दिवाळीत घ्या ज्ञानदीप उजळवण्याचा वसा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:56 AM2018-11-07T04:56:21+5:302018-11-07T04:57:03+5:30
पेटलेली पणती मानवी अस्तित्वाची चाहूल देत असते. श्रीमंतांची घरे इलेक्ट्रिकच्या माळांनी सुशोभित असतात. तर गरिबाच्या झोपडीच्या दारात थरथरणारी पणतीतील वात दिलासा देत असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा यातून दिसते.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’, ‘त्याच धर्तीवर नेमेचि येते दिवाळी’ असे जरी म्हणता येत असले, तरी दिवाळी साजरी करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. आपापल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती दिवाळी साजरी करीत असते. घराला रंग देऊन, नवे कपडे परिधान करून, नव्या वस्तूंची खरेदी करून, नवनवीन खाद्यपदार्थ करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तसा प्रयत्न यंदाच्या दिवाळीत सर्वजण करताना दिसत आहेत. महागाई वाढली आहे, असे म्हणत-म्हणत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी बिनभोबाट सुरू आहे. मुलाबाळांसाठी आणि स्वत:साठीदेखील पालकांकडून नवीन कपडे खरेदी केले जात आहेत. आॅनलाइन खरेदीला ऊत आला असला, तरी मॉलमध्ये जाऊन खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. जनतेचा महापूर सर्वच दुकानांमधून ओसंडून वाहताना दिसत आहे आणि हेच दिवाळीचे वैशिष्ट्य आहे. दिवाळी हा ‘सण’ कमी आणि आनंदोत्सव जास्त असे, या सणाचे वर्णन करता येईल. आपण आनंदित राहायचे आणि हा आनंद इतरांना वाटायचा, असा प्रयत्न प्रत्येक जणच करीत असतो. आनंदी राहण्याचा जणू मंत्रच हा सण देत असतो. यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाची छाया आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता, पण हवामान हे लहरी असते आणि या लहरीपणाचा अंदाज कोणत्याही यंत्रणेला अचूक घेता येत नाही. या अंदाजावर विसंबून राहणाºयांना फजितीला आणि त्यामुळे हवामान खात्याला लोकांच्या टीकेला तोंड द्यावे लागते, पण कधी-कधी हे अंदाज अचूक ठरून लोकांना वादळाचा आणि पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो, हेही विसरून चालणार नाही. माणूस ज्याप्रमाणे ज्योतिषांच्या भाकितांवर पूर्णपणे विसंबून राहात नाही. त्याचप्रमाणे, हवामान खात्याचे अंदाजही माणसाने आधार म्हणून वापरले, तर त्यांची फसगत होणार नाही. सरकारने काही तालुक्यांपुरता दुष्काळ घोषित केला आहे. त्यामुळे त्या तालुक्यातील लोकांना दुष्काळात मिळणाºया सवलती मिळू शकतील, तसेच सरकारी मदतही मिळू शकेल. त्या आधारे त्यांनी भविष्यासाठी नियोजन केले, तर एखादा ऋतू कोरडा जरी गेला, तरी त्यामुळे त्यांचेवर देशोधडीला लागण्याची वेळ येणार नाही. सरकार हे लोककल्याणकारी असते. ते लोकांना वाºयावर सोडू शकत नाही, हे जरी खरे असले, तरी प्रत्येक व्यक्तीने भविष्याचा विचार करून, स्वत:च्या भविष्यासाठी तरतूद करून ठेवणेच गरजेचे असते. मुंगीसारखा क्षुल्लक जीव स्वत:च्या भविष्याची तरतूद करून ठेवीत असतो. उलट टोळासारखा कीटक ‘आता कशाला उद्याची बात’ या विचाराने जीवन जगत असतो. आपण कसे जगायचे, मुंगीसारखे की टोळासारखे, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. जीवनाचा आनंद तर घ्यायचा, पण भविष्याचाही विचार करायचा, अशी प्रवृत्ती बाळगणाºयांना जीवनात निराश व्हायची वेळ सहसा येत नाही. दिवाळी साजरी करताना, संपूर्ण परिसर उजळून टाकण्याचा प्रयत्नही माणसाकडून होत असतो. दुष्ट शक्तीवर सुष्ट शक्तीचा विजय, अंधारावर प्रकाशाची मात, पती-पत्नीच्या, बहीण-भावाच्या नात्यांचा उजाळा आणि गोवत्साच्या पूजनातून सकल प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचा संकेत असे अनेक पैलू या दिवाळीच्या सणाला लाभलेले आहेत. म्हणून हा सण विशिष्ट जाती-धर्मापुरता मर्यादित राहिलेला नाही. अशा स्थितीत सकल मानव जातीला एका सूत्रात बांधणारा सण म्हणून सर्वांनी साजरा केला, तर मानवाच्या जीवनात प्रसन्नता आणि आनंद बहरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात तर या सणाच्या निमित्ताने संगीत आणि साहित्य हे प्रकार सर्वत्र जोपासले जातात, ते दिवाळी पहाट व दिवाळी अंकांच्या माध्यमातून. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी या सणाचे वर्णन ज्ञानाची दिवाळी असे पुढीलप्रमाणे केले आहे, सूर्ये अधिष्ठिली प्राची, जया राजीव दे प्रकाशाची, तैसी श्रोतिया ज्ञानाची, दिवाळी करी. आपण सर्वांनी त्याप्रमाणे वर्तन करून दिवाळीचा आनंद लुटत असताना, सर्वत्र ज्ञानदीप पाजळण्याचा वसाही घ्यावा आणि सारे जीवन संपन्न व सुसंस्कृत करून सोडावे, हीच अपेक्षा.