संपादकीय - कोल्हापूर उत्तरचे कोडे, महाआघाडीचे अडणार घोडे !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 02:28 PM2022-03-31T14:28:20+5:302022-03-31T14:37:11+5:30

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपुढले कोडे किती गहन असेल, याचे प्रात्यक्षिकच कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत घडताना दिसते आहे..

Kolhapur North's puzzle, the horses of the Grand Alliance! | संपादकीय - कोल्हापूर उत्तरचे कोडे, महाआघाडीचे अडणार घोडे !

संपादकीय - कोल्हापूर उत्तरचे कोडे, महाआघाडीचे अडणार घोडे !

Next

वसंत भोसले

राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्याला आता सव्वादोन वर्षे झाली आहेत. वैचारिक भूमिकेतील विरोधाभासाने महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही, ही आघाडीच अनैसर्गिक आहे, असा दावा करीत बलाढ्य विरोधी पक्ष भाजपने आदळ-आपट करून पाहिली; यावर महाविकास आघाडीचे प्रमुख रचनाकार शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडत भाजपला पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही, अशी निसंदिग्ध भूमिका मांडली आहे. मुंबई महापालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वातावरण तापविण्यासाठी विरोधकांनी थयथयाट चालविला आहे; पण, तो जनतेच्या प्रश्नांपासून कोसो मैल दूर आहे. महाआघाडीच्या सरकारची कारकिर्द पूर्ण होण्यात आता अडसर दिसत नाही, आगामी लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेला मात्र महाआघाडीचे घोडे अडणार आहे.

कोल्हापूर शहराचा भाग असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चालू आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला; पण तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर नाराज मतदारांना उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या रूपाने काँग्रेसने पर्याय दिला. उमेदवारी मिळेपर्यंत ते भाजपमध्ये होते; मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार होती. शिवाय काँग्रेसला सक्षम उमेदवार नव्हता. चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी मिळताच त्यांचा विजय निश्चित झाला.
कोल्हापूर शहराचा समावेश असलेल्या मतदारसंघात आजवर केवळ तीन निवडणुकांचा अपवाद वगळला तर, विरोधी उमेदवार निवडून येत असे. पूर्वी शेकापचा मतदारसंघ नंतर शिवसेनेकडे गेला. लालासाहेब यादव आणि मालोजीराजे छत्रपती या काँग्रेस उमेदवारांचा अपवाद सोडला तर शेकाप, एकदा जनता पक्ष आणि नंतर शिवसेना विजयी होत आली आहे. चंद्रकांत जाधव यांच्या रुपाने काँग्रेसने तिसरा विजय नोंदविला होता. आता ही जागा शिवसेनेला सोडावी लागली. कारण महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून तीन आमदारांचे निधन झाले. राष्ट्रवादीचे भारत भालके (पंढरपूर), काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर (देगलूर- जि. नांदेड) आणि काँग्रेसचे चंद्रकांत जाधव (कोल्हापूर उत्तर) हे ते तीन आमदार. या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी झाल्यानंतर पोटनिवडणुकीत विद्यमान आमदारांच्या पक्षालाच जागा सोडण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यानुसार देगलूरला काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर लढले आणि जिंकले; मात्र या मतदारसंघात शिवसेना प्रमुख विराेधक होता. २०१४ मध्ये शिवसेनेने हा मतदारसंघ जिंकला होता; पण शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी सेनेविरुद्ध बंड करीत भाजपची उमेदवारी स्वीकारली; पण त्याचा काही परिणाम झाला नाही. ४२ हजार मतांनी दारुण पराभव झाला.

पंढरपूरची जागा राष्ट्रवादीला सोडली आणि भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी ती लढविली. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आणि ते जिंकले. महाविकास आघाडीला भाजप हा त्या मतदारसंघातील प्रमुख विरोधक असताना लढताना अडचण येत नाही; पण, मागील निवडणुकीनंतर महाआघाडी केल्याने आता त्यांचे मित्र पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत. तेव्हा अडचण निर्माण होत आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने विजय खेचून आणलेला असताना महाआघाडीच्या सूत्रानुसार जागा सोडावी लागली; मात्र प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या आणि अनेकवेळा प्रतिनिधित्व केलेल्या शिवसेनेला अडचण झाली. नेहमी एकमेकांविरुद्ध लढणारे एकत्र आले आणि या मतदारसंघात २०१४ चा अपवाद सोडला तर कधीही न लढणाऱ्या भाजपला विरोधी पक्षाची जागा मिळाली. या घटनांवरून शिवसेनेत नाराजीची लाट आली. माजी आमदार राजेश क्षीरसागर दोन दिवस नॉटरिचेबल होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या बैठकीनंतर सूत्रे हलली. क्षीरसागर यांना ‘वर्षा’वर पाचारण करण्यात आले. शिवसैनिकच काँग्रेसचा आमदार निवडून आणतील, असे जाहीर करावे लागले. आता हे मनोमिलन शहरांच्या गल्ल्यागल्ल्यापर्यंत कसे पोहोचते ते पाहावे लागेल. काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव तर भाजपकडून सत्यजित कदम लढत आहेत. दोघेही माजी नगरसेवक आणि सध्या असलेल्या पक्षाच्या नेमक्या उलट्या पक्षात होते. 

अशा पोटनिवडणुका होत जातील. त्यातील जय-पराजयाने सरकारच्या बहुमतावर कोणताही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट आहे. खरी कसरत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडे राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी २३ जागा आहेत. (शिवसेना १८, राष्ट्रवादी ४, काँग्रेस-१) त्या विद्यमान पक्षांना सोडून बाकीच्या २५ जागांची वाटणी करावी लागेल. जेथे भाजपच विरोधक होता तेथे अडचण येणार नाही. जेथे महाविकास आघाडीतील मित्र पक्षातच प्रमुख लढत झाली आहे, अशा ठिकाणी घोडे अडणार! हे कोडे  सोडविण्याची तयारी आता महाविकास आघाडीला करावी लागणार आहे, हे कोल्हापूर उत्तरच्या राजकारणावरून स्पष्ट होते.

(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत)

(vasant.bhosale@lokmat.com)

Web Title: Kolhapur North's puzzle, the horses of the Grand Alliance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.