पाकिस्तानी तरुण म्हणतात, काश्मीर विसरा!
By विजय दर्डा | Published: February 6, 2023 09:25 AM2023-02-06T09:25:44+5:302023-02-06T09:26:14+5:30
काश्मीरप्रश्नावरून भारताशी शत्रुत्व घेऊन पाकिस्तानला बरबादीशिवाय दुसरे काय मिळाले, असा थेट प्रश्न त्या देशातील तरुण आता विचारू लागले आहेत!
विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
पाकिस्तानमध्ये समाजमाध्यमांवर एक वेगळ्या प्रकारची मोहीम सध्या जोरात सुरू आहे. त्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. भारतात बसून भले आपल्याला असे वाटत असेल, की काश्मीर कधी एकदा आपल्याला मिळते यासाठी पाकिस्तानी जनता आस लावून बसलेली असेल! पण वास्तव आता बदलले आहे. पाकिस्तानी लोकांनी आता ‘राग काश्मीर’ आळवणे बंद केले आहे. उलट ‘काश्मीर प्रश्नावरून भारताशी झालेल्या चार युद्धांत पाकिस्तानला काय मिळाले?’, असा थेट प्रश्नच त्यांनी समाजमाध्यमांवर उपस्थित करायला सुरुवात केली आहे. ‘आपल्या देशाने पाकव्याप्त काश्मीरसुद्धा सोडून दिले पाहिजे’ असे खूप जण उघडच म्हणत आहेत.
माझ्या एका पाकिस्तानी पत्रकार मित्राने तिकडचे हे नवे वास्तव सांगितले, तेव्हा मलाही आश्चर्य वाटले.
थोडी शोधाशोध केल्यावर समाजमाध्यमांवर फिरत असलेले अनेक व्हिडीओ सापडले. गाळात रुतलेल्या पाकिस्तानला प्रगतीच्या रस्त्यावर घेऊन जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या शिकल्या-सवरलेल्या तरुणांनी एक नवी मोहीमच सुरू केली आहे. हे युवक भारत-पाकिस्तान संबंधात प्रश्न विचारत आहेत. भारताची वेगाने होत असलेली प्रगती आणि पाकिस्तानची सद्य:स्थिती या चर्चेमध्ये काश्मीरचा मुद्दाही येतो. या व्हिडीओजमध्ये पाकिस्तानी लोकांना त्यांच्या देशाबद्दल असलेला अभिमान दिसतोच; पण हेच युवक त्यांचे सरकार आणि लष्कराला प्रश्न विचारतात, ‘गेली ७५ वर्षे काश्मीरचा मुद्दा लढवून मागासलेपणाव्यतिरिक्त आपल्याला काय मिळाले?’... ‘काश्मीर भारतापासून हिसकावून घेण्याची ताकद आपल्या सैन्याकडे आहे का?’... ‘पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांना खरेच आपल्याबरोबर राहायचे आहे का?’
- पाकिस्तानी तरुणांच्या या प्रश्नात पुष्कळ दम आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कराने काश्मीर भारतापासून हिरावून घेण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. १९४७ ते १९९९ या काळात चार युद्धे झाली. प्रत्येक वेळी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारण्यात आली. १९७१ साली तर जवळपास १ लाख पाक सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर शस्त्रे ठेवली होती!
एका तरुणाने तर मोठा मार्मिक मुद्दा काढला. तो विचारतो, ‘भारत मोठा देश आहे. त्याची अर्थव्यवस्थाही बलाढ्य आहे. युद्धाचा प्रचंड खर्च भारत सहन करू शकतो. मात्र, आजवरच्या प्रत्येक युद्धाने पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी गाळात घातली. ज्या पैशांतून लोकांचे पोट भरायला पाहिजे होते, मुलांना चांगले शिक्षण द्यायला हवे होते, मोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या करायला हव्या होत्या, तो पैसा आपण दारूगोळ्यात उडवला. मोठ्या शक्तींच्या इशाऱ्यावर आपण कुठपर्यंत नाचणार आहोत?’
