सातपुड्यातील किसन
By admin | Published: May 14, 2015 11:33 PM2015-05-14T23:33:52+5:302015-05-14T23:33:52+5:30
सातपुड्यातील अतिदुर्गम अशा बर्डीपाडा या छोट्या पाड्यातील किसन तडवी या तरुणाने दोहा (कतार) येथे झालेल्या पहिल्या आशियाई युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार
मिलिंंद कुलकर्णी -
सातपुड्यातील अतिदुर्गम अशा बर्डीपाडा या छोट्या पाड्यातील किसन तडवी या तरुणाने दोहा (कतार) येथे झालेल्या पहिल्या आशियाई युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. किसनच्या या देदीप्यमान कामगिरीने बर्डीपाडा अचानक प्रकाशात आले. अक्कलकुवा तालुक्यात अनेक पाड्यांचे एकत्रित असे हे बर्डीपाडा. एकूण लोकसंख्या एक हजार. किसनचे वडील नरसी रेड्या तडवी आणि आई गेनाबाई तडवी हे दोघे अशिक्षित. इतर आदिवासी कुटुंबांसारखी जेमतेम आर्थिक स्थिती. किसनने गावातल्याच शासकीय आश्रमशाळेत शिक्षणाला सुरुवात केली. घरच्या शेळ्यांना चरण्यासाठी जंगलात घेऊन जातानाच ‘धावण्या’ची कला विकसित होत गेली. मोठा भाऊ फुलसिंग हा शिकून ग्रामविकास अधिकारी झाला. त्याला किसनमधील क्रीडानैपुण्य लक्षात आले. किसनची आवड आणि गती लक्षात घेऊन त्याला प्रशिक्षण द्यायचा निर्धार फुलसिंगने घेतला. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. हरियाणातील प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी किसनचे गुण हेरले आणि त्याला शास्त्रोक्त प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. भाऊ फुलसिंग आणि प्रशिक्षक विजेंदर सिंग यांचा विश्वास किसनने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून सार्थ ठरविला. कोलंबिया येथे होणाऱ्या विश्व युवा अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात आता किसनची निवड निश्चित मानली जात आहे. किसन तडवीची ही यशोगाथा निश्चितच प्रेरक आहे. किसनसारखेच अनेक उदयोन्मुख खेळाडू सातपुड्यात योग्य संधीची वाट पाहत आहेत. त्यांना कुणी फुलसिंग आणि विजेंदर सिंग भेटतील काय, हा प्रश्न आहे. किसनच्या निमित्ताने खान्देशातील आदिवासी तरुणांच्या शिक्षण आणि क्रीडानैपुण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. सातपुड्याच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या काटक आणि चपळ आदिवासी तरुणांना प्रशिक्षणाच्या घोषणा अनेकदा झाल्या. पण त्या कागदावरच राहिल्या.
खान्देशातील ११ तालुके आदिवासीबहुल आहेत. आदिवासी विकास व क्रीडामंत्रिपद नंदुरबार जिल्ह्याकडे अनेक वर्षे होते. तरी एखादा किसन प्रकाशझोतात येतो आणि उर्वरित अंधारात चाचपडत राहतात, हे कशाचे द्योतक आहे?
क्रीडा संकुलांचे भिजत घोंगडे
तालुकानिहाय क्रीडा संकुलाची घोषणा तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने केली होती. परंतु खान्देशातील कोणत्याही तालुक्यात क्रीडा संकुल पूर्ण झालेले नाही. कोठे जागेचा प्रश्न आहे, कोठे जागा आहे तर ठेकेदार मिळत नाही, ठेकेदार मिळाला तर निधीची अडचण अशा एक ना अनेक प्रश्नांनी क्रीडा संकुलांचे भिजत घोंगडे कायम आहे. क्रिकेटसारख्या खेळांना सगळ्यांकडून अवास्तव प्रोत्साहन मिळत असताना भारतीय क्रीडा प्रकारांकडे दुर्लक्ष होत आहे. आॅलिम्पिक, आशियाई स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर या विषयावर चर्चा झडतात आणि नंतर पुन्हा हा विषय थंडबस्त्यात पडतो.
जिल्हा बँकांचे कल
खान्देशातील नंदुरबार-धुळे व जळगाव जिल्हा बँकांच्या निवडणुकांचे कल खान्देशातील भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारे आहेत. लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सहकार क्षेत्रातील निवडणुका झाल्या. त्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व होते. धुळे-नंदुरबार जिल्हा बँक गैरव्यवहाराच्या आरोपावरून तीन वर्षांपूर्वी बरखास्त करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पॅनलने पुन्हा ही बँक ताब्यात घेण्यासाठी एकसंधपणे प्रयत्न केले. भाजपाने प्रथमच स्वतंत्र पॅनल उभे करण्याचे धाडस केले. पण भाजपाच्या काही लोकप्रतिनिधींनी असहकार्याचे धोरण अवलंबल्याने दारुण पराभव झाला. याउलट जळगावात खडसे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील दुहीचा लाभ उठवत प्रथमच एकहाती सत्ता मिळवली. पाच वर्षांपूर्वी भाजपाचे केवळ दोन संचालक होते. यंदा भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळविले. अर्थात काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेची गरजेपुरती घेतलेली साथ लाभदायक ठरली.