पर्यटनाच्या कोल्हापुरी ब्रँडला हवे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 05:41 AM2018-01-12T05:41:29+5:302018-01-12T05:41:43+5:30

कोेल्हापूर ऐतिहासिक तसेच पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळेच ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ते ‘पर्यटन हब’ बनावे, पर्यटनाचा कोल्हापुरी ब्रॅँड तयार व्हावा, यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील प्रयत्न करीत आहेत.

Kolhapuri brand of tourism has the power | पर्यटनाच्या कोल्हापुरी ब्रँडला हवे बळ

पर्यटनाच्या कोल्हापुरी ब्रँडला हवे बळ

Next

- चंद्रकांत कित्तुरे

महाराष्टÑातील पहिला ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ कोल्हापुरात झाला. पर्यटनवाढीसाठी त्याचे आयोजन केले होते. मात्र, पर्यटकांसाठी सोईसुविधा कधी वाढविणार ?

कोेल्हापूर ऐतिहासिक तसेच पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळेच ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ते ‘पर्यटन हब’ बनावे, पर्यटनाचा कोल्हापुरी ब्रॅँड तयार व्हावा, यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील प्रयत्न करीत आहेत. त्यासाठीच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पहिला ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या महोत्सवातील फुलांच्या रंगीबेरंगी दुनियेत कोल्हापूरकर हरवून गेले होते. या फुलांच्या सुवासाचा गंध महाराष्ट्रदेशी सर्वदूर पसरला आणि पर्यटनाचा नवा कोल्हापुरी ब्रॅँड तयार झाला, असा दावा मंत्री पाटीलप्रेमी करीत आहेत. शंभरहून अधिक जातींची सुमारे दीड लाखांवर फुलझाडे त्यात होती; शिवाय फुलांनी सजविलेली धरणाची प्रतिकृती, पुतळे, मूर्ती, हत्ती, बैलगाडी सर्वकाही फुलांच्या आकर्षक रंगसंगतीने मनोहारी बनले होते. ते पाहून जो तो सेल्फीच्या अथवा मोबाईल फोटोच्या रूपात हे सर्व संस्मरणीय करू पाहत होता. सुमारे सात लाख लोकांनी या फेस्टिव्हलला भेट दिली.
कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत (केएसबीपी) कसबा बावडा येथील पोलीस उद्यानात या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. याच उद्यानात राज्यातील सर्वात उंच राष्टÑध्वजही डौलाने फडकत आहे. मंत्री पाटील यांच्याच प्रेरणेने नवरात्रातही नवदुर्गा ऊर्जा महोत्सव भरविण्यात आला होता. पर्यटनवाढीचा एक भाग म्हणूनच त्याचेही आयोजन करण्यात आले होते. यापुढचा टप्पा म्हणून फेब्रुवारीत कला महोत्सव आणि एप्रिल-मेमध्ये कोल्हापूर दर्शन सहलीचे आयोजन करण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त आहेत. मात्र, हा शाश्वत पर्यटन विकास म्हणता येईल का? पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा पुरेशा उपलब्ध आहेत का? याची उत्तरे नकारात्मक मिळतात. कारण वाहतुकीची कोंडी, पार्किंगचा प्रश्न, स्वच्छतागृहांचा, निवासाचा प्रश्न यासारख्या अनेक समस्यांना पर्यटकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ते कोकण, गोव्याला अधिक पसंती देतात.
आदिमाता अंबाबाई आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूर प्रसिद्ध आहेच. शिवाय कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल, ‘तांबडा-पांढरा’ यासाठी या शहराची जगभर ख्याती आहे. समृद्ध निसर्गसंपदा, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे, अनुकूल हवामान यामुळे पर्यटकांचा ओढा कोल्हापूरकडे असतो. वर्षाला सुमारे ६० लाख पर्यटक कोल्हापूरला भेट देतात. यातील सुमारे २५ लाख केवळ नवरात्रातच येतात. कोल्हापूर हे पर्यटन केंद्र बनविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असतात; परंतु घोषणा अधिक अन् अंमलबजावणी कमी, अशी त्यांची स्थिती असते. एखादा शासकीय अधिकारी किंवा मंत्री एखादा उपक्रम सुरू करतो. ते गेले की तो उप्रकमही बंद पडतो. लक्ष्मीकांत देशमुख यांनी जिल्हाधिकारी असताना ‘कोल्हापूर फेस्टिव्हल’ सुरू केला होता. ते बदलून गेल्यानंतर तो बंद पडला आहे. मंत्री पाटील यांनी सुरू केलेल्या या उपक्रमांचे तसे होऊ नये. हे उपक्रम कायमस्वरूपी झाले, पर्यटकांच्या सोयीसुविधांचा विकास प्राधान्याने केला तरच पर्यटनाचा हा कोल्हापुरी ब्रॅँड जगभरात नावारूपास येईल .

Web Title: Kolhapuri brand of tourism has the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.