सरसकट प्रवास नाही, पण खिसा मात्र गारेगार होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 07:03 AM2022-05-02T07:03:53+5:302022-05-02T07:06:07+5:30
लोकल प्रवासातील आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या एसी लोकलचे प्रवासी वाढावेत, म्हणून रेल्वेने त्याच्या तिकिटांच्या दरात कपात केली. काय आहेत त्याची कारणे...?
मिलिंद बेल्हे,
सहयोगी संपादक, मुंबई
लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करत आणि नंतर ठाणे स्टेशनवर गरमागरम वडापाव खात अडीच महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी मुंबईतील उपनगरी वाहतूक समजून घेतली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या बौद्धिकात त्यांनी एसी लोकलचे भाडे कमी केले जाईल; पण त्याचे श्रेय घ्यायला विसरू नका, असा सल्ला दिल्याने अधिकाधिक मुंबईकर प्रवाशांना गारेगार प्रवासाची संधी मिळणार, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. पण आर्थिक वर्ष संपत आल्याने भाडेकपातीची खोळंबलेली घोषणा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तीन दिवसांपूर्वी केली. रेल्वेचे अधिकारी जरी ५० टक्के भाडेकपात केल्याचे सांगत असले, तरी एसी लोकलचे भाडे सरसकट कमी झालेले नाही. फक्त ज्यांना आयत्यावेळी तिकीट काढून प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी साधारण ५० टक्के भाडेकपातीचा दिलासा रेल्वेने दिला आहे.
पण एसीच्या मासिक पासच्या दरात कपात झालेली नाही. त्यामुळे प्रथम वर्गाच्या (फर्स्ट क्लास) प्रवाशांना एसी लोकलकडे वळवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे, असेही दिसलेले नाही. फर्स्ट क्लासच्या तिकीट दरातही लवकरच कपात होईल, असे मधाचे बोट यावेळी लावले गेले, पण ही दरकपात किती असेल, ते गुलदस्त्यात आहे. त्यामुळे सध्या ज्याप्रमाणे फलाटावर गर्दी आणि समोरून रिकाम्या धावणाऱ्या एसी लोकल असे जे चित्र दिसते, तेच आणखी काही काळ कायम राहण्याची चिन्हे आहेत. दररोजच्या ७५ लाख मुंबईकरांसाठी सध्याचा आहे तोच लोकल प्रवास सुखकर होण्याची गरज आहे. त्यासाठीचे घोडे अडतेय, ते जादा गाड्यांच्या खरेदीपाशी.
मध्य रेल्वेवर ठाण्याच्या पुढील प्रवासी, पश्चिम रेल्वेवरील बोरीवलीपुढचे प्रवासी १५ डब्यांच्या गाड्या सुरू होण्याच्या किंवा १२ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पनवेल-डहाणू मार्गाला उपनगरी दर्जा दिला, पण तेथे लोकल सुरू झालेली नाही. तोच प्रकार विरार-डहाणू मार्गाचा. तेथे अजूनही लोकलपेक्षा मेमूंच्या फेऱ्यांची संख्या अधिक आहे. कर्जत-पनवेल मार्गाचे रुंदीकरण होताच तेथेही लोकलची मागणी सुरू होईल. दिवा-पनवेल, दिवा-रोहा मार्गही लोकलसारख्या जलद प्रवासाच्या प्रतीक्षेत आहेत. आजवर त्यासाठी पाचवा-सहावा मार्ग रखडल्याचे कारण पुढे केले जात होते. आता मात्र तो मार्ग सुरू होऊनही लोकल आणि मेल-एक्स्प्रेस, मालगाड्यांची वाहतूक वेगळी काढणे मध्य रेल्वेला शक्य झालेले नाही.
सध्या एसी लोकलच्या वेळा प्रवाशांच्या लक्षात राहतात त्या दररोज वेळापत्रक कोलमडत असल्याने. या गाड्यांना स्थानकात थांबण्यास लागणारा वेळ आणि त्यांचा थांबा यामुळे अन्य लोकल रखडतात. एखादी एसी लोकल चुकली, तर तास-दीड तासाचा खोळंबा होतो. त्यामुळे ज्याच्या हाती निवांत वेळ आहे, सध्याच्या तलखीत थंडगार हवेचा झोत अंगावर घेत प्रवासाची इच्छा आहे आणि खिसाही उबदार आहे, त्यांनाच एसी लोकलचा प्रवास सोयीचा ठरतोय. कोरोनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढतानाच मेट्रो, एसी टॅक्सी, ॲपवर चालणाऱ्या गाड्यांना टक्कर देण्यासाठी बेस्टने आपल्या तिकीट दरात मोठी कपात केली. परिणामी, त्यांचे प्रवासी वाढले आणि कमी केलेल्या तिकीट दरांमुळे वाढलेला तोटा काही प्रमाणात भरूनही काढता आला. त्याच धर्तीवर रेल्वेलाही काम करण्याची गरज आहे. एक तर प्रवाशांच्या गरजांचा पुरेसा सर्व्हे न करताच एसी लोकल सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना प्रतिसाद मिळेना. त्यामुळे रडतखडत का होईना सुरू असलेली हार्बर मार्गावरील एसी लोकलची वाहतूक गुंडाळण्याची वेळ आली.
mसध्या कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना एसी लोकलकडे वळवायचे असेल, तर त्यासाठी त्यांच्या अपेक्षा, प्रवासाच्या गरजा समजून घेणे गरजेचे होते. ते न झाल्याने एसी लोकल रिकाम्या धावतात आणि उपनगरी वाहतुकीलाही अडथळा ठरतात. सध्या उन्हाची तीव्रता असह्य असल्याने आणि ठाण्यापुढील डोंबिवली, कल्याण पट्ट्यातून रस्त्यावरील प्रवास कोंडीचा, कटकटीचा, त्रासाचा आणि वेळखाऊ ठरत असल्याने एसी लोकलला फेब्रुवारीच्या तुलनेत थोडी गर्दी वाढते आहे. पण ती अपेक्षेइतकी नसल्याने ही लोकल पांढरा हत्ती ठरते आहे. नंतर हा ऐरावत रेल्वेच्या नियोजनकर्त्यांच्या अंगावर येऊ नये, म्हणून त्याच्या पाठीवरच्या अंबारीचे ओझे थोडे कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, हाच सध्याच्या एसी लोकलच्या तिकीट दरकपातीचा अर्थ.