खुमखुमी आणि खडाखडी
By admin | Published: January 28, 2015 02:52 AM2015-01-28T02:52:21+5:302015-01-28T02:52:21+5:30
मुखेड आणि औरंगाबाद या मराठवाड्याच्या दोन ठिकाणी सध्या राजकीय हवा तापत आहे. मुखेडची हवा तापायला सुरुवात झाली
सुधीर महाजन -
मुखेड आणि औरंगाबाद या मराठवाड्याच्या दोन ठिकाणी सध्या राजकीय हवा तापत आहे. मुखेडची हवा तापायला सुरुवात झाली. कारण तेथे १३ फेब्रुवारीला विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे. तीन महिन्यांवर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आली. त्यामुळे येथे भाजपा-शिवसेने अंतर्गत उघडपणे धुसफूस चालू आहे. सर्वंकष सत्ता हे धोरण भाजपा राबवीत असल्याने घटक पक्षांची गळचेपी वरून खालपर्यंत होत असल्याचे दिसते. या दोन्ही ठिकाणी तीच परिस्थिती आहे. गोविंद राठोड यांचे निधन झाल्याने मुखेडची पोटनिवडणूक लागली. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने गमावलेली ही एकमेव जागा आणि मतदारांनी काँग्रेसचे आमदार बेटमोगरेकर यांना नाकारले ते जवळपास ७८ हजार मतांनी. मोदींच्या झंझावातात अशोक चव्हाण यांनी नांदेडचा गड टिकविला; पण ही जागा मोठ्या फरकाने गमवावी लागली. आमदारपदाची शपथ घेण्यासाठी निघाले; पण दुर्दैवाने ते मुंबईपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
मुखेड पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला; पण भाजपाच्या तंबूत संभ्रमावस्था आहे. राठोड यांचे दोन्ही चिरंजीव गंगाधर आणि तुषार यापैकी कोण, असा पेच सर्वांना पडला. कारण गोविंद राठोड यांचे बंधू माजी आमदार किसनराव राठोड यांनी पत्रपरिषद घेऊन डॉ. तुषार यांचे नाव पुढे केल्यामुळे हा संभ्रम वाढला. कारण ते राजकारणात कधीच नव्हते. उलट गंगाधर हे सामाजिक आणि संस्थात्मक कामात अग्रेसर असताना कुटुंबातून तुषार यांचे नाव पुढे येणे ही सरळ गोष्ट नाही. या दोन भावांमध्ये सत्तासंघर्ष उघडपणे दिसत नसला तरी राठोड कुटुंबीयांनीच निर्माण केलेल्या संभ्रमामुळे तसे वातावरण काही प्रमाणात निर्माण झाले आहे. इकडे भाजपामध्ये अशी अवस्था असताना सत्तेतील सहभागी शिवसेनेने जोर-बैठका काढण्यास सुरुवात केली. लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपले पुत्र प्रवीण यांना या मैदानात उतरविण्याची तयारी चालविली आहे. शिवसेना सत्तेत असली तरी भाजपाशी युती नाही आणि विधानसभा निवडणुकीत दोेन्ही पक्ष समोरासमोर लढले. त्यामुळे आता सरकारमधील दोन पक्ष एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहणार का?
काँग्रेसच्या गोटातील स्थिती यापेक्षा वाईट. येथे बेटमोगरेकरांशिवाय नवा चेहरा पक्षाकडे नाही. बेटमोगरेकरांना आणले तर तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी सपाटून मार खाल्ला आहे. येथे काँग्रेसने नवा चेहरा दिला तर चुरस वाढेल. काँग्रेसची सर्वांत महत्त्वाची बाजू म्हणजे अशोक चव्हाण. ते ही जागा जिंकण्यासाठी सर्व शक्ती लावतील. त्यामुळे भाजपा-सेनेतील खुमखुमी आणि राठोड कुटुंबाने संभ्रम निर्माण केल्यामुळे, गोविंद राठोड यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीला ओहोटी लागली. अजून उमेदवार ठरत नसल्याचाही परिणाम झाला आहे.
मुखेडमध्ये हे सत्ताधारी पक्ष समोरासमोर येण्याची तयारी करीत असताना औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर नजर ठेवून या दोन्ही पक्षांत निर्माण झालेली ही स्पर्धा उघड दिसते. येथे हिंदुत्वाचा मुद्दा कळीचा मानला जातो. त्यामुळे खरे हिंदुत्ववादी आम्हीच, असा दावा दोन्ही पक्ष करीत असले तरी भाजपाने या मुद्द्यावर स्वत:ला पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला. गेल्या आठवड्यात झालेला रा.स्व. संघाचा ‘देवगिरी प्रांता’चा महासंगम ही त्याचीच झलक होती. या निवडणुकीत मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम)च्या प्रभावाला आपण रोखू शकतो, हे शिवसेना दाखवत असताना भाजपाने आपली प्रतिमा तशी बनवायला सुरुवात केली, त्याच वेळी महापालिकेत प्रत्येक मुद्द्यावर सेनेच्या नाकर्तेपणावर नेमके बोट ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण हे शिवसेनेचेच पाप, असे बिंबविण्यात ते यशस्वी झाले. माहोल खुमखुमी आणि खडाखडीचा आहे.