फक्त साडेतीन मिनिटांत कुणी इतके काळजाला भिडावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 09:51 AM2022-02-07T09:51:37+5:302022-02-07T09:53:19+5:30

Kumar Gandharva about lata Mangeshkar : ख्यातनाम गायक कुमार गंधर्व हे लताबाईंच्या अमृत स्वरांचे निस्सीम चाहते होते. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी एका संगीत परिषदेत कुमारजींनी लताबाईंच्या लोकप्रियतेचे रहस्य नेमकेपणाने उलगडून दाखवले होते. त्या मनोगताचा हा संपादित अनुवाद.

Kumar Gandharva about lata Mangeshkar Kumar Gandharva is a huge fan of Latabai's voice | फक्त साडेतीन मिनिटांत कुणी इतके काळजाला भिडावे?

फक्त साडेतीन मिनिटांत कुणी इतके काळजाला भिडावे?

Next

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. आजारी असल्यामुळे अंथरुणात पडून होतो. एक दिवस सहज रेडिओ लावला तर एक अद्वितीय स्वर कानावर पडला.  थेट काळजाला भिडणाऱ्या त्या स्वराने काही काळ अस्वस्थ केले मला. कोण असेल ही गायिका, गाणे संपले आणि निवेदिकेने नाव सांगितले, लता मंगेशकर! त्या नावाचे नाते मी यापूर्वी ऐकलेल्या दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीशी होते. बहुदा ‘बरसात’ चित्रपटाच्या आधीच्या चित्रपटातील ते गाणे होते. मी तेव्हापासून लताचे गाणे ऐकतोय.

भारतीय गायिकांमध्ये लता मंगेशकर यांच्या तोडीची गायिका झालेली नाही असे माझे स्पष्ट मत आहे. लतामुळे चित्रपट संगीत अतिशय लोकप्रिय झालेच; पण शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा सामान्य रसिकांचा दृष्टिकोन त्यामुळे एकदम बदलला.  लताचा स्वर सतत कानावर पडल्यामुळे सुरेल असणे म्हणजे काय याची समज तरुण पिढीला, सामान्य श्रोत्यांना नकळत येत गेली. सामान्य श्रोत्यांची संगीताची समज त्यांच्याही नकळत वाढवण्याचे, त्यांची अभिरुची विकसित करण्याचे श्रेय निःसंशयपणे लताचेच..! 

शास्त्रीय संगीताची ध्वनिमुद्रिका आणि लताची गाणी असलेली ध्वनिमुद्रिका यामधून एकाची निवड करण्याची वेळ आली, तर आजचा रसिक अर्थातच लताच्या गाण्यांची निवड करील. तिच्या गाण्यातील राग कोणता, तो शुद्ध स्वरूपात आला आहे का, ताल कोणता या कोणत्याही गोष्टीशी या रसिकाला काहीही कर्तव्य नाही. त्याच्यासाठी त्या गाण्यातील गोडी आणि व्यक्त होणारा प्रामाणिक, निखळ भाव फार महत्त्वाचा! जसे माणसाला माणूस म्हणण्यासाठी त्याच्यात ‘माणूसपण’ असणे गरजेचे आहे, तसेच ज्याच्यात ‘गाणेपण’ आहे त्यालाच संगीत म्हणता येईल ना. लताच्या प्रत्येक गाण्यात हे ‘गाणेपण’ शंभर टक्के असते. तिच्या लोकप्रियतेचे मर्मच तिच्या गाण्यातील या गाणेपणात आहे! लताच्या स्वरांमध्ये एक अनोखी मुग्ध कोमलता आहे. जीवनाकडे बघण्याचा तिचा जो दृष्टिकोन आहे तीच निर्मलता तिच्या गाण्यातून व्यक्त होते. संगीत दिग्दर्शकांनी तिच्या या वैशिष्ट्याचा पुरेसा फायदा करून घेतला नाही. मी जर संगीतकार असतो तर लतापुढे नक्की अनेक आव्हाने ठेवली असती असे म्हणण्याचा मला अनेकदा मोह होतो. तिच्या स्वरांमध्ये असलेली आस, ती गात असलेल्या गाण्याच्या दोन शब्दांमधील अंतर इतक्या सुंदर रीतीने भरून काढत असते की ते दोन शब्द एकमेकांमध्ये सहज मिसळून जातात, विलीन होतात. हे सोपे नाही; पण लतासाठी मात्र ते अगदी स्वाभाविक आहे.

शास्त्रीय संगीतात लताचे स्थान काय- माझ्या मते, हा प्रश्नच फार चुकीचा, गैरलागू आहे. एक तर शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत यांची तुलनाच होऊ शकत नाही. गांभीर्य हा शास्त्रीय संगीताचा प्राण आहे, तर जलद लय, चपलता हा चित्रपट संगीताचा स्वभाव! पण चित्रपट संगीत गाणाऱ्या कलाकाराला शास्त्रीय संगीताची उत्तम समज असणे आवश्यक आहे, जी लतामध्ये नक्की आहे. तीन-साडेतीन मिनिटांत म्हटले जाणारे चित्रपट गीत आणि तीन तास रंगलेली एखादी शास्त्रीय संगीताची मैफल या दोहोंचे कलात्मक आणि आनंदात्मक मूल्य एकच आहे असे मी मानतो. 

तीन तासांच्या मैफलीचा रस लताच्या तीन मिनिटांच्या एका गाण्यात अनुभवता येतो! कारण तिने म्हटलेले प्रत्येक गाणे ही एक संपूर्ण कलाकृती असते. स्वर, शब्द आणि लय याचा त्रिवेणी संगम त्या गाण्यात झालेला दिसतो आणि मैफलीची बेहोशीही त्यात सामावलेली असते. आनंद देण्याचे सामर्थ्य कोणत्या गाण्यात किती आहे, यावर त्या गाण्याचे मोल ठरत असते. लताचे गाणे या  निकषावर शंभर टक्के गुण मिळविते!  खरे तर आपल्याकडील शास्त्रीय संगीत गायकांनी गाण्याला शास्त्रशुद्धता आणि कर्मकांडाच्या पिंजऱ्यात डांबून  पावित्र्याचा एक निरर्थक बागुलबुवा उभा केला आहे. 

चित्रपट संगीतात दिसणाऱ्या नवनिर्मितीच्या अथांग शक्यतांनी त्या संगीताला मात्र सदैव ताजे ठेवले आहे.  पंजाबी लोकगीतांमधून दिसणारे सोनेरी ऊन, निर्जल राजस्थानमधील लोकगीतांमधून केलेली पर्जन्याची आळवणी, खोऱ्यातील गाण्यांमधून ऐकू येणारी पहाडी गीते, ब्रज भूमीत गायली गेलेली मधुर भजने यावर आधारित शेकडो गाण्यांची लता सम्राज्ञी आहे. चित्रपट संगीतात तिने जे स्थान मिळविले आहे ते निव्वळ अचंबित करणारे नाही, तर अनेकदा हेवा वाटावा असे आहे. 

कधी तरी मला प्रश्न पडतो, एक व्यक्ती, दुबळी दिसणारी एक स्त्री एकहाती अशी अफाट कामगिरी करू शकते? फक्त लताच हे करू शकते...शतकातून हा चमत्कार एकदाच घडू शकतो.
- कुमार गंधर्व
 

Web Title: Kumar Gandharva about lata Mangeshkar Kumar Gandharva is a huge fan of Latabai's voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.