कृष्णामाईचा जलउत्सव

By Admin | Published: August 26, 2016 06:54 AM2016-08-26T06:54:37+5:302016-08-26T06:54:37+5:30

कृष्णामाईची नव्या पाण्याने ओटी भरण्याची परंपरा इकडे आहे. चालू वर्षी ही ओटी भरून वाहते आहे. तिचा उत्सव चालू आहे.

Krishnamachari Water Resource | कृष्णामाईचा जलउत्सव

कृष्णामाईचा जलउत्सव

googlenewsNext


कृष्णामाईची नव्या पाण्याने ओटी भरण्याची परंपरा इकडे आहे. चालू वर्षी ही ओटी भरून वाहते आहे. तिचा उत्सव चालू आहे.
चालू वर्षी पाऊसमान समाधानकारक होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाच होता. त्यानुसार सर्वत्र उत्तम पाऊस होत नसला तरी कृष्णा खोऱ्यात मात्र त्याची प्रचिती येत आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून वाहाणाऱ्या सर्व नद्यांना दोन वेळा पूर आले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. वारंवार पाण्याच्या पावसाने धरणे भरली आहेत. कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्यांवर ३७ छोटी-मोठी धरणे आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता ४२५ टीएमसी आहे. त्यापैकी सर्व धरणे जवळपास भरली आहेत. काही धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले. परिणामी पुराच्या पाण्यात वाढ होत राहिली. पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतच्या चारही जिल्ह्यातून वाहणाऱ्या या सर्व नद्या कृष्णेला मिळतात. त्यामुळे चालू वर्षी कृष्णा खोऱ्यातील काही भागाचा अपवाद वगळता दुष्काळसदृश परिस्थितीतून सुटका झाली आहे.
खरे तर जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला की, सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर जल उत्सवच सुरू होतो. आंबोली, दाजीपूर, विशाळगड, महाबळेश्वर आदी ठिकाणी सरासरी चार ते सहा हजार मिलीमीटर पाऊस कोसळतो. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात विशाळगड परिसरात तर सात हजार मिलीमीटर पावसाचा उच्चांक आहे. इतका पाऊस या वर्षी पडला नसला तरी किमान सहा हजार मिलीमीटर पाऊस दर वर्षी पडतो. तेथून वाहणारी कासारी, कडवी, कुंभी अशा छोट्या- छोट्या नद्यांचे लालबुंद पाणी वाहात-वाहात कृष्णेला मिळते. या धरणात साठणाऱ्या पाण्यावर हजारो हेक्टर्स जमिनीवर डोलदार पिके उभी राहातात. भात, नागली, ऊस आणि जनावरांचे प्रमुख खाद्य असलेले गवत यांनी शेतीवाडी हिरवा शालू नेसल्याप्रमाणे नटली आहे.
साताऱ्याजवळचे कासचे पठार दर वर्षी फुलणाऱ्या फुलांनी बहरून गेले आहे. तसे सर्वच डोंगर नटले आहेत. श्रावण मासीचा ऊन- पावसाचा खेळ सुरू झाला आहे. क्षणात पावसाची सर येते, ओलेचिंब करून सोडते आणि उन्हाची तिरकी किरणे पाना-पानांवर, फुला-फुलांवर पडलेल्या पाण्याच्या थेंबांना चकचकीत करून सोडते. फुलपाखरांचा थवाच्या थवा, त्या सुंदर हिरव्यागार गालिचावर स्वच्छंदी बागडताना पदोपदी दिसतो.
असा हा जलउत्सव चालू वर्षी अधिकच आनंदी आहे. कारण कमी अधिक वारंवार पाऊस पडतो आहे. शेतीला तर पोषक आहेच. त्यामुळे भात आणि नागलीची भरभरुन वाढ होत आहे. हाच पाऊस गोड साखर तयार करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राचे ऊसाचे मळेही गर्दी करून उभे राहावेत, असे भरले आहेत.
गत वर्षी पाऊसमान कमी झाल्याने ऐतिहासिक राधानगरीचे लक्ष्मी धरण वगळता एकही धरण भरले नव्हते. महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ज्या धरणाचा उल्लेख केला जातो त्या कोयनेत जेमतेम ऐंशी टीएमसीच पाणी साठले होते. चालू वर्षी ते पूर्ण भरते आहे. मधल्या काळात एक आठवडाभर असा पाऊस होता की, कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचे धबधबे दररोज सरासरी पाच टीएमसी पाण्याने कोयना धरण भरत होते. तीन दिवसांत जमा झालेले होणारे पाणी अठरा टीएमसी होते. एखाद्या मोठ्या धरणात असेल इतके पाणी केवळ तीन दिवसांत या धरणात येते. इतके हे सुंदर कोयनेचे पाणलोट क्षेत्र आहे. कोयनेपासून महाबळेश्वरपर्यंत साठ किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेल्या दऱ्या-खोऱ्यांत प्रचंड कोसळणारा पाऊस पाहणे हादेखील एक उत्सव साजरा करावा, असा अनुभव असतो.
कृष्णामाईची नव्या पाण्याने ओटी भरण्याची परंपरा इकडे आहे. चालू वर्षी ही ओटी भरून वाहाते आहे. तिचा उत्सव चालू आहे. उत्सवासाठी गावे सजवावी, मंदीर रंगवावे, माळ-फुलांनी बहरून टाकावे, तसा हा सर्व सह्याद्री भरून गेला आहे. त्याचा आस्वाद घेणे हादेखील एक नैसर्गिक चमत्कारच असतो. तो सध्या उत्सव साजरा होत आहे. धन्य ती कृष्णामाई आणि तिला सजविणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा!
- वसंत भोसले

Web Title: Krishnamachari Water Resource

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.