- बरोबरच आहे! पाकिस्तानच्या ताब्यातल्या काश्मीरमध्ये लोक कधीपासून सातत्याने निषेध आंदोलने करीत आले. गिलगिट बाल्टिस्तान प्रदेशात तर अनेकदा हिंसक प्रदर्शनेही झाली. गरिबी आणि उपासमारीने या पूर्ण प्रदेशाला उद्ध्वस्त केले आहे. आम्हाला भारतात जाऊ द्या, अशी मागणी लोक करू लागले आहेत. ‘आर पार खोल दो, कारगिल जोड दो’ अशा घोषणा तेथे दिल्या जातात.
पाकिस्तानी तरुणांनी हे आता उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे. समाजमाध्यमांवरच्या या नव्या चर्चेमुळे पाकिस्तानी सैन्य अर्थातच नाराज आहे. याआधीही अशा प्रकारची चर्चा सुरू केली ती पॅरिसस्थित पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी! पाकिस्तानी सैन्य अर्थातच त्यांना देशविरोधी मानते. ते पॅरिसला पळून जात असताना त्यांच्या हत्येचाही प्रयत्न झाला.
पाकिस्तानचे सुप्रसिद्ध पत्रकार आणि विश्लेषक ताहीर अस्लम गोरा हेसुद्धा सत्य बोलल्याची शिक्षा म्हणून आता नाइलाजाने कॅनडात राहत आहेत. पाकिस्तानच्या
ज्येष्ठ पत्रकार आरजू काजमी याही असे प्रश्न कायम उपस्थित करत आल्या आहेत. आपण इस्लामाबादमध्येच राहतो असे त्या वरवर भासवत असल्या, तरी वास्तवात त्यांनाही देश सोडावा लागला आहे. पाकिस्तानला जर बरबादीपासून वाचायचे असेल तर भारताशी शत्रुत्व सोडावे लागेल, अशीच भूमिका या पत्रकारांनी सातत्याने मांडलेली आहे.
भारताशी झालेल्या युद्धांमुळे पाकिस्तानच्या पदरात बेरोजगारी आणि यातनांशिवाय दुसरे काहीही पडले नाही, असे त्यांचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते; परंतु दुसऱ्याच दिवशी सैन्याच्या दडपणाखाली त्यांच्या कार्यालयाने कोलांटउडी मारली.
पाकिस्तानची खरी समस्या त्यांचे सैन्य हीच आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ मैत्रीच्या रस्त्यावरून जाऊ पाहत होते; पण मिया मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये घुसखोरी केली. परिणामी युद्ध झाले. पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्याची संधी घालवली. इम्रान खान यांनी भारताशी मैत्रीचा प्रयत्न केला; तेव्हा त्यांनाच विरोध केला गेला. तरीही ते ऐकत नाहीत हे पाहून अखेर त्यांना सत्तेवरून खाली उतरवले गेले. भारतात दहशतवाद पेरून तो वाढवण्यामध्ये असलेल्या सहभागापासून एकूणच भारतविरोध हाच पाक सैन्याचा प्राणवायू आहे. मैत्री व्हावी असे त्यांना कसे वाटेल?
अमेरिकेतील डेला वेयर विद्यापीठातील प्राध्यापक मुक़द्दर खान यांच्या म्हणण्याकडे पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे. खान म्हणतात, पाकिस्तानची स्थिती इतकी वाईट आहे की मनात आणले तर भारत सहज या देशावर ताबा मिळवू शकतो. पाकिस्तानमधल्या बिघडलेल्या परिस्थितीचा भारत फायदा घेत नाही, याबद्दल पाकिस्तानने खरेतर भारताचे आभार मानले पाहिजेत. प्रोफेसर खान, आपण योग्य तेच सांगता आहात. भारतीय संस्कृती हल्ला करण्याची नाही. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही.
हे सारे वाचत, पाहत असताना पाकिस्तानमधल्या एका सामान्य नागरिकाचे म्हणणे मला बेचैन करून गेले. तो माणूस म्हणत होता, भारताशी आपले संबंध चांगले असते तर कणिक आणि कांद्यासाठी आपल्याला लांबच लांब रांगा तरी लावाव्या लागल्या नसत्या.