कोल्हापूरची विमान ‘सेवा’ हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:54 PM2017-12-28T23:54:16+5:302017-12-28T23:54:29+5:30

​​​​​​​महाराष्ट्राने हवाई वाहतुकीविषयी फारशा गांभीर्याने यापूर्वी विचारच केला नाही, त्यामुळे विमानतळ असूनही वाहतूक नाही. हवाई‘सेवा’ हवेतच लटकली आहे.

Kolhapur aircraft should be 'service' | कोल्हापूरची विमान ‘सेवा’ हवेतच

कोल्हापूरची विमान ‘सेवा’ हवेतच

Next

- वसंत भोसले
महाराष्ट्राने हवाई वाहतुकीविषयी फारशा गांभीर्याने यापूर्वी विचारच केला नाही, त्यामुळे विमानतळ असूनही वाहतूक नाही. हवाई‘सेवा’ हवेतच लटकली आहे. महाराष्ट्रात लहान-मोठी अठ्ठावीस विमानतळे आहेत. त्यापैकी सहा विमानतळांवर उड्डाणाची दिवस-रात्र सोय आहे. तीनच विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय वाहतूक होते. या सहा विमानतळांशिवाय चार नियोजित विमानतळे आहेत. त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, आदींचा समावेश आहे. या सर्व विमानतळांवरून हवाई वाहतूक होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. परिणामी सुमारे दोन डझन विमानतळांच्या धावपट्ट्या केवळ ऊन-पाऊस खात पडून आहेत. शेकडो एकर जमीन त्यासाठी वापरली आहे. शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, दोन-चार जिल्हे वगळता तब्बल तीस जिल्ह्यांसाठी जवळपास सोयीची हवाई सेवा उपलब्ध नाही.
कोल्हापूर, नाशिक आणि जळगाव विमानतळांवरून हवाई वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू करण्यात येणार होती. त्यातील नाशिक आणि जळगावची सेवा सुरू झाली आहे. मात्र कोल्हापुरची विमानसेवा अद्याप हवेतच आहे. कोल्हापुरची सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबरअखेरची मुदत होती. पहिल्या दिवसाच्या विमान प्रवासासाठी दोनशेहून अधिक प्रवाशांनी नोंदणीसाठी चौकशीही केली होती. कोल्हापूरच्या सेवेसाठी आठवड्यातील केवळ तीनच दिवस (मंगळवार, बुधवार आणि रविवार) परवानगी देणार असे सांगितले होते. विमान कंपनीने ही परवानगी सहा दिवसांची असावी, अशी मागणी केली आहे. दुपारी दीड वाजता मुंबईतून विमानाचे उड्डाण करून अडीच वाजता कोल्हापुरात पोहोचणार आणि कोल्हापूरहून परत साडेचार वाजता मुंबईत पोहोचणार आहे. ही वेळ गैरसोयीची आहे. मुंबईहून विमानाने कोल्हापूरला दुपारी येऊन काही उपयोग नाही. सकाळचा वेळ वाया जातो. शिवाय कामे करून तातडीने मुंबईला परतता येत नाही. हीच स्थिती कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया प्रवाशांची असणार आहे. तातडीने जाऊन कामे करून परत जाता येत नसेल तर हवाई मार्गाचा वापर कोण करेल ?
महाराष्ट्राची मुळात एक अडचणच आहे. मुंबईशी संपूर्ण राज्यातील प्रमुख शहरे हवाई मार्गाने जोडण्यासाठी मुंबईचे विमानतळ हेच महाराष्ट्राचे राहिलेले नाही. येथे सुमारे ९०० विमानांची ये-जा आहे. त्यामुळे हा विमानतळ प्रचंड व्यस्त असतो. दहा-वीस प्रवाशांच्या जिल्ह्यातून येणाºया विमानाला जागा किंवा वेळ देताच येत नाही. या विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नव्या मुंबईचा विमानतळ तातडीने उभा करावा लागेल. जेणेकरून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक तिकडे वर्ग करता येईल आणि मुंबईच्या विमानतळाला श्वास घेण्यास अवधी मिळेल. त्या वेळेत कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, जळगाव, नांदेड, शिर्डी, आदी प्रमुख विमानतळांवरून होणाºया विमानांच्या वाहतुकीसाठी योग्य वेळ देता येईल. शिवाय पुण्यासाठीसुद्धा पुरंदर येथील नियोजित विमानतळ तातडीने पूर्ण होण्याची गरज आहे. पुण्यासाठी विमानतळ कोठे उभा करायचा याची चर्चाच दहा वर्षे चालू होती. चाकण की तळेगाव की पुरंदर यात वेळ गेला. आता पुरंदरची जागा निश्चित झाली आहे. प्रत्यक्ष काम केव्हा सुरुवात होणार माहीत नाही. विमान कंपनीच्या मागणीमुळे कोल्हापुरची विमान सेवा हवेतच लटकली आहे.

Web Title: Kolhapur aircraft should be 'service'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.