‘तो’ आता ‘आई’ होणार आहे !...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 09:29 AM2023-02-06T09:29:27+5:302023-02-06T09:30:37+5:30
सोबतच्या छायाचित्रात जो बाप दिसतो आहे, तो आता आई होणार आहे, आणि जी आई दिसते आहे; तिचा या बाळंतपणात कसलाही थेट संबंध नाही.
पूर्वी नव्हतं ना असं काही ऐकलं? भविष्यात असं काही घडू शकतं यावर नव्हता ना विश्वास? ती आधी स्त्री होती, पण मनाने मात्र पुरुष होती.. म्हणजे स्त्रीचं शरीर घेऊन पुरुषी भावनांसह ती जगत होती. तिला असा जोडीदार मिळाला की, जो आधी पुरुष होता, पण मनाने मात्र स्त्री भावनेचा. आता तो स्त्री म्हणून जीवन जगत आहे. म्हणजे ट्रान्स वूमन! हा स्त्रीचा पुरुष झाला तरी गर्भाशय असल्याने आता आई होणार आहे. म्हणजे जो बाप दिसतो आहे, तो आता आई होणार आहे आणि जी आई दिसते आहे तिचा या बाळंतपणात कसलाही थेट संबंध नाही. कसं वाटतं ऐकल्यावर, वाचल्यावर! विश्वास ठेवावा की ठेवू नये? समाज कुठे भरकटत चाललाय असं वाटतं की, भारतीय संस्कृती आता नष्ट होणार अशी भीती वाटते?
- तर साथीहो, ऐका. यातलं काहीही घडणार नाही. हे स्वीकारल्यानंतर माणूस म्हणून आपण स्वतःच उन्नत होणार आहोत. समाज हे आनंदाने स्वीकारेल तेव्हा समाजाने, स्वातंत्र्य आणि समतेची सर्वोच्च उंची गाठलेली असेल. त्या दिशेने आपण सार्यांनीच जायला हवे.
काय आहे हे सगळं? थोडं सोपं करून सांगतो. आपल्यापैकी काही जणांमध्ये शरीर-भावना यांची काहीशी गडबड असते. निसर्गतः शरीराने स्त्री असली तरी तिच्या मनात पुरुषी भावना असू शकतात. काही जण शरीराने पुरुष असतील, पण मनाने ते स्त्री असतात. समाजात याबद्दल प्रचंड अज्ञान असल्याने, अशा व्यक्तींना प्रचंड त्रासाला, प्रसंगी भयानक छळालादेखील सामोरे जावे लागते. पण नव्या संशोधनातून ही गोष्ट अत्यंत नैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा समूहदेखील आता जागृत झालेला आहे.
‘एलजीबीटीक्यूप्लस’ नावाने त्यांची आता ओळख आहे. पुरुषाला पुरुषाचे आकर्षण वाटणे, स्त्रीला स्त्रीचे आकर्षण वाटणे, शरीराने पुरुष आहे, पण मनाने स्त्री आहे म्हणून पुरुषाचे आकर्षण वाटणे, शरीराने स्त्री, पण मनाने पुरुष म्हणून स्त्रीचे आकर्षण वाटणे, एकाच वेळी दोघांचेही आकर्षण वाटणे किंवा कोणाचेही आकर्षण न वाटणे आणि पुढे अजून बरेच काही..
‘जिया’ आणि ‘जहाद’ने इथपर्यंत येण्यासाठी प्रचंड संघर्ष केला असेल. कुटुंबाशी, समाजाशी आणि स्वतःशीही. या संघर्षाची आपण कोणीच कल्पनादेखील करू शकत नाही. हा संघर्ष इथेच थांबलेला नाही. येणाऱ्या बाळाला याहीपेक्षा भयंकर संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे. जिच्या पोटातून बाळ जन्म घेणार आहे, ती त्याची जैविक आई आहे, पण उद्या हीच आई बाप होणार आहे आणि जी आज आईच्या रूपात आहे, जिने या जन्मप्रक्रियेत बापाची भूमिका निभावली आहे, उद्या मात्र ती या बाळाला आईच्या रूपात दिसणार आहे. कोणाच्याही वाटेला न आलेला संघर्ष या बाळाला करावा लागणार आहे. या संघर्षात केवळ जिया आणि जहादलाच नव्हे तर पूर्ण समाजालाच त्या बाळाची साथ द्यायची आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याला आनंदाने स्वीकारणारा समाज उभा करण्याची आपली जबाबदारी आहे. कठीण आहे ना.. पण हे करायलाच हवं.
जिया आणि जाहाद तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा..
(ता. क.-२०११ च्या जनगणनेनुसार भारतात एकूण ४ लाख ८८ हजार ट्रान्सजेंडर आहेत. पण ज्यांनी अजूनही ओळख खुली केलेली नाही, अशी संख्या प्रचंड असण्याची शक्यताच अधिक आहे. काही अभ्यासांनुसार ही संख्या लोकसंख्येच्या ०.३ ते ०.१५ टक्क्यांपर्यंत असू शकते. म्हणजे सरासरी ०.१० टक्के जरी आपण गृहीत धरले तर भारतात ही संख्या ३९ लाख इतकी असू शकते.)
- विनायक सावळे, राज्य सरचिटणीस, अंनिस
vinayak.savale123@gmail.com