिसऱ्या दिवशी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सवाचा सोहळा पूर्ण होतो. हा साेहळा अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक कोल्हापुरात येतात.  

या ऐतिहासिक ठेव्याबद्दल कोल्हापूर महापालिका प्रशासनात असलेल्या उदासीनतेमुळे किरणोत्सव मार्गांमध्ये इमारतींचे बांधकाम वाढू लागले होते. काही वेळा पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होतो आणि काही वेळा होत नाही, यामागचे कारण शोधण्याच्या उद्देशाने या उत्सवाच्या तारखांचा अभ्यास करण्यासाठी देवस्थान समितीने २००८-०९ साली केआयटीचे प्रा. किशोर हिरासकर यांची नियुक्ती केली होती. हिरासकर यांनी सलग चार-पाच वर्षे सखोल अभ्यास करून किरणोत्सवात अडथळा ठरत असलेल्या इमारतींच्या तेवढ्या भागांवर मार्किंग केले. त्यावेळी गदारोळ उठला, इमारत मालकांनी विरोध केला, शेवटी त्यांना नुकसान भरपाई द्यायचे ठरले, पण त्यावर्षी थोडे अडथळे काढल्यावर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला आणि अडथळ्यांवरची चर्चा थांबली. 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या २०१८ सालच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन महापालिकेला बरेच अडथळे काढायला लावले. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. गेल्या तीन-चार वर्षात पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला,  पण तात्पुरत्या उपायांच्या मलमपट्टीची मर्यादा संपली की मार्किंग झालेल्या इमारतींच्या अडथळ्यांकडेच येऊन हा प्रश्न थांबतो.

दरवर्षी किरणोत्सव जवळ आला की आधी पंधरा दिवस अडथळ्यांची चर्चा सुरू होते. देवस्थान समिती महापालिकेला स्मरणपत्र पाठवते, महापालिकेचा एखादा अधिकारी अडथळे बघून जातो. तोपर्यंत किरणोत्सव सुरू होतो आणि संपतोदेखील. अडथळे ‘जैसे थे’ असतात आणि चर्चाही थांबते, ती पुढच्या किरणोत्सवापर्यंत. अंबाबाई आणि सूर्यकिरणे यांच्यात अजूनही पाच इमारतींचा अडथळा आहे. या इमारतींचा मार्किंग केलेला भाग काढला की अडथळे दूर होतील. त्यासाठी देवस्थान समितीने मिळकतधारकांना नुकसानभरपाई देण्याचीही तयारी दाखवली आहे, पण महापालिकेकडून कार्यवाही होत नाही. किरणांचा मंदिर प्रवेशाचा रंकाळ्यापर्यंतचा मार्ग ‘किरणोत्सव झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे, पण अजून त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

अंबाबाईचा किरणोत्सव हा एकमेव असा निसर्गोत्सव आहे, ज्यात मानवाची काही भूमिका असत नाही. म्हणूनच इमारतींमुळे झालेला हस्तक्षेप किरणोत्सवातला मोठा अडथळा ठरला आहे. हा सोहळा आहे फक्त अंबाबाईचा आणि सूर्याचा. मावळतीच्या किरणांची तीव्रता आधीच कमी झालेली असते. त्यात अनेकदा ढगाळ वातावरण, दाट धुके, धुलीकण यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता मंदिरात पोहोचेपर्यंत कमी होते. त्यामुळेदेखील किरणोत्सव होत नाही. सध्या सुरू असलेल्या किरणोत्सवाच्या अधिकृत तारखांच्या आधी दोन दिवस सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली होती. महत्त्वाच्या दोन दिवसात मात्र सूर्यकिरणे गरुड मंडपाच्या पुढेही सरकली नाहीत..

 

Web Title: Kiranotsav: Obstacle Race at Ambabai's Kironotsav...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.