किवींनी विराट सेनेला आणले जमिनीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 04:21 AM2020-03-05T04:21:31+5:302020-03-05T04:21:40+5:30

टी२० मालिकेचा अपवाद वगळता भारताला तीन एकदिवसीय व दोन कसोटी सामन्यांची मालिका गमवावी लागली.

Kiwis bring huge army to the ground! | किवींनी विराट सेनेला आणले जमिनीवर!

किवींनी विराट सेनेला आणले जमिनीवर!

Next

- रोहित नाईक
भारतीय क्रिकेट संघासाठी न्यूझीलंड दौरा तसा निराशाजनकच ठरला. प्रत्येक दौऱ्यातून काय मिळाले किंवा किती यश मिळाले याचे मूल्यमापन क्रीडारसिक करीत असतोच. भारतीय संघासाठी हा दौरा केवळ २० टक्के फलदायी ठरला असेच म्हणावे लागेल. टी२० मालिकेचा अपवाद वगळता भारताला तीन एकदिवसीय व दोन कसोटी सामन्यांची मालिका गमवावी लागली.
भारतात क्रिकेटपटू सुपरस्टार किंवा सुपरहिरोपेक्षा कमी नसतात. क्रिकेटविश्वात सर्वाधिक ग्लॅमर लाभले ते भारतीय खेळाडूंनाच. त्यात कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कसोटीत नंबर वन. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेली ही ‘विराटसेना’ न्यूझीलंडला त्यांच्याच देशात लोळवेल अशी खात्री अनेकांना होती. याआधी भारताने आॅस्टेÑलियाला आॅस्टेÑलियामध्ये लोळविण्याचा पराक्रम केलेला असल्याने न्यूझीलंडलाही काहीसा घाम फुटलाच होता. ‘एक कसोटी गमावल्यानंतर इतकी टीका करण्याचे कारण नाही. सलग ७ सामने जिंकल्यानंतर आम्ही पहिला पराभव पत्करला असल्याने सर्वकाही संपलेले नसून आम्ही पुनरागमन करु.’ ही प्रतिक्रिया होती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची. यामुळे भारतीय चाहत्यांना विश्वास होता की, नक्कीच विराट सेना आता मुसंडी मारेल. पण झाले भलतेच.
या वर्चस्वाची नांदी सुरु झाली ती पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतून. सलग पाच सामने जिंकून भारताने यजमानांना व्हाइटवॉश देत एकदिवसीय व कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी धोक्याचा इशाराच दिला. आता येथे आपलेच राज्य, अशा गर्वामध्ये राहिलेल्या भारताला पहिला धक्का बसला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आणि त्यानंतर खणखणीत चपराक बसली ती कसोटी सामन्यांच्या मालिकेत.
बरं, या पराभवातून भारतीय खेळाडू काय आणि किती शिकले हादेखील प्रश्नच आहे. प्रत्येक सामना गमावल्यानंतर, आम्ही नियोजनात कमी पडलो, फलंदाजांकडून चुका झाल्या, क्षेत्ररक्षण खराब झाले, आम्ही नक्कीच पुनरागमन करू अशा प्रतिक्रिया खेळाडूंनी दिल्या. पण झाले काय? भारतामध्ये क्रिकेटपटू अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचतात. मात्र हे शिखर कायम टिकवणे अत्यंत आव्हानात्मक असते. भारतीय क्रिकेटपटू सातत्याने विविध मालिका खेळत आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अतिक्रिकेटचा मुद्दा समोर आला आणि त्यातूनच प्रमुख खेळाडूंवरील ‘वर्कलोड’चा अभ्यास झाला. काही मालिकांमध्ये प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत युवांना संधीही मिळाली. पण, शारीरिक किंवा मानसिक ताण घालविण्यासाठी या विश्रांतीचा कितपत फायदा प्रमुख खेळाडूंनी केला असेल? कारण, कमर्शियलदृष्ट्याही भारतीय क्रिकेटपटू व्यस्त असतात. अनेक ब्रँड्सचे इव्हेंट, जाहिरात शूटमध्ये व्यस्त राहिल्याने फार विश्रांती मिळत नसावी. शेवटी आर्थिक गणितापुढे सारेच दबकून राहतात हेच सिद्ध होते.


क्रिकेटपटूंनी आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजेत. अर्थात मान्य आहे, की प्रत्येक सामना जिंकणे कठीण असते. पराभवातही झुंजार खेळ व्हावा हीच अपेक्षा चाहत्यांची असते आणि कसोटी मालिकेत हाच झुंजार खेळ दिसून आला नाही. भारतीय क्रिकेटमध्ये ‘आयपीएल’ महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. या लीगमुळे क्रिकेटविश्वाचा इतिहासच बदलला. या लीगमधून जितकी नवी गुणवत्ता मिळाली, तितकाच काहीसा फटकाही बसला, हे मान्य करावे लागेल.
आज भारतीय क्रिकेटपटूंमधील संयम कमी होत असल्याचे दिसून आले. भारतीय खेळाडू टी२०कडे आकर्षित होत आहे. खेळपट्टीवर जितका वेळ घालवाल, तितक्या अधिक धावा मिळतील, हा मंत्र आजचे खेळाडू विसरले असल्याचे वाटते. हीच बाब न्यूझीलंड दौºयातील कसोटी मालिकेत दिसून आली. विराट कोहलीसारख्या प्रत्येक प्रकारात खोºयाने धावा काढणारा फलंदाजही सपशेल अपयशी ठरल्याचे मोठे दु:ख चाहत्यांना झाले.

न्यूझीलंड दौºयातील निराशाजनक कामगिरी विसरून भारतीय संघ आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरा जाईल. घरच्या मैदानावर पुन्हा एकदा भारताला संभाव्य विजेते मानले जात आहे. मात्र जर हीच ढिलाई पुन्हा दाखवली, तर पदरी निराशा पडण्याची शक्यताही आहे. याच वर्षी रंगणाºया टी२० विश्वचषक स्पर्धेसाठीही भारताला सज्ज व्हायचे आहे. वेळीच भारतीय संघाने धडा घेणे आवश्यक आहे. अतिक्रिकेट, कमर्शियलायझेशन, आयपीएल, शारीरिक-मानसिक तंदुरुस्ती या सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ भारतीय क्रिकेटपटूंना साधावाच लागेल. तर आणि तरंच त्यांना लोकप्रियतेचे शिखर कायम राखता येईल. शेवटी आपला संघ, जगात अव्वल संघ आहे, हे विराट सेनेने विसरता कामा नये.
(वरिष्ठ उपसंपादक)

Web Title: Kiwis bring huge army to the ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.