कोविंद विरुद्ध मीराकुमार
By Admin | Published: June 23, 2017 12:07 AM2017-06-23T00:07:54+5:302017-06-23T00:07:54+5:30
भाजपचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या पाठीशी बहुमत असल्याचे चित्र दिसत असतानाही कॉंग्रेससह देशातील १७ विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध मीराकुमार यांना आपली उमेदवारी जाहीर
भाजपचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या पाठीशी बहुमत असल्याचे चित्र दिसत असतानाही कॉंग्रेससह देशातील १७ विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध मीराकुमार यांना आपली उमेदवारी जाहीर करून भाजप व रालोआ यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. पराभव दिसत असतानाही आपला उमेदवार उभा करण्याची खेळी विरोधी पक्ष का करीत आहेत, असा शहाणा प्रश्न अनेकांकडून विचारला जाईल. मात्र त्याचे साधे उत्तर ‘ही लोकशाहीची गरज आहे’ हे आहे. ही निवडणूक सर्वसंमतीने व्हावी आणि त्यासाठी सरकारने विरोधी पक्षांशी वाटाघाटी कराव्या हे अपेक्षित होते. वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतिपदावर झालेली निवड अशा वाटाघाटीनंतर सर्वसंमतीने झालीही होती. याहीवेळी सरकारने विरोधी पक्षांशी वाटाघाटी कराव्या हे अपेक्षित होते. तसे नाटकच सरकारपक्षाने केले. ते करताना आपले हुकुमाचे पान लपवून ठेवले आणि ऐनवेळी कोविंद यांचे नाव पुढे करून विरोधकांना धक्का दिला. कोविंद हे दलित आहेत ही गोष्ट सरकारपक्षाकडून आता बरीच जोरात सांगितली जात आहे. मात्र दलित म्हणूनच नव्हे तर नेते म्हणूनही कोविंद हे देशाला फारसे परिचित नव्हते आणि नाहीतही. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या परिचयाचे स्तंभ लिहिले गेले. गेल्या तीन वर्षांच्या मोदींच्या कारकीर्दीत देशातील दलितांवर ठिकठिकाणी मोठे अत्याचार झाले. हैदराबादमधील दलित युवकाची आत्महत्या, दिल्ली विद्यापीठातील दलित विद्यार्थ्यांचे आंदोलन, कानपूर, कोलकाता व अन्यत्र घडलेल्या दुर्दैवी घटना याच काळात झाल्या. मात्र दलित वा दलितांचे प्रतिनिधी म्हणून त्याविषयीची आपली साधी प्रतिक्रियाही कोविंद यांनी कुठे व्यक्त केलेली दिसली नाही. दलितांवरील अन्यायाच्या वेळी तुम्ही कोणती भूमिका घेता यावर तुमचे खरे दलितत्व वा विद्रोहीपण निश्चित होते. संघात सारेच वारकरी असतात. ते कधीही नेतृत्वाला प्रश्न विचारीत नाहीत. खांद्यावरचा झेंडा कायम असला की त्यांच्या निष्ठांना बळ मिळत असते. कोविंद हे असे वारकरी असल्याने त्यांनी आपला राग (त्यांना तो आला असेल तर) व्यक्त केल्याचे न दिसणे त्याचमुळे समजण्याजोगे आहे. विरोधी पक्षांपैकी नितीशकुमारांनी त्यांना पाठिंबा देणे ही त्यांची प्रादेशिक व व्यक्तिगत गरज आहे. कोविंद हे त्यांच्या राज्याचे राज्यपाल राहिले असल्याने व त्यांचे नितीशकुमारांशी संबंध खासगीतही चांगले राहिल्याने त्यांनी तो निर्णय घेतला आहे. शिवाय कोविंद यांच्यामार्फत नितीशकुमारांचा मोदीविरोध कमी करण्याचा प्रयत्नही भाजपने केला आहे. भाजप, रालोआ आणि नितीशकुमारांचा जदयू हा पक्ष यांनी आपसात ठरवून केलेल्या या राजकारणाला मीराकुमार यांच्या उमेदवारीने मोठा शह दिला आहे. पाच वर्षे लोकसभेच्या अध्यक्षपदावर राहिलेल्या मीराकुमार यांनी सर्वच राजकीय पक्षांसह देशातील जनतेलाही स्वत:ची ओळख पटविली आहे. त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली आहे. मीराकुमार या देशाचे माजी संरक्षणमंत्री व उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रातील त्यांचा अनुभव मोठा आहे. शिवाय त्या बिहारच्या कन्या असल्याने त्यांच्या उमेदवारीने कोविंद यांच्याएवढेच नितीशकुमार यांच्या राजकारणासमोरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जगजीवनराम आणि मीराकुमार यांची बिहारच्या राजकारणात एक मोठी व प्रभावी परंपरा राहिली आहे. तिचा नितीशकुमार यांना दीर्घकाळ लाभही झाला आहे. कोविंद यांच्या उमेदवारीमागे उभ्या असलेल्या सत्तारुढ आघाडीजवळ मतांचे आधिक्य असल्याने मीराकुमार यांना व त्यांच्या पाठिशी असणाऱ्या पक्षांना ही निवडणूक जड जाईल व तिच्यासाठी त्यांना फार परिश्रम करावे लागतील हे उघड आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीने देशातील १७ राजकीय पक्ष सरकारच्या विरोधात ठामपणे उभे असल्याचे लोकशाहीच्या संदर्भात आशादायक वाटावे असे चित्र निर्माण केले आहे. मीराकुमार याही दलित समाजातून आल्या आहेत आणि त्यांच्या दलित असण्यामागे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील व त्यांच्या वडिलांच्या आयुष्यातील लोकलढ्याचा वारसा आहे. जगजीवनराम हे १९४६ मध्ये स्थापन झालेल्या देशाच्या पहिल्या हंगामी सरकारात श्रममंत्री राहिले आहेत. तेव्हापासून त्यांनी देशाची अनेक खात्यांच्या प्रमुखपदी राहून सेवा केली आहे. मीराकुमार यांच्यामागे तो अभिमानास्पद वारसा आहे. झालेच तर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळालेल्या त्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या महिला आहेत. आम्ही एका दलिताला उमेदवारी देऊन आपले पुरोगामीत्व पुढे केले आहे या भाजप व संघ यांच्या प्रचारी भूमिकेला मीराकुमार हे तेजस्वी उत्तर आहे. सोनिया गांधी, शरद पवार, फारुख अब्दुल्ला, लालूप्रसाद, स्टॅलीन यासारखे देशाचे व त्यातील अनेक राज्यांचे प्रतिनिधीत्व करणारे नेते त्यांच्या पाठिशी आहेत. निवडणुकीतील जयपराजय ही एक अपरिहार्य बाब आहे. या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज अनेकांना बांधता येणार आहे. मात्र त्यात विजयी होणाऱ्या उमेदवाराएवढीच त्यात पराभूत होणाऱ्याचीही प्रतिष्ठा राष्ट्रीय राहणार आहे याविषयी साऱ्यांनी आश्वस्त व्हावे अशी आताची स्थिती आहे.