पतंगबाजी अन् ओऽऽऽ काट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:49 AM2018-06-02T05:49:58+5:302018-06-02T05:49:58+5:30
रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होता आणि इकडे पोटनिवडणुकांत भाजपाचे पानीपत होत असताना मोदीसाहेब इंडोनेशियात पतंग उडवित होते.
रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होता आणि इकडे पोटनिवडणुकांत भाजपाचे पानीपत होत असताना मोदीसाहेब इंडोनेशियात पतंग उडवित होते. मोदीजी तसे मोठे पतंगबाज. गेल्या चार वर्षांत त्यांनी आपल्या सर्व विरोधकांची ‘ओ ऽऽऽ काट’ करून २१ राज्यात सत्ता स्थापन केली. त्यांची ही कीर्ती निश्चितच सातासमुद्रापलीकडे गेली. तशी ती इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्या कानावरही आली. मोदीजी त्या देशाचा दौरा करणारच होते. मग जोकोंनी त्यांना फोन लावला....
जोको : भाईजी... आपण येत आहात ना...?
भाईजी (अर्थात मोदीजी) : हे काय विचारणे झाले! निघतोच आहे मी...!
जोको : मी ऐकलेयं... तुम्ही मोठे पतंगबाज आहात. विरोधी पक्षांच्या पतंगा कापण्यात एक्स्पर्ट आहात!
भाईजी : यु आर राईट...! पण माझ्या दौऱ्याचा आणि पतंगाचा संबंध काय?
जोको : नाही म्हणजे...आमच्या येथे पतंग महोत्सव आहे. योगायोगाने तुमच्यासारखा एक महान पतंगबाज येतो आहे. म्हटले मज्जा येईल.
भाईजी : अस्स् होय...! मग मी अमितभार्इंनाही घेऊन येतो...
जोको : अमितभाई...! तेही एक्स्पर्ट आहेत यातले?
भाईजी : बिल्कुल...! मीच शिकवलं त्यांना. (मग...‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’च्या थाटात भाईजी म्हणाले, माझ्या हाती पतंगाची दोरी आणि अमितजीच्या हाती चक्री. मग ही जोडी भाजपाला उद्धारी’). जोकोंना हा जोक वाटला पण त्यांना तो समजला नाही.
एव्हाना भाईजींचीच कळी खुलली होती. आपले पतंगशास्त्रातील बारकावे ते जोकोंना समजावून सांगू लागले.
भाईजी : त्याचे काय आहे, जोकोजी...! पतंगाचा पेच टाकल्यावर लोक साधारणत: ढील देतात. पण माझी खासियत आहे... मी कधीच ढील देत नाही.... नेहमीच ताणून धरतो. आणि अमितजी तर लपेटण्यात तरबेज आहेत. अशी काही चक्री फिरवतात की, समोरचा चक्रावून जातो. गोवा, मेघालय, मणिपूरचेच उदाहरण घ्या...तेथे आमची ‘कटली’ होती पण या अमितभार्इंनी बरोबर पेच लढवला. म्हणून म्हणतो, आम्ही दोघे मैदानात असलो की बाकी सर्व ‘ओऽऽऽकाट’
जोको : ऽऽऽअरेऽऽऽ बापरे...! मग अमितभार्इंचे राहूच द्या...! आम्हाला इथं काटा-काटी करायची नाही.
आणि हो...येताना काही ‘मेड इंडिया’ पतंगा आणि मांजा घेऊन या!
भाईजी : पतंग ठीक आहे, पण मांजा ‘मेड इन चायना’ आणला तर चालेल ना!
जोको : (आश्चर्याने) तुमच्याकडे तर चिनी मांज्यावर बंदी आहे! आणि तसंही चीनशी तुमचं वाकडं आहे. मग या चिनी मालाचं तुम्हीच मार्केटिंग कसं करता?
भाईजी : जोकोभाई तस वाकडं तर बºयाच जणांशी आहे. पण बोलाव लागतं तसे. केलंच पाहिजे असे थोडेच आहे. आता आम्ही पाकिस्तानशी ‘टक्कर’ घेण्याची भाषा करतो आणि ‘शक्कर’ मात्र आणतो त्यांचीच. ग्लोबल डिप्लोमसी म्हणतात याला.
बरं जाऊ द्या! चिनी मांज्या तर तुमच्याकडेही मिळेल. मी आपला पतंग घेऊन येतो.
पोटनिवडणुकीत विरोधकांच्या पतंगा कशा काटतो याचे प्रात्याक्षिक जोकोंना दाखविण्यासाठी भार्इंनी मग १५ पतंगा जाताना सोबत घेतल्या. यातल्या चार थोड्या मोठ्या (बहुतेक लोकसभेच्या) आणि ११ लहान (अर्थात विधानसभेच्या) असाव्यात. आता, इंडोनेशियात प्रात्याक्षिकांत काय झाले ते माहीत नाही पण येताना भाईजींजवळ केवळ दोनच पतंग उरल्या होत्या. बाकी १३ ओऽऽऽकाट...!
- दिलीप तिखिले